Wednesday, June 22, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह ; व्हीडिओ कॉन्फरन्स ने घेणार बैठक ; काँग्रेस नेते नाना पटोले यांची माहिती...

वेध माझा ऑनलाइन - राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झालेली असताना आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होत असताना कोरोनाच्या एन्ट्रीनं आता वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे. 

महाराष्ट्रातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या कमलनाथ यांनी राज्यातील काँग्रेस आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसचे राज्यातील सर्व नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे सर्व आमदार आमच्याशी संपर्कात असून ४४ पैकी ४१ आमदार बैठकीला उपस्थित होते. तर तीन आमदार मुंबईच्या दिशेनं येत आहेत, अशी माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याच्या वृ्त्तालाही नाना पटोले यांनी पुष्टी दिली. उद्धव ठाकरेंची अँटिजन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, पण आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याची अधिकृत पुष्टी अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेली नाही.

उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

उद्धव ठाकरेंसमोरचे सगळे पर्याय आता संपले ; राज्यपाल अंतिम निर्णय घेणार

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे  यांनी पुकारलेले बंड अखेर यशस्वी झाल्यात जमा आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे तब्बल ४६ आमदारांचा गट तयार झाल्याचा दावा केला आहे. आता महाविकास आघाडी सरकारकडे एकच पर्याय उरला आहे. महाविकास आघाडी सरकार विधानसभा बरखास्त देण्याचा प्रस्ताव मांडू शकते. पण, याचा निर्णय हा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हातात असणार आहे. राज्यपालाचं अंतिम निर्णय घेऊ शकतात. 

हे आघाडी सरकार आता शेवटच्या घटका मोजत आहे. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये विधानसभा बरखास्त करण्याची चर्चा केली जाणार आहे. सरकारने जर बरखास्तीचा प्रस्ताव ठेवला तर निवडणूक लागण्याची शक्यता आहे. पण विधानसभा बरखास्त करायची की नाही याचा संपूर्ण अधिकार हा राज्यपालांना असणार आहे. सरकार जर अल्पमतात आलं तर राज्यपाल हे विरोधी पक्षाला संख्याबळ सिद्ध करण्यासाठी निमंत्रण देेऊ शकते. जर निवडणूक लागली तर सेनेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे आणि शिंदे गटालाही फटका बसण्याची शक्यता आहे.

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. हीच बैठक आज अखेरची बैठक असल्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार अशी माहिती देणार आहे. त्यानंतर ते आपला राजीनामा देणार आहे, असल्याची माहिती समोर आली आहे 

Tuesday, June 21, 2022

आदित्य ठाकरेंनी स्वतःच्या नावाच्या मागे असलेला मंत्रिपदाचा उल्लेख काढला...

वेध माझा ऑनलाइन - शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून एक मोठी बातमी आली आहे. महाराष्ट्रात राजकीय भूकंप  घडवणाऱ्या एकनाथ शिंदेंची मनधरणी सुरू असतानाच हे वृत्त आलं आहे. शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवल्यानंतर बंडखोर आमदारांबरोबर असलेले एकनाथ शिंदे अधिक आक्रमक झाले आणि याच सगळ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रोफाइवरून मंत्रिपदाचा उल्लेख काढला आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत? संजय राऊतांच्या ट्वीटनं खळबळ

वेध माझा ऑनलाइन - संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट केलंय की, "महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने.."
संजय राऊतांच्या ट्वीटनं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. संजय राऊतांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत दिले असल्याचं बोललं जात आहे. 

विधानसभा बरखास्तीची दोन कारणं आहेत. जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, किंवा सत्ताधारी पक्षावर अविश्वासाचा ठराव आणवा आणि सत्ताधारी तो अविश्वासाचा ठराव जिंकू शकले नाही, तर विधानसभा बरखास्त होऊ शकते. त्यामुळे संजय राऊत यांनी केलेलं ट्वीट अत्यंत बोलकं आहे. त्यांच्या ट्वीटमुळं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. त्यांच्या ट्वीटमुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 
काही वेळापूर्वीच माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेना संघर्ष करणारा पक्ष आहे. जास्तीत जास्त सत्ता जाईल. सत्ता पुन्हा मिळू शकते, पण पक्षाची प्रतिष्ठा सर्वात वरती आहे, असं भाष्य केलं होतं. त्यानंतर काही वेळातच संजय राऊत यांनी विधान बरखास्तीचं ट्वीट केलं आहे. 
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "राज्यपालांना करोना झाला असल्याने काम थोडं धीम्या गतीने सुरु आहे. राज्यपालांना थोडं बरं वाटू द्या त्यानंतर कोणाकडे किती आमदार आहेत पाहूयात. उगाच जास्त उतावीळपणा नको. एकनाथ शिंदे आणि आमचे सर्व लोक पुन्हा स्वगृही परततील याची आम्हाला खात्री आहे." आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होणार असल्याचंही संजय राऊतांनी यावेळी सांगितलं. पुढे बोलताना "शिवसेना संघर्ष करणारा पक्ष आहे. जास्तीत जास्त सत्ता जाईल. सत्ता पुन्हा मिळू शकते, पण पक्षाची प्रतिष्ठा सर्वात वरती आहे." असं संजय राऊत यावेळी म्हणाले.  


एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर संतापले ; काय म्हणाले...? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे  यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारीच एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवलं आहे.पण, उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयावर एकनाथ शिंदे संतापले आहेत. त्यांनी हा निर्णय बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे.   शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन गुवाहाटीला पोहोचले आहेत. त्यानंतर त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलत असताना आपली भूमिका स्पष्ट केली. 'जो गटनेता निवडला गेला आहे, तो बेकायदेशीर आहे. सर्व आमदारांना एकत्र बैठक घेऊन एकमताने गटनेता निवडायचा असतो ही पद्धत आहे. बहुमताचा आकडा जो आहे, तो आमच्यासोबत आहे. त्यामुळे त्यांची निवड ही अवैध ठरू शकते, हा तांत्रिक मुद्दा आहे' असं म्हणत शिंदेंनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

'आम्ही 40 आमदार सोबत आहे. आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. आम्ही फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जे हिंदुत्व शिकवलं आहे, ते पुढे घेऊन जाणार आहोत. सत्तेसाठी कोणतीही तडजोड करणार नाही. सर्वसामान्य जनतेची जी भावना आहे, ती घेऊन पुढे जात आहोत' असं एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही सर्व सामान्य शिवसैनिक आहोत. आम्ही कुणावरही टिका करणार नाही. बाळासाहेबांच्या विचारांचे आमदार सोबत आले आहे. कुणाबद्दलही काही बोललो नाही. विकासाचं राजकारण केलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
 'उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही. मिलिंद नार्वेकर आले होते, त्यांना मी भेटलो. तुम्ही एकीकडे माणसं बोलण्यासाठी पाठवली आहे आणि दुसरीकडे मला गटनेतेपदावरून हटवलं. माझे पुतळे जाळले जात आहे. मी याआधी सुद्धा उद्धव ठाकरे यांना आमदारांची भूमिका समजावून सांगितली होती. पण बोलणी सुरु असताना मला गटनेतेपदावरून हटवलं. त्यामुळे मी आमदारांशी बोलून पुढील निर्णय घेईल असं सांगितलं, असंही शिंदेंनी स्पष्ट केलं मी आजही बाळासाहेबाचा कट्टर शिवसैनिक आहे, शिवसैनिक राहणार आहे. आनंद दिघे यांचे विचार आणि प्रेरणा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. काल आज आणि उद्या आम्ही शिवसैनिकच असणार आहोत. आमची सुरुवात ही हिंदुत्वाची होती. यात कोणतीही तडजोड करणार नाही., आम्ही कोणत्याही आमदारांना जोरजबरदस्तीने आले नाही. स्वखुशीने हे आमदार आले आहे. 40 पेक्षा जास्तीचे आमदार आज माझ्यासोबत आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आली आहे,असं एकनाथ शिंदे म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण ; एकनाथ शिंदे आणि कोश्यारी यांची भेट लांबणीवर...?

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंद यांनी शिवसेनेचे आमदार फोडून शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. 33 पेक्षा जास्त आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी मोठ्या बंदोबस्तात मध्यरात्री गुवाहाटीला दाखल झाले.आता एकनाथ शिंदे हे मुंबईकडे रवाना होणार असल्याचे बोलले जात आहे. राज्यपाल यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे.  परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने पुन्हा भेट होणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने राज्यातील शिवसेनेविरोधातील आणखी तीन दिवस बंड कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे पुढचे तीन दिवस महत्वाचे असल्याचे बोलले जात असल्याने राज्यात पुढे काय होणार हे पुढच्या तीन दिवसांत समजणार आहे. एकनाथ शिंदे आज मुंबईला राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीसाठी येणार असल्याचे सांगण्यात आले होते. 

ठाकरे सरकार धोक्यात; एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांचा फोटो व्हायरल, स्वतंत्र गट स्थापन होणार!राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात जाणार !

वेध माझा ऑनलाइन -  शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आता स्वतंत्र गट स्थापन करण्याची आता दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा फोटो व्हायरल झाला आहे. शिंदे यांनी स्वतंत्र गटासाठी आवश्यक असलेली 37 ही संख्या पूर्ण केली असल्याचे सध्या चित्र आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुंबईत दाखल झाले आहेत. आज भाजप आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडणार आहेत.

सूरतमध्ये मंगळवारी दिवसभरानंतर रात्री उशिराही राजकीय घडामोडी घडल्या आहेत. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू हेदेखील शिवसेनेच्या आमदारांसोबत आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाला आहे. व्हिडिओत आमदार एका निवेदनावर स्वाक्षरी करत असल्याचे दिसत आहे. हे निवेदन विधानसभेत स्वतंत्र गटासाठी मान्यता द्यावी यासाठी होते असल्याचे म्हटले जात आहे. 
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचे पत्र आज राजभवनात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर सरकार अल्पमतात असल्याचे सांगून लवकरच विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल देण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या 37 आमदारांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाल्यास सरकार थेट अल्पमतात जाण्याची शक्यता आहे.