ग्रामीण अर्थकारणाला चालना देत जनसामान्यांना भक्कम आर्थिक आधार देणाऱ्या, कृष्णा सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँकेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून, १२ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
राज्यातील सहकारी नागरी बँकांचा महासंघ असलेल्या दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनकडून दरवर्षी सहकारी बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकांच्या कार्याची दखल घेत, सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने त्यांचा गौरव केला जातो. सन २०२५-२६ या वर्षासाठी कृष्णा सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँकेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ५०१ कोटींपेक्षा अधिक आणि १००० कोटींपर्यंत ठेवी असलेल्या बँकांच्या गटातून कृष्णा बँकेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
कृष्णा सहकारी बँकेने चेअरमन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोठा विस्तार केला आहे. बँकेने सातत्याने नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत, ग्राहकांना मोबाईल बँकींगसारख्या अत्याधुनिक सोयी उपलब्ध करुन देत ग्राहकहित जपले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे अशा ४ जिल्ह्यात २७ शाखा व १ विस्तारीत कक्षाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या कृष्णा बँकेला नुकतीच रिझर्व्ह बँकेकडून ठाणे, सोलापूर व रत्नागिरी जिल्ह्यात कार्यविस्तारास मंजुरी मिळाली आहे. ग्राहक सेवा, आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर या चतु:सुत्रीचा अवलंब करत कृष्णा बँक आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देत आहे.
या पुरस्काराचे वितरण १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील सुंदरवाडी परिसरातील ‘एक्सप्रेस इन हेरिटेज’ येथे होणार आहे. या पुरस्कारामुळे कृष्णा बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, याबद्दल बँकेचे सर्व सभासद, संचालक मंडळ, ग्राहक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment