Wednesday, June 1, 2022

कोरोना काळात सुरू झालेली दारूची होम डिलिव्हरी आता बंद करण्याचा विचार ...

वेध माझा ऑनलाइन - कोरोना काळात लोकांच्या सोईसाठी आणि गर्दी टाळण्यासाठी तयार करण्यात आलेले नियम हळूहळू बदलण्यात येत आहेत किंवा बदलण्यात येत आहेत. राज्यात आणि देशात कोरोना काळात लॉकडाऊनमुळे सर्वच ठप्प होतं. त्यामुळे सरकारी तिजोरीत पैशाचा ओघ अक्षरश: बंद झाला होता. त्यामुळेच देशातील इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही महसूल बुडत असल्याचे कारण देत दारू दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. पण दारूच्या दुकानांवर एवढी गर्दी होऊ लागली की सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची पायमल्ली होऊ लागली होती. यावर उपाय म्हणून सरकारने पुन्हा दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करून, कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही, यासाठी दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात आली.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आता कोरोनाची प्रकरणे खूपच कमी नोंदवली जात असताना, महाराष्ट्र सरकार दारूची होम डिलिव्हरी बंद करण्याचा विचार करत आहे. यासंदर्भात राज्याच्या गृह विभागाने महाराष्ट्र उत्पादन शुल्क आयुक्तांना पत्र लिहून आता दारूची होम डिलिव्हरी होणार नाही, असे पत्र दिले आहे. गृह विभागाचे म्हणणे आहे की लॉकडाऊन दरम्यान सोशल डिस्टन्सिंग सुनिश्चित करण्यासाठी होम डिलिव्हरी प्रणाली लागू करण्यात आली होती.

सध्या कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे मागे घेण्यात आली आहेत, त्यामुळे ही व्यवस्था मागे घेण्यात आली आहे. या पत्रात उत्पादन शुल्क विभागाला दारू उद्योगातील सर्व संबंधितांना माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.

गृहखात्याच्या पत्रावरून महाराष्ट्र सरकारला आता दारूच्या होम डिलिव्हरीवर बंदी घालायची आहे. होम डिलिव्हरीवर कोणताही डेटा उपलब्ध नाही. महामारीच्या काळात लाखो लोकांनी घरून दारू मागवायला सुरुवात केली. उत्पादन शुल्क विभागाचे सचिव वल्सा नायर सिंग म्हणतात की सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी लॉकडाऊन दरम्यान होम डिलिव्हरीची परवानगी होती. दारुची होम डिलिव्हरी करायची की नाही या सर्व बाबींचा विचार करून सरकार लवकरच अंतिम निर्णय घेईल, असेही ते म्हणाले. त्यामुळे आरामात घरबसल्या दारून ऑर्डर करुन एन्जॉय करणाऱ्यांना आता पुन्हा घराबाहेर पडून आपली सोय करावी लागणार आहे.

पुढच्या दोन दिवसात मान्सुन कोकणात दाखल होणार ; मुंबईत कधी? वाचा बातमी

वेध माझा ऑनलाईन - वेळेआधीच केरळमध्ये दाखल झालेला मान्सून पुढच्या दोन दिवसांत कोकणात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. एरवी 7 जूनला महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यावर्षी तीन-चार दिवस आधीच कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. केरळपासून नंतर कर्नाटकपर्यंत पोहोचलेल्या मान्सूनच्या पुढच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे दोन दिवसांत तो गोवा आणि दक्षिण कोकणात दाखल होऊ शकतो, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. असं असलं तरी मुंबईकरांना मात्र आणखी आठवडाभर मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मान्सून 10 जूननंतरच मुंबईत येईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

देशाच्या बहुतांश भागात चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं आधीच व्यक्त केला आहे. यंदा 106 टक्के पाऊस अपेक्षित आहे, तर उत्तर-पूर्व भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. IMD ने 29 मे रोजी जाहीर केले होते की नैऋत्य मान्सून 1 जून रोजी नियोजित वेळेच्या तीन दिवस आधी रविवारी केरळमध्ये पोहोचला आहे.

10 वी,12 वी च्या निकालाचा मुहूर्त लागला ; पहा कधी आहे निकाल?

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. दहावी-बारावीचे निकाल यावर्षी वेळत लागण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल हा पुढच्या आठवड्यात लागेल. हा निकाल 6 किंवा 7 जूनला लागण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागेल. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाज यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

"दहावी आणि बारावीचे निकाल वेळेत लावण्याचा प्रयत्न आहे. पुढच्या आठवड्यात 12 वीचा निकाल लागेल. दहावीचा निकाल हा जूनच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला लागू शकेल. हा निकाल 6 किंवा 7 जूनला लागू शकेल. तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार", अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.







बुधवारी एक हजारां रुग्णांचा टप्पा पार ; राज्याचं टेन्शन वाढल

वेध माझा ऑनलाइन - कोरोना संपलाय, असे म्हणत असाल तर आज राज्याची चिंता वाढवणारी  माहिती समोर आली आहे. राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्याने बुधवारी एक हजारांचा टप्पा पार केलाय. त्यामुळे राज्याचं टेन्शन वाढत चाललेय. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सक्रीय रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मुंबईने सर्वाधिक टेन्शन वाढवले आहे. राज्यातील 70 टक्के रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मागील चार पाच दिवसात राज्यातील कोरोनाची आकडेवारी वाढली आहे. सक्रीय रुग्णसंख्या चार हजार पार गेली आहे. बीए 4 आणि बीए 5 व्हेरीयंट जास्त वेगाने पसरत असल्याचं तज्ज्ञांचं निरीक्षण, मात्र धोका नाही असेही सांगिलेय.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी राज्यात एक हजार 81 नवे रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, मागील 24 तासांत एकाही कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नाही. तर 524 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.07 टक्के इतके झालेय. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 8,09,51,360 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78,88,167 (09.74 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, राज्यात सध्या चार हजार 32 सक्रीय रुग्ण आहेत. 

मुंबईने टेन्शन वाढवले - 
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी राज्यात एक हजार 81 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. राज्याच्या 70 टक्के रुग्ण एकट्या मुंबईमध्ये आढळले आहेत. त्यामुळे मुंबईने राज्याचे टेन्शन वाढलेय. मुंबईत बुधवारी 739 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. ठाणे मनपा 51, नवी मुंबई मनपा 84, वसई विरार मनपा 15, रायगड 17, पनवेल 18, पुणे मनपा 68, पिंपरी चिंचवड मनपा 10 आणि मीरा भाईंदर मनपा 17 कोरोना रुग्ण आढळले आहेत. याशिवाय राज्यातील इतर ठिकाणी कुठेही दुहेरी रुग्णसंख्या आढळली नाही. 

 मुंबई, ठाणे आणि पुण्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण
राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या चार हजार 32 इतकी झाली आहे. राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबई, ठाणे आणि पुण्यात आहेत. मुंबईत 2970, ठाणे 452 आणि पुण्यात 357 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या दुहेरी आहे. तर नंदूरबार, धुळे, लातूर, परभणी, अकोला, बुलढाणा आणि गोंदियामध्ये एकही सक्रीय रुग्ण नाही. 


सातारारोड येथील प्रगतशील शेतकरी प्रभाकर म्हमाणे यांचे अल्पशा आजाराने निधन...

वेध माझा ऑनलाइन - सातारारोड (ता. कोरेगांव) येथील प्रगतशील शेतकरी, व्यापारी प्रभाकर रंगूशेठ म्हमाणे (भाऊ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. किराणा भुसार मालाचे व्यापारी संजय म्हमाणे व किरण म्हमाणे यांचे ते वडिल होत. त्यांच्या पश्चात पत्नी,भाऊ मुले, मुली, सुना, नातवंडे,परतवंडे असा परिवार आहेे. माती सावडणे विधी गुरूवारी सकाळी सातारारोड येथे नऊ वाजता होणार आहे.

मान्सून आला महाराष्ट्राच्या दारात ...दोन दिवसात सुरू होणार धो...धो...

वेध माझा ऑनलाइन - राज्यात यंदा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून  वर्तवण्यात आली आहे. याचबरोबर राज्यात मान्सूनची चाहूल लागत आहे. राज्यातील कोकण आणि गोव्याच्या सीमेवर मान्सून पुढच्या दोन दिवसांत दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यात यंदा पाऊस 106 टक्के पडणार आहे. तसेच उर्वरित भागात 99 टक्क्यांपर्यंत पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आली आहे.

दरम्यान राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांसह कर्नाटकातील बेळगावमध्ये पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या स्थितीचा प्रभाव अनुकूल राहिल्याने मान्सूनच्या आगमनाला कोणताही अडथळा नसल्याचे सांगण्यात येत आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसांत मान्सून कोकण आणि गोव्यात पोहोचणार आहे, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दोन दिवसांपूर्वीच मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल झाल्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाने सुरुवात झाली होती.



वसंत मोरे आणि संजय राऊत यांची पुण्यात भेट ; मनसेला बसणार दणका ?

वेध माझा ऑनलाइन - मनसे नेते वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. विशेष म्हणजे पुण्यातील इतर पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यातील सुरु असलेले अंतर्गत वाद हे याआधी अनेकदा उघडपणे समोर आले आहेत. त्यामुळे वसंत मोरे मनसेला सोडचिठ्ठी देतील, अशा विविध चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर या चर्चांना आणखी खतपाणी घालणारी एक बातमी आता समोर आली आहे. पुण्यात शिवसेना नेते संजय राऊत आणि वसंत मोरे यांची भेट झाली आहे.

संजय राऊत आणि वसंत मोरे यांची पुण्यात एका लग्नात भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांनी वसंत मोरे यांच्या कामांचं कौतुक केलं आहे. याशिवाय राऊतांनी मोरे यांना तात्या म्हणून हाक मारली. त्यामुळे दोघांमध्ये एकमेकांप्रती आपुलकी जाणवली. काही दिवसांपूर्वी मनसेची ठाण्यात उत्तरसभा झाली होती. त्यावेळी वसंत मोरे यांनीदेखील भाषण केलं होतं. ते भाषण संजय राऊतांनीदेखील ऐकलं होतं, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी मोरेंचा निरोप घेत असताना पुन्हा भेटू, असं विधान केलं. त्यामुळे वसंत मोरे यांना राऊतांनी शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी ऑफर दिली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.