Friday, February 3, 2023

अखेर उड्डाणपुल पाडण्याबाबतच्या अधिसूचना जारी ; कधीपासून पूल पाडण्याला होणार सुरुवात ? शनिवार 5 फेब्रुवारी मध्यरात्रीपासून वाहतुकीत होणार बदल..सविस्तरपणे वाचा बातमी

वेध माझा ऑनलाईन -  कोल्हापूर नाका येथील उड्डाणपूल पाडण्यासंदर्भात सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्यासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून म्हणजेच दि. 5 फेब्रुवारी रात्री 12 वाजलेपासून वाहतूक वळविण्यात येणार आहे पूल पाडण्याचे काम 25 मार्चपर्यंत चालणार आहे. तर उड्डाणपूल तयार करण्यासाठी 20 महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.

 वाहतूकीत बदल पुढीलप्रमाणे... 
1) कोल्हापुर कडुन सातारा बाजुकडे जाणारी वाहतुक ढेबेवाडी फाट्यावरील ओव्हरब्रिज कराड बाजुस ज्या ठिकाणी संपतो. तेथे पश्चिमेकडील सेवारस्त्यावर वळविण्यात येणार आहे. 
2) कोल्हापुरहून कराडमध्ये येणारी वाहने हि एकेरी वाहतुकीने वारुंजी फाटा पर्यंत येतील तेथुन पुढे
अ) जड वाहतुक हि वारुंजी फाटा येथुन हॉटेल पंकज समोरुन सेवारस्त्यामार्ग महात्मा गांधी
पुतळयासमोरुन कराडमध्ये जाईल.
ब) हलकी वाहतुक हि वारुंजी फाटा येथुन जुना कोयना ब्रिज मार्गे कराडमध्ये जाईल.
3) कराड शहरामधुन कोल्हापुर नाका येथे बाहेर पडणाऱ्या वाहनासाठी
अ) कोल्हापुर बाजुकडे जाण्यासाठी सेवारस्ता मार्गाचा वापर करुन जाता येईल.
ब) कराडमधुन सातारा कडे जाणारी वाहने भादी हार्डवेअर समोरुन उजवीकडे यु-टर्न घेवुन
नंतर इंडिअन ऑइल पेट्रोलपंपाजवळ सर्विसरोडला मिळणार आहेत.
4) सातारा ते कोल्हापुरकडे जाणारी वाहतुक हॉटेल पंकज समोरुन पश्चिमेकडील कोल्हापुर सातारा लेनवर वळविण्यात येईल व कोल्हापुर नाक्यावरील ब्रिज संपलेनंतर पुर्वेकडील सेवारस्त्यावर एकेरी मार्गाने घेण्यात येईल. कृष्णा हॉस्पिटल समोरील ब्रिजसंपले नंतर गंधर्व हॉटेलजवळ वाहतुक पुर्ववत महामार्गावर घेण्यात येईल.
5) सातारा कडुन कोल्हापुरकडे (वारूंजी फाटा ते गंधर्व हॉटेल) व कोल्हापुर कडुन सात्ताराकडे (कोयना वसाहत ते वारुंजी फाटा) जाणारी वाहतुक हि एकेरी वाहतुक असलेने विरुद्ध दिशेने वाहने चालविण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच सदर मार्गावर कोणतेही प्रकारची वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे.
6) कराड बाजुकडुन ढेबेवाडीकडे जाणारी वाहतुक हि कोल्हापुर नाका ते ढेवेवाडी फाटा पर्यंत एकेरी मार्गाने ढेबेवाडी फाटापर्यंत जावुन ब्रिज खालुन ढेबेवाडीकडे जाईल.
7) ढेबेवाडी बाजुकडुन कराड शहराकडे येणारी वाहतुक हि ढेबेवाडी फाटा येथुन पश्चिमेकडील सेवारस्त्याने वारुंजी फाटा मार्गे कराडमध्ये येईल.
8) जड वाहतुक (ओडीसी वाहने) हि फक्त रात्रीच्या वेळी वाहतुकीस परवानगी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
9) कोल्हापुर नाका ते पंकज हॉटेल या मार्गावर असणार भुयारी मार्ग बंद राहील.

Thursday, February 2, 2023

लिबर्टी" मंडळाच्या क्रीडांगणावर "मुख्यमंत्री चषक 2023" राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन...4 ते 9 फेब्रुवारीला स्पर्धा; जोरदार तयारी सुरू...


वेध माझा ऑनलाईन - 
75 वर्षाची दैदिप्यमान परंपरा असलेल्या लिबर्टी मंजूर मंडळाच्या क्रीडांगणावर दिनांक 4 ते 9 फेब्रुवारी या कालावधीमध्ये "मुख्यमंत्री चषक 2023" भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लिबर्टी मंजदूर मंडळाचे सचिव रमेश जाधव यांनी दिली 
या स्पर्धेचे आयोजन मुख्यमंत्री शिंदे यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे कराडचे सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील यांनी केले आहे
दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता  राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन तर आमदार शहाजी बापू पाटील आमदार अनिल बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून दिनांक 6 फेब्रुवारी रोजी पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. 

राज्यातील नामांकित कबड्डी संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, कोल्हापूर, सांगली, पुणे येथील 16 पुरुष व 12 महिला संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धा होत असून राज्य असोसिएशन स्पर्धा निरीक्षक पंच, प्रमुख पंच यांची नियुक्ती करून स्पर्धेचे नियोजन चांगले व्हावे. यासाठी सहकार्य केले आहे. दरम्यान दिनांक 8 व 9 फेब्रुवारी रोजी वजनी गट 35 किलो, 55 किलो मुले या गटातील कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून जिल्हा पातळीवरील सुमारे 50 संघ सहभागी होणार आहेत. याचे उद्घाटन दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता होणार असून पारितोषिक वितरण दिनांक 9 रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तरी शहरातील क्रीडा रसिक बंधू भगिनींनी आवश्यक उपस्थित राहून क्रीडापटूंना प्रोत्साहन देऊन खेळाचा आनंद घ्यावा. असे आवाहन लिबर्टी मंजूर मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

पुरुष खुला गट बक्षीस : प्रथम क्रमांक - 1,11,111 व चषक, द्वितीय क्रमांक - 55,555 व चषक, तृतीय क्रमांक - 22,222 व चषक, चतुर्थ क्रमांक - 22,222 व चषक, अष्टपैलू खेळाडू - 3,333 व चषक, उत्कृष्ट चढाई  - 2,222 व चषक, उत्कृष्ट पक्कड - 2,222 व चषक. महिला खुला गट बक्षीस : प्रथम क्रमांक  - 55,555 व चषक, द्वितीय क्रमांक - 33,333 व चषक, तृतीय क्रमांक - 11,111 व चषक, चतुर्थ क्रमांक - 11,111 व चषक, अष्टपैलू खेळाडू - 2,222 व चषक, उत्कृष्ट चढाई  - 1,111 व चषक, उत्कृष्ट पक्कड - 1,111 व चषक. तसेच 35 किलो आणि 55 किलो गटातील खेळाडूंनाही रोख रक्कम व चषक देण्यात येणार आहे. 

नोंदलेल्या निमंत्रित संघानी विजय गरुड (9421680836), भास्कर पाटील (7218675399), जितेंद्र जाधव (9823342444), धनराज शेटे (7778840642), फिरोज पठाण (9867090015) यांच्याशी संपर्क साधावा असा संयोजकांनी आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री चषक कराडात होतोय प्रथमच!
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने कराड येथे लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर प्रथमच "मुख्यमंत्री चषक 2013" राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रणजीत नाना पाटील मित्र परिवाराच्यावतीने देण्यात आली आहे.

सत्यजित तांबेंचा महाआघाडीला धक्का ! ;

वेध माझा ऑनलाईन - नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची राज्यभरात चांगलीच चर्चा झाली होती. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा देिला. महाविकास आघाडीच्या या निर्णयानंतर भाजप सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार का? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र भाजपने शेवटपर्यंत आपली भूमिका जाहीर केली नाही. मात्र निवडणुकीपूर्वी भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीचं समर्थन केल्यानं निवडणुकीमध्ये मोठी चूरस निर्माण झाली होती. आज या जागेसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिल्याच फेरीत सत्यजित तांबे यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

सत्यजित तांबे आघाडीवर 
सत्यजित तांबे यांनी पहल्या फेरीत आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत एकूण 28 हजार मतांची मोजणी झाली. त्यापैकी सत्यजित तांबे यांना एकूण 15784 मत पडली. तर शुभांगी पाटील यांना 7872 मतांवर समाधान मानावं लागलं आहे. तर 2 हजार 741 मत बाद झाली आहेत. पहिल्या फेरीत सत्यजित तांबे यांनी जवळपास आठ हजारांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या फेरीत देखील सत्यजित तांबे हे आघाडीवर आहेत.

दुचाकीसह अल्पवयीन प्रेमी युगल विहिरीत पडले ; युवतीचा मृत्यू ;

वेध माझा ऑनलाईन - सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  दोन वेगवेगळ्या गावातील अल्पवयीन प्रेमीयुगुल मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीसह विहिरीत पडल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेत  युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर युवक बचावला. या घटनेबाबत तासगाव पोलिसात नोंद झाली आहे. या घटनेनं अवघा तालुका हादरला आहे. या घटनेचा पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील अल्पवयीन युवक तालुक्यातील पश्चिम भागातील एका गावातील आहे. त्याची मावशी तालुक्यातील दुसऱ्या एका गावात राहते. त्याचे मावशीकडे जाणे-येणे होते. मावशीच्या जवळपास संबंधित युवती राहत होती. यातून त्यांचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती. यातून त्या दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या.
माहिती अशी मिळाली की,  मध्यरात्रीच्या सुमारास या प्रेमीयुगुलाची भेट झाली होती. त्यानंतर त्यांनी गावाबाहेर जाऊन निवांत ठिकाणी जाऊन बसण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे अल्पवयीन प्रेमीयुगुल गावाशेजारी असणाऱ्या एका ठिकाणी गेले होते. काही वेळानंतर त्या युवतीला घरी सोडण्यासाठी ते दोघे जण दुचाकीवरून घरी परतत होते. यावेळी वाटेत अंधार असल्याने युवकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. आणि अचानक रस्त्याशेजारी असणाऱ्या विहिरीत ते दोघेजण दुचाकीसह कोसळले.
युवतीला पोहता येत नसल्यानं बुडून झाला मृत्यू
युवकाला पोहता येत असल्याने तो बचावला आणि रात्री तो विहिरीबाहेर आला, पण युवतीला पोहता येत तसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर युवतीच्या पालकांनी तासगाव पोलिसात संबंधित युवकांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिस अधिक तपास करत आहेत .


नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुक ; देवेंद्र फडणवीसांच्या होम पीचवरच भाजपला दणका ; महाविकास आघाडीचा विजय.

वेध माझा ऑनलाईन - नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले यांनी भाजप पुरस्कृत ना. गो. गाणार यांचा दणदणीत पराभव केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या होम पीचवरच महाविकास आघाडीने विजय मिळवल्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आज सकाळी ८ वाजण्यापासूनच मतमोजणीला सुरुवात झाली.  काँग्रेसचे सुधाकर आडबाले आणि भाजपचे ना. गो. गाणार यांच्यात मुख्य लढत होती. यामध्ये आडबाले यांना आत्तापर्यंत १४०६९ हजारांहून अधिक मते मिळाली आहेत तर ना. गो. गाणार याना ६३६६ मते मिळाली आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आडबोले यांच्या विजयाचा दावा केला आहे. भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचा भाजपला दणका. नागपूर शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सुधाकर अडबोले विजयी असं ट्विट नाना पटोले यांनी केलं आहे.
दरम्यान, कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपने बाजी मारली आहे. भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या बाळाराम पाटील यांना पराभूत केलं आहे. परंतु अमरावती, औरंगाबाद आणि नागपूर मतदारसंघात मात्र भाजपचे उमेदवार पराभवाच्या छायेत आहेत. औरंगाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे आघाडीवर आहेत तर अमरावतीत पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर आहेत. एकूण निकाल पाहता महाविकास आघाडी भाजपपेक्षा वरचढ ठरली आहे

Wednesday, February 1, 2023

जय जय महाराष्ट्र माझा गीताला महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून मान्यता ; या गीतामधील "दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा" या शब्दांना कात्री लावल्याचा आरोप ; काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन- 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' गीताला महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून मान्यता मिळाली आहे. मंगळवारी (३१ जानेवारी) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे गीत अंगिकारण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची घोषणा केली होती दरम्यान एका बाजूला या गीताची राज्यगीत घोषणा झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला या गीतावरुन वादाचीही सुरुवात झाली आहे. या राज्यगीताला वेळमर्यादा असल्यानं या गीतामधील काही शब्दांना कात्री लावण्यात आली आहे. पण कात्री लावलेले हे शब्द "दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा" असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे. दिल्लीतील काही भाजप नेत्यांना हे वाक्य अडचणीच ठरणार असल्यानेच ते गीतामधून वगळ्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि अॅड. असीम सरोदे यांनी सुधाकर जाधव यांच्या पोस्टचा आधार घेत केला.

नेमकं सत्य काय? "दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा" हे शब्द वगळले का?
महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयने मंगळवारी (३१ जानेवारी) हा निर्णय जाहीर केलेल्या ट्विटमध्ये "दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा" हे शब्द वगळले नसल्याचं दिसून येतं. जी दोन चरण स्वीकारण्यात आली आहेत, त्यामध्ये "दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा" या शब्दांचा उल्लेख आढळून येतो. तसंच आज वाद झाल्यानंतही माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयने या गीताची कॉपी पुन्हा एकदा प्रसिद्ध केली.
कविवर्य राजा नीळकंठ बढे यांच्या “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीतामधील २ चरणांचे गीत महाराष्ट्राचे #राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यगीत गायन, वादन यासंदर्भातील औचित्याचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 

महाराष्ट्र सरकारने मंगळवारी (३१ जानेवारी) रोजी ट्विट केलेलं राज्यगीत :
मूळ गाणं कसं आहे?
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ...
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ...

नेमकं कोणतं कडवं वगळलं?
याच मूळ गाण्यातील या तीन कडव्यांपैकी वेळ मर्यादेमुळे "रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा, जय जय महाराष्ट्र माझा..." हे पहिलं कडवं वगळण्यात आलं आहे. मात्र दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा हे वाक्य असलेलं कडवं कायम ठेवण्यात आलं आहे.

महाराष्ट्र राज्यगीत गायन, वादन संदर्भातील काही मार्गदर्शक सूचना असणार आहेत. त्या पुढीलप्रमाणे :
१) शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सुरुवातीस राज्यगीताचे गायन वादन हे
ध्वनीमुद्रीत आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे.
२) १ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजविले / गायले
जाईल.
3) राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी, परिपाठ / प्रतिज्ञा / प्रार्थना / राष्ट्रगीत
यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल.
4) राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था,
खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरीकांना सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक
कार्यक्रम इत्यादी मध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजविण्यास / गाण्यास
मुभा राहील.
5) राज्यगीत सुरु असतांना सर्वानी सावधान स्थितीत उभे राहावे व राज्य गीताचा सन्मान
करावा. लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती तसेच वृध्द व्यक्ती
यांना सावधान उभे राहण्यापासून सूट असेल.
6) राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुध्दा
बाळगण्यात यावे. हे गीत वाजवितांना/ गातांना त्याचा योग्य तो सन्मान राखण्यात यावा.
7) वाद्यसंगीतावर आधारीत या गीताची वाद्यधून पोलीस बॅडमार्फत वाजविता येईल.
8) राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये या राज्यगीताचा समावेश पुढील
शैक्षणिक वर्षापासून करण्यात यावा.
9) या राज्यगीताच्या प्रभावी प्रचार व प्रसिध्दीसाठी सर्व विभागांनी आपल्या अधिनस्त
आस्थापनांस / कार्यालयांस सूचना द्याव्यात.
10) माहिती व जनसंपर्क संचालनालयाकडून राज्यगीताचा प्रचार / प्रसार करण्यासाठी
विशेष मोहिम आखण्यात यावी. त्यासाठी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे तसेच
समाज माध्यमांचाही सुयोग्य वापर करण्यात यावा.
11) या अधिकृत राज्यगीताची लिंक राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या
संकेत स्थळावर उपलब्ध राहील.

15 वर्षापूर्वीची वाहने निघणार भंगारात ; निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार

वेध माझा ऑनलाईन - वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी 15 वर्षाहून अधिक काळ झालेली वाहने भंगारात निघणार आहेत. सदरचा निर्णय येणाऱ्या 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

या कायद्या अंतर्गत 15 वर्षांहून अधिक जुन्या सर्व शासकीय वाहनांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय व महामंडळाकडे असणारी वाहने भंगारात जाणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 190 हून अधिक वाहने भंगारात जाणार आहेत. शासन जुन्या वाहनांचा वापर बंद करण्याबाबत सातत्याने निर्णय घेत असून, त्या दिशेने शासनाचे काम सुरू आहे. त्यामुळे 15 वर्षांपेक्षा जुनी वाहने आता वाहनचालकांना रस्त्यावर घेऊन फिरता येणार नाही. सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत जिल्ह्यात 15 वर्षांपेक्षा जुनी वाहने असलेल्या वाहनांची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे.