Sunday, January 2, 2022

कोरोनाचा मोठा विस्फोट ; राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 11 हजार 877 नवे कोरोनाबाधित ; पुण्यात ओमायक्रोनचे सर्वाधिक रुग्ण...

वेध माझा ऑनलाईन - राज्यात कोरोनाचा मोठा विस्फोट होताना दिसत आहे. कारण राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 11 हजार 877 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही महिन्यांमधील ही सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. राज्यात आज दिवसभरात 9 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 2069 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या ओमायक्रोन हा नवा विषाणूदेखील महाराष्ट्रात थैमान घालताना दिसतोय. राज्यात आज दिवसभरात तब्बल 50 नव्या ओमायक्रोनबाधितांंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रोनबाधितांचा आकडा थेट 510 वर पोहोचला आहे.

पुण्यात ओमायक्रोनचे सर्वाधिक रुग्ण


आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज दिवसभरात 50 नवे ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यामध्ये पुणे ग्रामीण येथील 2, पिंपरी चिंचवड येथील 8 तर पुणे मनपा हद्दीतील तब्बल 36 रुग्णांचा समावेश आहे. तर सांगलीतील 2, मुंबई आणि ठाणे येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. राज्यातील ओमायक्रोनबाधितांचा आकडा 510 वर पोहोचला आहे.

मुंबईत दिवसभरात तब्बल 8063 नवे रुग्ण

महाराष्ट्रातील मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात काल दिवसभरात 9 हजार 170 वर नवे रुग्ण आढळले होते. तर आज हाच आकडा 11 हजार 877 वर पोहोचला आहे. त्यापैकी मुंबई शहरातच 8063 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. मुंबईतील कोरानाबाधितांचा वाढता आकडा ही चिंतेची बाब आहे. विशेष म्हणजे मुंबईत तीन दिवसांपूर्वी 3671 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज हाच आकडा थेट 8063 वर पोहोचला आहे. त्यामुळे कोरोना आता संसर्गाचा गुणाकार करताना दिसतोय.

आज सातारा जिल्ह्यात 66 बाधीत...4 डिस्चार्ज...

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 66 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 
4 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 4 कराड 15 खंडाळा 5 खटाव 1 कोरेगांव 3 माण 1 महाबळेश्वर 6  पाटण 1 फलटण 2 सातारा 21 वाई  2 व इतर 4 आणि नंतरचे वाढीव 1 असे  आज अखेर एकूण 66 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 4 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रीक होणार ; आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन दिली माहिती...

वेध माझा ऑनलाईन - नववर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. पेट्रोल-डिझेलवर  चालणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषण आळा घालण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रीक होणार आहेत. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली.

1 जानेवारीपासून इलेक्ट्रिक वाहने वापरात

राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रिक होणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली. खरंतर राज्य सरकारने हा निर्णय याआधीच घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2022 पासून होणार होती. पण आता ही अंमलबजावणी 1 जानेवारी 2020 पासूनच होणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली.

शहरातील नागरिकांचे आरोग्य हेच नगरपालिकेचे प्राधान्य असले पाहिजे - पृथ्वीराज चव्हाण... माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पास भेट दिली.

वेध माझा ऑनलाईन -  माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड नगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट दिली व या प्रकल्पाची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडून घेतली. यावेळी स्वच्छता दूतांचा सत्कार करण्यात आला तसेच या सर्वांशी आ. चव्हाण यांनी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत कराड शहर काँग्रेस अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, नगरसेवक इंद्रजीत गुजर, माजी नगरसेवक श्रीकांत मुळे, राहुल चव्हाण, इंद्रजीत चव्हाण, आमिर कटापुरे, झाकीर पठाण, भास्कर देवकर, विजय मुठेकर, अशोकराव पाटील आदीसह नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि,शहरासाठी कचरा व्यवस्थापन हि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे. शहराच्या दृष्टीने चांगले आरोग्य राहावे यासाठी कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट, शहरासाठी स्वच्छ २४ तास पिण्याचे पाणी, यासह सांडपाणी नदीला न सोडता त्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा उपयुक्त असा वापर करणे महत्वाचे आहे. शहराच्या महत्वाच्या बाबीसाठी याआधी सुद्धा मोठा निधी आणला होता आता सुद्धा आणला जाईल. 

कचरा व्यवस्थापन प्रकल्प अधिक यांत्रिकी पद्धतीने होण्यासाठी तसेच शहरातील महत्वाचे प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने मुख्याधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर करावा त्यानुसार शासनस्तरावर पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल. असेही यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

-

95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची एकमताने बिनविरोध निवड...


वेध माझा ऑनलाईन - 
95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. लातूरच्या उदगीरमध्ये हे साहित्य संमेलन होणार आहे. चार महिन्याच्या आत पुढील साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती नाशिक येथील साहित्य संमेलनाच्या समारोपावेळीच देण्यात आली होती. त्यामुळं येत्या तीन महिन्यात संमेलनाची तारीख निश्चित होणार आहे. दरम्यान या संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड झाल्यानं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सासणे यांचं मराठी साहित्यातील योगदान अमूल्य आहे. 


कोण आहेत भारत सासणे 

भारत जगन्नाथ सासणे यांचा जन्म 27  मार्च 1951 रोजी जालना येथे झाला आहे. त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून बी.एस्‌सी. ही पदवी घेतली. विविध शासकीय अधिकारीपदांवर त्यांनी नोकरी केली. 1980  नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारांमध्ये भारत सासणे हे एक अग्रगण्य व महत्त्वाचे कथालेखक आहेत. नव कथेची सारी वैशिष्ट्ये आत्मसात करून त्यातून आपला वेगळा, स्वतंत्र बाज निर्माण करणाऱ्या कथा सासणे यांनी लिहिल्या आहेत.

राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तयारी करण्याचं काम सुरु ; ना.अजित पवार यांची माहिती

वेध माझा ऑनलाईन -  महाराष्ट्रात वाढत चाललेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. सोबतच काही महत्वाच्या नेत्यांकडून राज्यात पुन्हा लॉकडाऊन  होण्याबाबतचे संकेत देखील मिळाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी देखील काल राज्यात लॉकडाऊन लागण्यासंदर्भात संकेत दिले होते. आज त्यांनी पुन्हा तसे संकेत दिले असून राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तयारी करण्याचं काम सुरु असल्याचं सांगितलं आहे. 

राज्य सरकार मुख्यमंत्री ठाकरेंच्या नेतृत्वात काम करत आहे. राज्यात दुसरी लाट असताना आम्ही तयारीचे आदेश दिले होते. ऑक्सिजन , व्हेंटिलेटरची तयारी करण्याचं काम सुरू केलंय. दुसऱ्या लाटेत उद्योगाचा ऑक्सिजन इकडे वळवावा लागला. ज्याची ऑक्सिजन वाढवण्याची क्षमता आहेत त्यांनी ती वाढवावी, असंही पवारांनी सांगितलं. अजित पवार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक मतदान करण्यासाठी सपत्नीक आले होते तेव्हा अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला

अजित पवार म्हणाले की, यंदाच्या अधिवेशनात आम्ही ग्रामीण रुग्णालयाला मोठी मदत केली आहे. सरकार म्हणून आम्ही खबरदारी घेत आहे. महापालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा नियोजनातील 20 टक्के खर्चाची मान्यता दिली आहे, असं ते म्हणाले. सगळ्यांनी नियमांचं पालन करावं. मी 50 पेक्षा जास्त लोक असतील तर मी कार्यक्रमाला जाणार नाही,असंही अजित पवार म्हणाले.  
अजित पवार म्हणाले की, आता मी विचारून कार्यक्रमाला जाणार आहे. आमच्यासहित सगळ्यांनी पालन केलं पाहिजे. कारण आम्ही जर पालन केलं नाही तर लोकांना कोणत्या तोंडाने सांगणार. राज्य सरकारने दिलेल्या नियमांच पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं. 
महाराष्ट्रात सगळ्यांनी लस घ्यावी. यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला आहे. पहिला डोस देण्यात यश आलं आहे. दुसऱ्या डोसला ग्रामीण भागात प्रतिसाद नाही. घराघरात जाऊन लसीकरण मोहीम हाती घेतली आहे, असंही पवार म्हणाले.

Saturday, January 1, 2022

राज्यात आज 9,170 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद... तर 1,475 रुग्ण कोरोनामुक्त... राज्यात आज 6 ओमायक्रॉनबाधितांची नोंद

वेध माझा ऑनलाइन - राज्यावरील कोरोनाचे संकट अधिक गडद होत असून आज रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळालं आहे. राज्यात आज तब्बल 9,170 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1,475  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे झालेल्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली असून देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.  


राज्यात आज 6 ओमायक्रॉनबाधितांची नोंद

राज्यात आज  6 नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत एकूण 460 ओमायक्रॉनबाधितांची नोंद  झाली आहे.