Thursday, August 4, 2022

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना चौकशीसाठी उद्या सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश ; पत्राचाळ प्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स;

वेध माझा ऑनलाइन - शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED)  समन्स बजावलं आहे.  पत्राचाळ प्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स बजावले आहे. वर्षा राऊत यांना चौकशीसाठी उद्या सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी  जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी करण्यात आली होती.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडीने कोठडी सुनावली आहे. राऊतांच्या पत्नी वर्षा यांच्या खात्यावरुन झालेल्या व्यवहाराबाबत राऊत माहिती देत नसल्याचा आरोप ईडीनं कोर्टात केला. ज्यांच्याशी व्यवहार झालाय त्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याचं ईडीनं पीएमएलए कोर्टाला सांगितलं. दरम्यान 1 कोटी 17 लाखाच्या व्यवहाराबाबत तपास सुरु असून यापूर्वी 1 कोटी 6 लाखांच्या  व्यवहाराची माहिती मिळाल्याचं ईडीनं कोर्टात सांगितलं. या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी ईडीने समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथ शिंदेंची तब्बेत बिघडली ;सर्व प्रशासकीय कार्यक्रम रद्द ; बंडखोर आमदार अपात्र ठरले तर पर्याय काय यासंदर्भात देवेंद्र फडणवीस पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता ; फडणवीस दिल्लीला रवाना...

वेध माझा ऑनलाईन - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. सततचे दौरे, सभा, कार्यक्रम यामुळे एकनाथ शिंदे यांना थकवा जाणवत असल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टरांनी त्यांना सक्त विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली असल्याने सर्व प्रशासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे यांचे सतत दिल्ली दौरे सुरु आहेत. याशिवाय महाराष्ट्र दौरा, उद्धाटनाचे कार्यक्रम, सत्कार समारंभ, जाहीर सभा, बैठका यामध्ये एकनाथ शिंदे सतत व्यस्त आहेत. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला असून त्यांना थकवा जाणवू लागला आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान दुसरीकडे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. फडणवीसांनीही आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्याचं कारण समजू शकलेलं नाही. मात्र मंत्रिमंडळ विस्तार आणि आज सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीसंदर्भात दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला आणि बंडखोर आमदार अपात्र ठरले तर भाजपासमोर काय पर्याय आहेत यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांची पक्षश्रेष्ठींशी दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

आमदारांच्या अपात्रतेचं काय? सुप्रीम कोर्टात काय घडलं?
बंडखोर आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार मात्र अद्याप कायम आहे. सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून दाखल सहा याचिका एकत्र केल्या असून त्यावर एकत्रित सुनावणी सुरु आहे.
दरम्यान सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी झाली असता पुन्हा एकदा शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी १० व्या सूचीचा मुद्दा उपस्थित केला. पक्षांतरबंदी कायदा हा असंतोष विरोधी कायदा असू शकत नाही असा युक्तिवाद हरिश साळवे यांनी केला. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्याची गरज नाही असं मत मांडलं. दरम्यान सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करु शकत नाही असं सांगत त्यांना पुढील सुनावणीपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका अशी सूचना केली आहे. सोमवारी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

राऊतांचा कोठडीतील मुक्काम वाढला ; राऊत यांचे ईडी कोठडीवर आरोप...

वेध माझा ऑनलाइन - राजधानी मुंबईतील पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी 1 हजार 34 कोटी रुपयांच्या  झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत  चांगलेच अडचणीत आहेत. अनेक तासांच्या चौकशीनंतर अखेर ईडीने संजय राऊत यांना अटक केली. त्यानंतर, न्यायलयाने राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. संजय राऊत यांना आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. आता, राऊतांचा कोठडीतील मुक्काम आणखी 4 दिवस वाढला आहे. तत्पूर्वी राऊत यांनी ईडी कोठडीवर काही आरोप केले आहेत.

पत्रा चाळ प्रकरणी संजय राऊत यांना यापूर्वी 15 दिवसांची कोठडी ईडीने मागितली होती. मात्र, न्यायालयाने केवळ 4 दिवसांची कोठडी दिल्यामुळे संजय राऊत यांना जामीन मंजूर होऊन दिलासा मिळणार की, कोठडीत वाढ होणार, याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे राऊत यांचा कोठडीतील मुक्काम आणखी काही काळ वाढला आहे. आम्हाला आणखी काही महत्त्वाची कागदपत्रे तपासायची आहेत. जे अलिबागमधील जमिन व्यवहाराशी संबंधित आहेत, असा दावा ईडीने न्यायालयात केला होता. तसेच, 10 ऑगस्टपर्यंत राऊत यांची कोठडी देण्यात यावी, अशी मागणी ईडीने केली होती. मात्र, न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली.   
दरम्यान, मला ह्रदयविकाराचा त्रास असूनही मला जिथे ठेवलंय तिथं व्हेंटिलेशन नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यावर, राऊत यांना एसी रुममध्ये ठेवलंय, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले. संजय राऊत यांच्यावर सगळे आरोप जुनेच आहेत, यात नवीन काहीही नाही. तसेच, त्यांच्यावरील आरोप आणि ही कारवाई राजकीय हेतुने करण्यात आल्याचेही राऊतांचे वकिल मनोज मोहिते यांनी न्यायालयात म्हटले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवनिमित्त काँग्रेसकडून स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा होणार सन्मान ; जिल्ह्यात पदयात्रेचे आयोजन...

वेध माझा ऑनलाइन - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सातारा जिल्ह्यात काँग्रेस कडून 75 कि. मी. पदयात्रेचे आयोजन केले जाणार आहे. याच्या नियोजनाची बैठक आज कराड दक्षिण काँग्रेस कमिटी च्या वतीने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, प्रा. धनाजी काटकर, कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा विदयाताई थोरवडे, जि प सदस्या मंगल गलांडे, पं स सदस्या वैशाली वाघमारे, मलकापूर नगराध्यक्षा नीलम येडगे, जि प सदस्य शंकरराव खबाले, पं स सदस्य नामदेवराव पाटील, आदिसह काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे नियोजन कराड दक्षिण काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले होते.

 यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. ब्रिटिश सत्तेविरोधात देशातील जनतेने एक लढा उभारला त्या लढ्याला चळवळीचे स्वरूप काँग्रेसने निर्माण केले. यावेळी महात्मा गांधींनी पुढाकाराने अहिंसेच्या मार्गाने, सत्याग्रहाच्या मार्गाने देशात एक लोकचळवळ उभी केली. या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा व लढ्याचा इतिहास पुन्हा एकदा जागविण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर काँग्रेस पक्षाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने पदयात्रा काढण्यात येणार आहे. अशी पदयात्रा आपल्या जिल्ह्यात सुद्धा काढली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक तालुका काँग्रेस कमिटी आपापल्या ब्लॉक मध्ये पदयात्रेचे नियोजन करणार आहे.

Wednesday, August 3, 2022

 वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यातील मतदारांचे निवडणूक ओळखपत्र आधार कार्डाशी लिंक करण्याचा कार्यक्रम एक ऑगस्ट पासून सुरू झाला आहे. यासाठी छापील नमुना अर्ज नंबर 6 भरून तो मतदान केंद्र अधिकारी यांच्याकडे द्यावा, असे आवाहन सातारा जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत केले. या कार्यक्रमासाठी अंतिम मुदत 31 मार्च 2023 देण्यात आली आहे.

ते पुढे म्हणाले सातारा जिल्ह्यामध्ये एकूण मतदान केंद्रांची संख्या 2980 आहे. यामध्ये पुरुष मतदार 13 लाख 16 हजार 216, स्त्री मतदार 12 लाख 56 हजार 752, तृतीयपंथी 62, सैनिक मतदार 12983 व दिव्यांग मतदार 15 हजार 416 असे एकूण 25 लाख 73 हजार तीस आहे . मतदारांनी मतदारांची ओळख प्रस्थापित करण्यासाठी यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी आधार क्रमांक व मतदार ओळखपत्र हे लिंक करण्याचा कार्यक्रम जिल्ह्यात एक ऑगस्ट 2022 पासून सुरू झालेला आहे.
मतदार यादीतील विद्यमान मतदारांना त्यांचा आधार क्रमांक करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक सहा तयार करण्यात आला आहे. ऑनलाइन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी सुविधा देण्यात आली आहे. http://www.nvsp.in/ या संकेत स्थळावर ही सुविधा उपलब्ध आहे. मतदारांनी नमुना अर्ज क्रमांक सहा भरून ऑफलाइन पद्धतीने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावा. एक जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित विशेष पुननिर्रीक्षण कार्यक्रम घेतला आहे. त्यात वर्षातील1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर पात्र होणाऱ्या मतदारांना मतदार यादीमध्ये नाव नोंदवता येणार आहे. या ऑनलाईन ऍपमध्ये 17 वर्ष पूर्ण करून अठरा वर्षात पदार्पण करणाऱ्या तरुण मतदारांना फ्युचर क्लेम नावाचे नवीन ऑप्शन देण्यात आला आहे. हा लिंकिंग कार्यक्रम 31 मार्च 2023 पर्यंत चालणार आहे.
मतदार यादीतील तपशील प्रमाणीकरण करण्यासाठी मनरेगा जॉब कार्ड, बँक पासबुक, आरोग्यविमा स्मार्ट कार्ड, चालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय पारपत्र, फोटोसहीत पेन्शन कागदपत्र, ओळख पत्र, संसद सदस्यांनी जाहीर केलेल्या ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय जारी केलेले विशेष ओळखपत्र यापैकी कोणत्याही एका कागदपत्राची आवश्यकता आहे. 


आजचे सातारा जिल्ह्याचे कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 24 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे तर 54 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 2 खंडाळा 0 खटाव 1 कोरेगांव 2 माण 1 महाबळेश्वर 0 पाटण 3 फलटण 1 सातारा 10 वाई 0 व इतर 0
आणि नंतरचे वाढीव 4 असे  आज अखेर एकूण 24 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 54 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

स्व. जयवंतराव भोसले यांच्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी व्याख्यान

वेध माझा ऑनलाइन - कृष्णाकाठच्या सहकार, आरोग्य आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार दि. ५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजता कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमधील सभागृहात व्याख्यानाचे आयोजत करण्यात आले आहे. 

सहकारमहर्षी जयवंतरावजी भोसले (आप्पा) स्मारक समिती, अतुल भोसले युवा प्रतिष्ठान व कृष्णा उद्योग समूहातील सर्व संस्थांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सहकार व ज्येष्ठ नागरिक चळवळीचे पुणे येथील ज्येष्ठ नेते अरुण रोडे यांचे ‘ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व उपाय’ या विषयावर व्याख्यान होणार असून, अध्यक्षस्थानी कराड येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक सुभाष वाडीलाल शहा असणार आहेत. तसेच य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी (ता. ५) सकाळी ८.३० वाजता कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील स्व. आप्पांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पार्पण व अभिवादन केले जाणार असून, या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.