Monday, January 3, 2022

पृथ्वीराज चव्हाण हे जनतेच्या मनातील "भगीरथ"- माणदेशी उद्योग समूहाच्या संस्थापिका सामाजिक कार्यकर्त्या चेतना सिन्हा यांचे गौरवोद्गार...


वेध माझा ऑनलाईन - 
भाग या भागात पाणी येईल असे कधी कोणाला स्वप्नात देखील वाटले नव्हते. या भूमीत माणगंगा नदी असूनही कायम कोरडी असणारी नदी प्रवाहित करण्याचे काम त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. यामुळेच पृथ्वीराज चव्हाण हे आम्हा जनतेच्या मनातील "भगीरथ" च आहेत असे गौरवोद्गार माणदेशी उद्योग समूहाच्या संस्थापिका तसेच सामाजिक कार्यकर्त्या चेतना सिन्हा यांनी आज काढले, त्या कराड येथे सत्यजित पतसंस्था व कराड दक्षिण काँग्रेस कमिटी च्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात बोलत होत्या. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे,  उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, प्रसिद्ध व्याख्याता राणी पाटील, पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील, कराडच्या माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव, जि प सदस्या मंगला गलांडे, माजी जि प सदस्या विद्याताई थोरवडे, अर्चना पाटील, मीनाक्षी मारुलकर, उत्तमराव पाटील, विद्या मोरे, बानुबी सय्यद, राजेंद्र यादव (आबा), आदींसह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या. 


 *यापुढे सामाजिक कार्यकर्त्या चेतना सिन्हा म्हणाल्या कि,* प्रत्येक दुष्काळात माण तालुक्यात चारा छावण्या उघडल्या जातच होत्या या चारा छावण्यांना फक्त भेट देणे आणि दुष्काळग्रस्तांच्या भावना समजून घेणे फार वेगळी गोष्ट आहे. दुष्काळग्रस्तांच्या भावना तेच समजून घेऊ शकतात जो मनातून शेतकरी आहे यामुळेच त्यावेळी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी दुष्काळग्रस्तांची मने जाणून घेतली व पूर्ण दुष्काळ छावण्यांची पाहणी केली आणि त्यावर उपाय सुचवून निधी सुद्धा उपलब्ध केला. अत्यंत संवेदनशील मन असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी माणगंगा नदी प्रवाहित केली यासाठी त्यांनी त्या भागात उभारलेले साखळी बंधारे आजहि कार्यान्वित आहेत. तसेच त्या पुढे म्हणाल्या कि, महिलांचे सक्षमीकरण हेच माणदेशी फाउंडेशन चा उद्देश असल्याने त्यानुसारच संस्था कार्यरत आहे. आजच्या युगात महिलांना डिजिटल ज्ञान मिळण्यासाठी जवळपास १ लाख ग्रामीण भागातील महिलांना संस्थेतर्फे प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

 *याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि,* माणदेशी फाउंडेशनचे महिला सक्षमीकरणाचे काम अत्यंत वाखाणण्याजोगे आहे. महिला सक्षमीकरण हा शासनासाठी महत्वाचा मुद्दा आहे. यासाठी १९९४ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पहिले महिला धोरण मांडले त्यानंतर २००१ साली स्व विलासराव देशमुख यांनी दुसरे महिला धोरण मांडले व त्यानंतर तिसरे महिला धोरण २०१४ साली मी मुख्यमंत्री असताना मांडण्यात आले. या धोरणांमुळे उद्दिष्टे जरी मांडली जात असली तरी त्याचे ग्रामपंचायत पर्यंत अंमलबजावणी होते का ? तसेच आज खरंच महिलांना समानतेची वागणूक दिली जात आहे का? घरातील सर्व कामे न चुकता करणारी गृहिणी तिच्या कामाचे मूल्य तिला कधी मिळणार आहे का ? असे अनेक प्रश्न महिला सबलीकरणात येतात.महिलांना ५०% आरक्षण जरी दिले गेले असले तरी ते अधिकार नक्की काय आहेत ते प्रशिक्षण महिलांना दिल्याशिवाय समजणार नाही. समाजाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर महिला सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. १८ व्या शतकात स्त्री शिक्षणाची बीज पेरणाऱ्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे योगदान महिला सक्षमीकरणाकडे पहिले पाऊल होते. 

या कार्यक्रमाचे आभार कराड दक्षिण महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा विद्याताई थोरवडे यांनी मानले. 

Sunday, January 2, 2022

कार्वे येथे डोक्यात दगड घालून युवतीचा खून ;

वेध माझा ऑनलाईन - कार्वे ता. कराड येथे युवतीचा डोक्यात दगड घालून खून झाला आहे. सोमवारी 3 रोजी सकाळी कार्वे-कोरेगाव रोडनजीक उसाच्या शेतात युवतीचा मृतदेह आढळला. स्थानिकांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना कळवली. त्यानंतर कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. 

 याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कार्वे येथील कार्वे-कोरेगाव रोडनजीक एका व्यक्तीचा निर्घुण निर्घृण खून झाल्याची घटना सोमवारी सकाळी स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर स्थानिकांनी याबाबत तात्काळ कराड ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली. 
 याबाबतची माहिती मिळताच कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खोबरे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. दरम्यान,  मृतदेहाच्या अवस्थेवरून युवतीचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. कार्वे-कोरेगाव रोडवनजीक ऊसाच्या शेतात यूवतीचा मृतदेह आढळलून आला असून मृतदेहाची अद्याप ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. 

       

आजपासून कराडात 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात; टाऊन हॉल प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रावर होणार लसीकरण; देशभरातून 8 लाख मुलांकडून लसीकरणासाठी नोंदणी...

वेध माझा ऑनलाईन - आजपासून म्हणजेच 3 जानेवारीपासून देशात 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आजपासून या वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जात आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 1 जानेवारीपासून कोविन अॅप आणि पोर्टलवर या लसीकरणासाठी नोंदणी सुरु झालं. या लहान मुलांच्या लसीकरणासाठी नाव नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं समजतंय.दरम्यान कराडातही आजपासून लसीकरण सुरू होणार आहे येथील टाऊन हॉल येथे तसेच  तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, व उपकेंद्रावर ही लस सोमवारी आणि शुक्रवारी मुलांना देण्यात येणार आहे 

 सम्पूर्ण देशभरातून रविवारी 11 वाजेपर्यंत 8 लाख मुलांकडून लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 15 ते 18 वर्षांच्या मुलांना लस देण्याची घोषणा केल्यानंतर प्रसाशनाकडून त्याची पूर्ण करण्यात आली आहे. तसंच 1 जानेवारीपासून 15-18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी करु शकता. कोवीन प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ आर एस शर्मा यांनी ही माहिती दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना लसीकरणासंदर्भात तीन मोठ्या घोषणा केल्या. मोदींनी केलेल्या घोषणांनुसार, आता देशात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. तसेच 10 डिसेंबरपासून आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोसही सुरु करण्यात येणार आहे.
दरम्यान कराडातही आजपासून लसीकरण सुरू होणार आहे येथील टाऊन हॉल येथे तसेच  तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, व उपकेंद्रावर ही लस सोमवारी आणि शुक्रवारी देण्यात येणार आहे यावेळी विद्यार्थ्यांनी येताना ओळखपत्र,आधारकार्ड सोबत आणायचे आहे.

अशी करा नोंदणी...

पहिलं Covin App वर जा.
तुमचा मोबाइल क्रमांक टाका.
त्यानंतर मोबाईलवर ओटीपी येईल आणि तो टाकून लॉग इन करा.

नंतर आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, व्होटर आयडी, युनिक डिसॅबिलिटी आयडी किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक फोटो आयडी पुरावा म्हणून निवडा.

तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा आयडी नंबर, नाव टाका.

त्यानंतर लिंग आणि जन्म तारीख निवडा.

सदस्य जोडल्यानंतर, तुम्ही तुमच्या जवळच्या क्षेत्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येईल.

या रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी CoWIN पोर्टलवर आणखी एक स्लॉट जोडण्यात आला आहे. तिथून मुलांना लसीकरणासाठी स्लॉट बुक करता येणार आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी जवळपास 1 हजार 500 व्यक्तींच्या स्टाफला प्रशिक्षण दिलं आहे. तसंच खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनाही प्रशिक्षण दिल्याची माहिती आहे.

यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. लहान मुलांना लस देण्यासाठीची सीरींज, नीडल कदाचित वेगळी असणार आहे.ज्या मुलांचा जन्म 2007 किंवा त्यापूर्वी झाला आहे अशी मुलंच या लसीकरणासाठी पात्र आहेत. CoWIN पोर्टलवर आपला COVID-19 वॅक्सिन स्लॉट बुक करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या आयकार्डचा वापर करावा लागेल. ज्या मुलांकडे आधार कार्ड नसेल त्यांच्या लसीकरणात अडथळा येऊ नये म्हणून आयकार्डचा वापर करण्याचा पर्याय केंद्रानं दिला आहे.

आता दोन राज्यात मिनी लॉक डाऊन...?

वेध माझा ऑनलाईन - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह काही राज्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्यातच देशात ओमायक्रॉन व्हेरियंटसह कोरोनाचं संकट वाढत असल्यानं अनेक राज्यांमध्ये नियम कडक केले जातायेत. महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणापाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. उद्यापासून पश्चिम बंगालमध्ये सर्व शाळा, कॉलेज, सलून, उद्यानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच खासगी आणि सरकारी कार्यालयांमधील उपस्थितीवरही 50 टक्क्यांचे निर्बंध लावले आहेत. याशिवाय रात्री 10 ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी असणार आहे.


हरियाणात वाढत्या कोरोना आकडेवारीमुळे निर्बंध कडक करण्यात आलेत. शाळा, महाविद्यालये, आंगणवाडी केंद्र बंद करण्यात आलेत.  राज्यात 12 जानेवारीपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर पाच जिल्ह्यातील चित्रपटगृहे, व्यायामशाळा बंद राहणार आहेत. 12 तारखेनंतर राज्यातील परिस्थिती पाहून निर्बंधाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

जयकुमारांकडून अजितदादांचे कौतुक...मग राष्ट्रवादीच्या नेत्याकडूनही आ. जयकुमार गोरेना थेट ऑफरच...

वेध माझा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपली कामाची शैली, धडपड आणि रोखठोक मत यामुळे चांगलेच प्रसिद्ध आहेत. तसंच त्यांच्यासमोर एखादी व्यक्ती चुकली, मग ती व्यक्ती कोण आहे याचा विचार न करता सुनावलेले खडे बोल, निर्णय क्षमता आदी बाबींमुळे राष्ट्रवादीसह मित्र पक्ष आणि विरोधी पक्षातही त्यांचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या या चाहत्यांमध्ये फक्त सर्वसामान्य माणूस किंवा कार्यकर्ताच नाही तर नेतेमंडळीही आहेत. त्याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी पुणे येथे एका जाहीर कार्यक्रमात अजितदादांचं तोंडभरुन कौतुक केलंय. त्यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जयकुमार गोरेंना डायरेक्ट ऑफरच देऊन टाकलीय.

जयकुमार गोरेंकडून अजितदादांचं कौतुक

दादांचं काम, दादांचं कर्तृत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. राजकीय विचार आमचे विरोधात असतील पण मामा, मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन दादांचा फॅन आहे. मला सांगायला काही अडचण वाटत नाही, आमचं राजकीय जमतं का तर जमतंच नाही. पण दादांची शिस्त, दादांचं धाडस, दादांचा स्पष्टवक्तेपणा… दादांचं दादांकडेच आहे दुसऱ्या कुणाकडे नाही, अशा शब्दात जयकुमार गोरे यांनी अजित पवार यांचं कौतुक केलंय.

दत्तामामांकडून जयकुमार गोरेंना ऑफर

 गोरे यांनी अजितदादांचं कौतुक केल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी त्यावर कोटी केली. भाऊ, तुम्ही ज्याप्रमाणे आज दादांचं कौतुक केलं. भाऊ तुमच्याही कामाची पद्धत मी जवळून पाहिली आहे. तुम्हीपण हाडाचा कार्यकर्ता म्हणून चांगलं काम करता. पण भाऊ ठिक आहे चुकतो तोच माणूस असतो. आज आमच्या नेत्यांचा उल्लेख तुम्ही एवढा चांगला केलाय. असाच चांगला विचार भविष्यात करा, अशी सल्लावजा ऑफरच दत्तामामांनी जयकुमार गोरेंना दिलीय.

ओमयाक्रॉन व्हेरियंटने राज्याची चिंता वाढवली : राज्यात आज 50 नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्णाची नोंद ; राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 510...

वेध माझा ऑनलाईन - दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमयाक्रॉन व्हेरियंटने राज्याची चिंता वाढवली आहे. राज्यातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकेडवारीनुसार, राज्यात आज 50 नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुले राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 510 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. तसेच आतापर्यंत 193 रुग्णांनी ओमायाक्रॉनवर मात केली आहे. 

राज्यात आज 50 ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्णाचे रिपोर्ट आले आहेत.  त्यापैकी 38 भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) तर 12 रुग्ण राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र (एनसीसीएस) यांनी रिपोर्ट केले आहेत. पुणे मनपामध्ये आज 36 रुग्ण आढळले आहेत. तर पिंपरी चिंचवड मनपा येथे आठ रुग्णाची नोंद झाली आहे. तर पुणे ग्रामीणमध्ये दोन रुग्णांची नोद झाली आहे. ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.  राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 510 वर पोहचली आहे.  



उद्यापासून कराडात 15 ते 18 वयोगटातिल मुलांसाठी लसीकरण सुरू...ब्रूस्टर डोस 10 जानेवारीला...

वेध माझा ऑनलाईन  - उद्यापासून कराडमध्ये स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय व नागरी आरोग्य केंद्र ( टाऊन हॉल) येेेेेथे विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार असल्याची माहिती नागरी आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. शीतल कुलकर्णी यांनी दिली. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रावरती ही लस देण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कोरबू यांनी दिली.

सोमवारी,शुक्रवारी ही लस देण्यात येणार आहे 
संबंधित विद्यार्थ्यांनी ओळखपत्र,आधारकार्ड सोबत आणावयाचे आहे. 10 जानेवारी पासून फ्रंटलाईन वर्कर, हाॅस्पिटलचे आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षीय व त्यापुढील वयोवृद्ध लोकांसाठी ब्रूस्टर डोस देण्यात येणार आहे,