Saturday, April 11, 2020

अत्यावश्यक वस्तूंचे वाटप घरपोच करा जिल्हाधिकारी


कराड : कोरोनाच्या संसर्गामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे परप्रांतीय,  गरजू नागरिकांना काही अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अन्न-धान्य, वस्तुंच्या स्वरुपात मदतीचे वाटप केले जात आहे, परंतु मदत वाटप करताना सोशल डिस्टन्सींग पाळले जात नसल्याचे निदर्शनास आहे. गरजु व्यक्ती, कुटुंबाला मदतीचे वाटप करावयाचे असल्यास कार्यक्रमाद्वारे न वाटप करता शक्यतो घरपोच मदतीचे वाटप करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

शहरी भागामधील गरजुंना मदतीचे वाटप करावयाचे झाल्यास अशासकीय संस्था, स्वयंसेवकांनी नागरिकांना वैयक्तिकपणे मदतीचे वाटप न करता त्यांनी संबंधित तालुक्याचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्या सल्ल्यानुसार सोशल डिस्टन्सींग पाळून वाटप करावे. तसेच ग्रामीण भागात मदतीचे वाटप करताना वैयक्तिक न करता संबंधित तालुक्याचे तहसीलदार, सहायक पोलीस निरीक्षक व गटविकास अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार सोशल डिस्टन्सींग पाळून वाटप करावे. मदतीचे वाटप करताना कोणत्याही प्रकारचे छायाचित्र काढण्यास सक्त मनाई आहे. मदतीचे वाटप करताना मास्क, हॅन्डग्लोज व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई ...

कराड - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सातारा जिल्ह्यात कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यतील  अत्यावश्यक सेवेची चालू असणारी सर्व दुकाने ठरविक वेळेत सुरु राहतील, असे  आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.दरम्यान जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार ज्यांनी या नियमांचा भंग केला अथवा दुर्लक्ष केले त्यांच्यावर कराड तालुक्यात कारवाई करण्यात आले आहे. कराड शहर व कराड तालुका पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे

Covid अनुषंगाने पारित आदेशाचे उल्लंघन केलेबाबत कराड तालुक्यात एकूण 101 गुन्हे व 4 न्यायिक खटले दाखल करण्यात आले आहेत. कराड शहर पोलीस स्टेशन -- 21 ( अधिक 4 न्यायिक खटले ), कराड ग्रामीण पोलीस स्टेशन - 21, उंब्रज पोलीस स्टेशन - 51, तळबीड पोलीस स्टेशन - 8 असे एकूण 101 गुन्हे व 4 न्यायिक खटले दाखल करण्यात आलेले आहेत.

मुख्याधिकारी डांगे घाणेरडे राजकारण करीत आहेत - नगराध्यक्षा सौ. रोहिणीताई शिंदे यांचा घणाघात

(अजिंक्य गोवेकर)
कराड
येथील नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे यांनीच गावात चालू असणारी औषध फवारणी बंद केल्याची आवई त्यांच्या विरोधकांनी उठवली असतानाच सौ.शिंदे यांनी  c o च्या मर्जीतील कोणाला तरी या फवारणीचे क्रेडिट मिळावे म्हणून माझ्या नावावर खापर फोडून इतर कोणाचा या बाबतीत फायदा करून देण्याचे घाणेरडे राजकारण मुख्याधिकारी डांगे यांनी यानिमित्ताने केल्याचे नगराध्यक्षांनी आपल्या दिलेल्या निवेदनातून सुचवले आहे.म्हणजेच मुख्याधिकारी  डांगे यांच्या शहरातून चालू असलेल्या राजकीय  हस्तक्षेपाच्या भानगडी अजून संपत नाहीत असच या वरून दिसतय.जो व्यक्ती स्वतः ला कसलाही अधिकार नसताना शहरातून अत्यावश्यक वस्तुंनादेखील बंद करून आपल्याला वाटत म्हणून लॉक डाऊन करायला पुढे होतो, आपल्याला वाटलं म्हणून अतिक्रमण मोहीम शहरातील लोकांना,व्यापाऱ्यांना नुकसान होईल अशी राबवतो. नगराध्यक्षाना कसलाही अधिकार नसताना अपात्र करण्याची नोटीस पाठवतो, या मानसिकतेला काय म्हणायचे हाच प्रश्न आहे.जो अधिकारच आपल्याला नाही तो आहे असे धडधडीत सांगून त्याच्या आड वाटलं ते करायचे,इतरांना काहीही सांगायचे,कोणावर काहीही आरोप करायचे हे असले धंदे जेव्हापासून पालीकेत चालू झालेत तेव्हापासून शहराचा विकास बॉम्बल्याचे चित्र आहे.स्वच्छतेत बक्षीस मिळाले ते ही कराडकरांच्या प्रयत्नाने,आणि क्रेडिट घेतायत हे सी ओ अशी परिस्थिती असताना शहराचे उपनगराध्यक्ष म्हटले होते,या सी ओ ने शहराचे वाटोळे केले,आमच्या पार्टीचा इस्कोट केला म्हणजे जे खांद्याला खांदा देऊन काम करत होते तेच आता यांच्या नावाने बोम्बलतायत हेच यांच्या कामाचे सर्टिफिकेट म्हणायचे.उपाध्यक्ष असेही म्हटले होते,की सी ओ शहराच्या राजकारणात हस्तक्षेप करतात तो इतका की पार्टी कोण चालवतय तेच मला कळना झालंय...आणि आत्ताच्या नगराध्यक्षांच्या फवारणी प्रकरणात हेच दिसून येतंय....
नगराध्यक्षांनी निवेदनात असे म्हटले आहे की, कोरोना चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मी कोणत्याही प्रसिद्धी शिवाय पहिल्यापासून कार्यरत असल्याचे सम्पूर्ण शहराला माहीत आहे. 27 मार्च च्या शासनाच्या परिपत्रकानुसार औषध फवारणी अग्निशामक दलाच्या मोठ्या गाड्यातून करायची आहे असे असताना त्या गाड्या बंद ठेऊन ट्रेकटर मधून ही फवारणी चालू आहे आणि ती कोणाच्या तरी फायद्यासाठी सुरू आहे.
मी माझे काम करत असताना शहरातील फवारणी,स्वच्छता, विलीगिकर्ण कक्ष बनवणे अशी कामे वर्तमान पत्रातून पसिद्धी न देता केली आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन अधिकाऱ्यांशी वेळोवेळी बोलून शहराची काळजी शक्य तितकी घेण्याचा प्रयत्न केला आहे.हे शहरच माझं कुटुंब आहे असे मी मानते त्यामुळे माझे काम हे गट,तट न पाहता सुरू असते.
शासनाच्या 14 व्या वित्त आयोगाच्या आदेशानुसार कोरोना आजाराविषयी काम करण्यासाठी सी ओ ना 10 लाखा पर्यंत कामे करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत.त्यामधून त्यांनी कामे करूनही घेतली,आणि एक कागद माझ्या कडे पाठवून त्यावर मी सही केली नाही मग माझ्या मुळे ही फवारणी थांबली अशी खोटी बतावणी करायला सुरुवात केली.कोणाचा तरी फायदा  म्हणजेच कोणाला तरी क्रेडिट मिळवून देण्यासाठी हे असलं घाणेरडे राजकारण डांगे करत असल्याचा आरोपही नगराध्यक्ष यांनी आपल्या निवेदनातून केला आहे.मात्र कराड माझं कुटुंब आहे.असले किती अधिकारी येतील आणि जातीलही  मात्र, मी माझ्या शहराची अविरत सेवा आणि काळजी घेतच राहणार आहे कारण ते माझं कर्तव्यच आहे असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.


लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत वाढण्याची शक्यता...

नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉक डाउन वाढवण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत असून ३० एप्रिलपर्यंत निर्बंध लागू राहतील अशी शक्यता आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्याला आर्थिक मदत दिली जावी, अशी मागणी नरेंद्र मोदींकडे केली असल्याचंही कळत आहे. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी जवळपास तशीच तयारी दाखवली आहे. जागतिक आरोग्य संघटेनेने अचानक लाॅक डाऊन शिथिल करणे हे धोकादायक ठरू शकेल, असा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबई शहरात ही संख्या वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लाॅक डाऊन वाढेल,असा अंदाज व्यक्त होत होता. तशीच मागणी ठाकरे यांनी आज मोदी यांच्याकडे केली. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून शुक्रवारी राज्यात 210 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या एक हजार 574 वर जाऊन पोचली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. त्याशिवाय राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये 13 रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, आतापर्यंत राज्यात 188 बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मुंबई येथील दहा, तर पुण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. आज झालेल्या 13 मृत्यूपैकी 6 जण हे 60 वर्षांवरील आहेत, तर 5 रुग्ण हे वय 40 ते 60 वर्षे या वयोगटातील आहेत;तर दोघेजण 40 वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्युमुखी पडलेल्या 11 रुग्णांमध्ये (85 %) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यींची संख्या आता 110 झाली आहे. आजपर्यंत तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या 33093 नमुन्यांपैकी 30477 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत; तर 1574 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 188 कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

Friday, April 10, 2020

कोरोना बाधित 54 वर्षीय रुग्णाचा कराड येथे मृत्यु

कराड : कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे दाखल असणाऱ्या 54 वर्षीय वयाच्या कोरोना (कोविड-19) बाधित रुग्णांचा आज पहाटे 5 वाजता मृत्यु झाला आहे. कोरोना बाधित 54 वर्षीय पुरुषाचा मृत्यु हा प्राथमिक अंदाजानुसार कोविड-19 सह श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे आणि मधुमेहामुळे झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

सातारा जिल्ह्यात आज ( दि.10 )सातवा कोरोना बाधित रुग्ण आढळला

सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाचा निकट सहवासित 19 वर्षीय युवकाला जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात अनुमानित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले होते. या युवकाच्या घशातील स्त्रावाचे नमुना रिपोर्ट हा कोरोना (कोव्हीड -19) पॉझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी कळविले आहे. त्यामुळे हा युवक कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. या रुग्णांवर मार्गदर्शक सुचनानुसार कोरोना संसर्गाचे उपचार चालू आहेत.

अत्यावश्यक सेवा उद्यापासून (दि.11एप्रिल पासून)ठराविक वेळेतच चालू राहतील- जिल्हाधिकारी


सातारा दि. 10-  कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सातारा जिल्ह्यात कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यतील अत्यावश्यक बाबी वगळता सर्व प्रकारची दुकाने व आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद राहतील तर अत्यावश्यक सेवेची चालू असणारी सर्व दुकाने ठरविक वेळेत सुरु राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानुसार कोरोना प्रादुर्भावानंतर  *अत्यावश्यक सेवेची चालू ठेवलेली सर्व दुकाने उदा. किराणा सामान, दुध, औषध दुकाने, कृषि सेवा केंद्रे व अन्य जीवनावश्यक वस्तूंची दिनांक 11 एप्रिल पासून पुढील आदेशापर्यंत रोज सकाळी 8 ते सकाळी 11 वाजेपर्यंत, व सायंकाळी 7 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंतच चालू राहतील.* *तथापि भाजीपाला विक्री केंद्रे फक्त सकाळी 8 ते 11 या वळेतच चालू राहतील. भाजीपाला केंद्रे संध्याकाळी चालू राहणार नाहीत.*
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द नियमानुसार कडक कारवाई करण्यात येऊन संबंधितांचा परवाना तात्काळ कायमस्वरुपी रद्द करण्यात  येवून साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार, दंड प्रक्रीया संहिताचे कलम 144, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 या आदेशाचे उल्ल्ंघन केल्यास भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. व संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद आहे.
000