Tuesday, September 26, 2023

सोयाबीन, कापूस, ऊस उत्पादनवाढीसाठी प्रयत्न; धनंजय मुंडे जाणार ब्राझीलला!

वेध माझा ऑनलाइन। ब्राझीलच्या राजकीय दूतावासामार्फत ब्राझील सरकारमधील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंगळवारी, (26 सप्टेंबर) राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. मुंबई येथे झालेल्या या भेटीत कृषी, कृषी व्यापार आणि गुंतवणूक या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी, धनंजय मुंडे यांनी पारंपरिक पद्धतीने ब्राझीलच्या शिष्टमंडळातील अधिकाऱ्यांचे स्वागत केले.

ब्राझीलच्या या शिष्टमंडळात ब्राझील दूतावासाचे सचिव तथा व्यापार व गुंतवणूक विभागाचे प्रमुख वेगनर, भारतीय दूतावासातील राजदूत केनेथ नोब्रेगा, कौन्सिल जनरल जोआओ मेंदोना, कृषी विभागाचे अँजिलो किरोज हे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये आणि कृषिमंत्री मुंडे यांच्यामध्ये कृषीविषयक अनेक बाबींवर सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेची उपरती म्हणुन ब्राझिलीयन शिष्टमंडळाकडून धनंजय मुंडे यांना ब्राझील भेटीचे निमंत्रण मिळाले आहे. याशिवाय, मुंडे यांना दिल्लीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.
ब्राझीलच्या शिष्टमंडळाने भारतीय दूतावासाच्या मार्फत आज मुंबई येथे भेट घेऊन कृषी, कृषी व्यापार व गुंतवणूक आदी क्षेत्रातील विषयांवर चर्चा केली. 
ब्राझिलीयन शिष्टमंडळ आणि कृषिमंत्र्यांमध्ये नक्की काय चर्चा झाली?
ब्राझीलमधील कृषिविषयक विविध गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी विद्यापीठाच्या संशोधकांना ब्राझीलला पाठवण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. कमी पावसात जास्तीत जास्त उत्पादित होणारे सोयाबीन, वातावरणातील बदल आणि त्यानुसार शेतीमध्ये करण्यात येणारे प्रयोग, त्याचे संशोधन, कमी पाण्यात उसाचे अधिकाधिक उत्पादन करणे तसेच बेदाणेची ब्राझीलमध्ये मोठी मागणी असल्याने त्यावरील आयात कर कमी करणे, ब्राझील या देशासोबत तेथील यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या बाबी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी कृषी विद्यापीठाचे संशोधक यांना ब्राझीलला पाठवण्याबाबत चर्चा झाली.

अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर;

वेध माझा ऑनलाइन। ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्वीट करून ही घोषणा केली आहे. त्यानंतर वहिदा रेहमान यांच्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वहिदा रेहमान यांचे अभिनंदन केले आहे. तसेच शरद पवारांनीही ट्वीट करत वहिदा रेहमान यांचे कौतुक केले आहे.

ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यापासून हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा आणि नृत्याचा ठसा उमटवणाऱ्या वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यामुळे योग्य व्यक्तिचा सन्मान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. वहिदा रेहमान अभिनेत्री म्हणून जेवढ्या मोठ्या आहेत, तेवढ्याच एक व्यक्ती म्हणूनदेखील मोठ्या आहेत. देवआनंद यांचे हा 100वा जन्मदिवस आहे. या निमित्ताने मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दोन दिवसांपूर्वी त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. गुरुदत्त, देवआनंद, संजीव कुमार, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बड्या कलाकारांसोबत काम करूनही त्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले. असे कलाकार फार दुर्मिळ असतात.
भारतीय सिनेसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल व उत्कृष्ट अशा अभिनयाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन..!
प्यासा, कागज के फुल, चौदवी का चांद, साहेब बिवी और गुलाम, गाईड, खामोशी, बीस साल बाद आदी शेकडो चित्रपटांमध्ये अभियनाचे चार चांद लावणाऱ्या वहिदा रेहमान अगदी अलीकडच्या ‘दिल्ली 6’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. 

राष्ट्रवादीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर ;

वेध माझा ऑनलाइन।  सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गट जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आलेली आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बळकट करण्यासाठी आगामी काळात सक्षमपणे कामकाज पाहण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली असून लवकरच पुढील निवडी जाहीर करण्यात येणार आहेत.

तीस वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेले संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी केल्याने फलटण शहरात तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जल्लोष करण्यात येत आहे.

संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष, पंचायत समिती सभापती यासोबतच अनेक पदांवर आपला ठसा उमटवलेला आहे.

भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा अखिल मराठी पत्रकार संघाच्यावतीने निषेध व्यक्त ; पत्रकारांचा अपमान केल्याप्रकरणी कराड दौऱ्यात त्यांना जाब विचारणार ; कराडच्या पत्रकारांच्या बैठकीत निर्धार ;


वेध माझा ऑनलाइन। भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत पत्रकारांबद्दल केलेल्या अपमानकारक वक्तव्याबद्दल संपुर्ण राज्यात   विविध पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांचा निषेध होत असतानाच अखिल मराठी पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाच्या वतीने देखील बावनकुळे यांचा आज निषेध करण्यात आला


 तसेच बावनकुळे हे कराड दौऱ्यावर यापुढे   केव्हाही येतील त्यावेळी त्यांनी पत्रकारांबाबत   केलेल्या या अपमानकारक  वक्तव्याबाबत त्यांना  रोखठोक जाबही विचारण्यात येईल असा   निर्धारही यावेळी कराडच्या पत्रकारांच्या     वतीने करण्यात आला

 यावेळी अखिल मराठी पत्रकार संघाचे   जिल्हाध्यक्ष अजिंक्य गोवेकर सचिव अतुल   होणकळसे कार्याध्यक्ष दिनकर थोरात शहर   अध्यक्ष सौ प्रगती पिसाळ उपाध्यक्ष सुहास   पाटील  हरून मुलाणी विकास साळुंखे   प्रकाश   पिसाळ कैलास थोरवडे सागर दंडवते आदी   उपस्थित  होते

‘जयवंत शुगर्स’चा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात

वेध माझा ऑनलाइन।  धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याचा १३ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ‘जयवंत शुगर्स’चे संस्थापक आणि य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.

याप्रसंगी कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, श्री. विनायक भोसले, जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाई, प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी कारखान्याचे पर्यावरण अधिकारी रोहित कोळेकर आणि त्यांच्या पत्नी सौ. कोमल कोळेकर यांच्या हस्ते धार्मिक विधी करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.

यावेळी ‘जयवंत शुगर्स’चे डेप्युटी जनरल मॅनेजर (टेक्निकल) आर. आर. इजाते, चिफ इंजिनिअर एच. एम. नदाफ, चिफ केमिस्ट बी. जी. चव्हाणके, सिव्हिल इंजिनिअर एस. एच. शेख, जनरल मॅनेजर (फायनान्स) व्ही. आर. सावरीकर, पर्चेस मॅनेजर वैभव थोरात, केन मॅनेजर नाथाजी कदम, मुख्य शेतकी अधिकारी आर. जे. पाटील, प्रशासकीय अधिकारी आर. टी. सिरसाट, इ.डी.पी. मॅनेजर ए. एल. काशीद, एच. आर. मॅनेजर एस. एच. भुसनर, पर्चेस ऑफिसर पी. एस. जाधव, मटेरियल मॅनेजर जी. एस. बाशिंगे, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर ए. बी. खटके, डिस्टीलरी इनचार्ज व्ही. जी. म्हसवडे, सेफ्टी ऑफिसर एस. व्ही. शिद, केनयार्ड सुपरवायझर ए. एम. गोरे, एस. एम. सोमदे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Monday, September 25, 2023

कृष्णा बँकेकडून सभासदांना १२ टक्के लाभांशबँकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; ११५० कोटी व्यवसायाचे उद्दिष्ट

वेध माझा ऑनलाइन।  कृष्णा सहकारी बँकेने सभासदांच्या सहकार्यातून उत्तम आर्थिक वाटचाल केली आहे. बँकेच्या स्वनिधीत सातत्याने वाढ होत असून, बँकेची नफा क्षमताही दिवसेंदिवस वाढत आहे. या बाबी विचारात घेऊन, कृष्णा बँकेने सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केला. विशेष म्हणजे सभा सुरू असतानाच अत्याधुनिक प्रणालीचा अवलंब करत, एका क्लिकवर बँकेच्या सभासदांच्या खात्यावर तात्काळ लाभांश रक्कम जमा करण्यात आली.  

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विराज मल्टिपर्पज हॉल येथे बँकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष दामाजी मोरे, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सचिन तोडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव, कृष्णा कारखान्याचे संचालक शिवाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

सभेत बोलताना चेअरमन डॉ. अतुल भोसले म्हणाले, की सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पांनी १९७१ साली कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली. सभासदांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे व विश्वासामुळे बँकेने उत्तम प्रगती केली असून, गेली सलग ११ वर्षे बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के राहिला आहे. ३१ मार्च २०२३ अखेर बँकेने ८७६ कोटींचा व्यवसाय टप्पा पार केला असून, बँकेकडे ५७६ कोटींच्या ठेवी आहेत; तर २९९ कोटींचे कर्जवितरण केले आहे. येत्या आर्थिक वर्षात बँकेने ११५० कोटींचे व्यवसाय उद्दिष्ट ठेवले आहे. बँकेच्या प्रगतीत सेवकांचे योगदानही महत्वपूर्ण असून, सेवकांच्या हितासाठी बँकेने पगारवाढ, बोनस यासह प्रोत्साहनपर भत्त्याच्या रुपाने चांगले आर्थिक पाठबळ उपलब्ध करुन दिले आहे. कृष्णा बँकेसह सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकारी पतसंस्था, कृष्णा महिला सहकारी पतसंस्था व वित्तपेठा अशा संस्थाचा मिळून तयार झालेल्या कृष्णा आर्थिक परिवाराने ३१ मार्च २०२३ अखेर १४९० कोटींचा व्यवसाय टप्पा पूर्ण केला असून, येत्या मार्चअखेर २००० कोटी व्यवसायपूर्तीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की गेल्या ५२ वर्षात बँकेच्या वाटचालीत अनेक चढउतार आले, पण प्रत्येक संकटावर मात करत कृष्णा बँक आज प्रगतीपथावर पोहचली आहे. बँकिंग क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे. या सर्व नव्या गोष्टींचा अवलंब करत, कृष्णा बँक पुढे वाटचाल करत आहे. बँकेने सभासद व ग्राहकांच्या विश्वासाला पात्र राहून कार्य करत, देशपातळीवर आपली ओळख निर्माण करावी.

सभेला कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, प्रमोद पाटील, रणजित लाड, हर्षवर्धन मोहिते, नामदेव कदम, प्रदीप थोरात, विजय जगताप, प्रकाश पाटील, गिरीश शहा, शिवाजी पाटील, संतोष पाटील, अनिल बनसोडे, नारायण शिंगाडे, श्रीमती सरिता निकम, सौ. सारिका पवार, अभिजीत दोशी, ॲड. विजय पाटील, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य गुणवंत जाधव, डॉ. राजेंद्र कुंभार, हणमंत पाटील, सुनील पाटील, प्रदीप पाटील, दिलीपरावजी पाटील, सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कापसे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एक क्लिक अन्‌ सभासदांच्या खात्यावर एकूण ८३ लाख लाभांश वर्ग 
कृष्णा सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय जाहीर केला. याला सभेची मंजुरी मिळताच, सभा सुरु असतानाच व्यासपीठावरुन बँकेचे मार्गदर्शक डॉ. सुरेश भोसले यांनी लॅपटॉपवर क्लिक केले आणि अत्याधुनिक ऑनलाईन प्रणालीद्वारे क्षणार्धात सभासदांच्या बँक खात्यावर एकूण ८३ लाख रुपये लाभांश रक्कम वर्ग झाली. सभेतच बहुतांश सभासदांनी मोबाईल उंचावून दाखवित लाभांश रक्कम मिळाल्याचा एस.एम.एस. आल्याचे जाहीर केल्याने, कृष्णा बँकेच्या या कृतीचे कौतुक सभास्थळी होत होते.


आमदार अपात्रता प्रकरण ; ...आता 13 ऑक्टोबरला सुनावणी ; 54 आमदारांची चिंता वाढली ;


वेध माझा ऑनलाईन। आमदार अपात्रतेची टांगती तलवार आता १३  ऑक्टोबरपर्यंत लटकत राहणार आहे. त्यामुळे नोटीस दिलेल्या ५४  आमदारांची चिंता वाढली आहे तर दुसरीकडे आमदार अपात्रतेचा निर्णय लांबणीवर जात असल्याने ही प्रक्रिया यावर्षी पूर्ण होण्याची शक्यता मावळल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आमदार अपात्रतेसंदर्भात आज (२५ सप्टेंबर) पहिली सुनावणी होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आजच्या सुनावणीमध्ये वेळापत्रक निश्चित होणार होते. पण प्रकरण एकच असल्यामुळे सर्व याचिका एकत्रित कराव्यात आणि सुनावणी घ्यावी अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली. तर या मागणीला शिंदेंच्या शिवसेनेकडून विरोध करण्यात आलाय. दरम्यान, दोन्ही बाजूंचं म्हणणे ऐकल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी करणार असल्याचं स्पष्ट केले आहे
ठाकरे गटाच्या वतीने देवदत्त कामत यांनी आज युक्तिवाद केला. याचिकांचा विषय एकच असल्यामुळे त्यावर एकत्रित सुनावणी घेतल्यास निर्णय घेण्यास वेळ कमी लागेल, असा दावा त्यांनी केला. तर शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांनी आम्हाला स्वतंत्र पुरावे द्यायचे आहेत, अशी भूमिका घेत वेगवेगळ्या सुनावणी घ्या, अशी मागणी लावून धरली.
आता आमदार अपात्रतेवर तब्बल १८  दिवसांनी सुनावणी होणार आहे. आमदार अपात्रेसंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. परंतु, विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीला विलंब होत असल्याचा दावा करत ठाकरे गटाने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर काही दिवसांपूर्वी सुनावणी झाली आणि विधानसभा अध्यक्षांना लवकरात लवकर सुनावणी घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.