Thursday, August 4, 2022

राऊतांचा कोठडीतील मुक्काम वाढला ; राऊत यांचे ईडी कोठडीवर आरोप...

वेध माझा ऑनलाइन - राजधानी मुंबईतील पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी 1 हजार 34 कोटी रुपयांच्या  झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत  चांगलेच अडचणीत आहेत. अनेक तासांच्या चौकशीनंतर अखेर ईडीने संजय राऊत यांना अटक केली. त्यानंतर, न्यायलयाने राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. संजय राऊत यांना आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. आता, राऊतांचा कोठडीतील मुक्काम आणखी 4 दिवस वाढला आहे. तत्पूर्वी राऊत यांनी ईडी कोठडीवर काही आरोप केले आहेत.

पत्रा चाळ प्रकरणी संजय राऊत यांना यापूर्वी 15 दिवसांची कोठडी ईडीने मागितली होती. मात्र, न्यायालयाने केवळ 4 दिवसांची कोठडी दिल्यामुळे संजय राऊत यांना जामीन मंजूर होऊन दिलासा मिळणार की, कोठडीत वाढ होणार, याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे राऊत यांचा कोठडीतील मुक्काम आणखी काही काळ वाढला आहे. आम्हाला आणखी काही महत्त्वाची कागदपत्रे तपासायची आहेत. जे अलिबागमधील जमिन व्यवहाराशी संबंधित आहेत, असा दावा ईडीने न्यायालयात केला होता. तसेच, 10 ऑगस्टपर्यंत राऊत यांची कोठडी देण्यात यावी, अशी मागणी ईडीने केली होती. मात्र, न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली.   
दरम्यान, मला ह्रदयविकाराचा त्रास असूनही मला जिथे ठेवलंय तिथं व्हेंटिलेशन नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यावर, राऊत यांना एसी रुममध्ये ठेवलंय, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले. संजय राऊत यांच्यावर सगळे आरोप जुनेच आहेत, यात नवीन काहीही नाही. तसेच, त्यांच्यावरील आरोप आणि ही कारवाई राजकीय हेतुने करण्यात आल्याचेही राऊतांचे वकिल मनोज मोहिते यांनी न्यायालयात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment