Wednesday, September 27, 2023

मणिपूर पुन्हा चिघळले ; सरकारने केली मोठी घोषणा ;

वेध माझा ऑनलाइन। मागील काही महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत असलेले मणिपूर पुन्हा एकदा आगीच्या झळीमुळे चर्चेत आले आहे. ईशान्येकडील मणिपूर राज्यात परिस्थिती गंभीर झाली असून राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. सरकारने संपूर्ण राज्य 'अशांत क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे. तणावाची परिस्थिती पाहता इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट झाल्यानंतर सरकारने अलीकडेच २३ सप्टेंबर रोजी मोबाइल इंटरनेट सेवा पूर्ववत केली होती. पण, पुन्हा एकदा हिंसेची आग वाढत चालली आहे.  मणिपूरमधील वाढत्या तणावामुळे मंगळवारपासून पाच दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. खरं तर पाच महिन्यांनंतर राज्यात इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली होती. 

मणिपूर सरकारने अधिसूचना काढत सांगितले की, १ ऑक्टोबर २०२३ पासून प्रभावी १० पोलीस स्टेशन्स वगळता मणिपूरमधील संपूर्ण परिसर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. 
मणिपूर सरकारने दिलेल्या माहितीनुसार, विविध अतिरेकी गटांच्या हिंसक कारवायांमुळे संपूर्ण मणिपूरमध्ये प्रशासनाला मदत करण्यासाठी सशस्त्र दलांची गरज असल्याचे राज्यपालांचे मत आहे. यामध्ये राजधानी इम्फाल, लॅम्फेल, सिटी, सिंगजामेई, सेकमाई, लामासांग, पटसोई, वांगोई, पोरोम्पट, हिंगांग, लमलाई, इरिलबुंग, लिमाखोंग, थौबल, बिष्णुपूर, नंबोल, मोइरांग, काकचिंग आणि जिरीबाम यांचाही समावेश आहे. मात्र, राज्यातील १९ पोलीस स्थानकांमध्ये शांतता असून अशा ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण बनली आहे. इम्फाल शहर आणि घाटी परिसरातील भागात विद्यार्थी हिंसक निदर्शने करत आहेत. सुदैवाने आताच्या घडीला तरी हिंसाचाराच्या कोणत्याही मोठ्या घटना घडलेल्या नाहीत, परंतु मणिपूरमध्ये अजूनही तणावपूर्ण परिस्थिती आहे. 


सह्याद्री सहकारी साखर कारखाना महिन्याला सात किलो साखर दहा रुपये दराने देणार ; आ. बाळासाहेब पाटील यांची घोषणा

वेध माझा ऑनलाइन। सभासदांनी पाच- सहा वर्षापासून वाढीव साखरेची मागणी केली होती. सभासदांच्या मागणीचा विचार करत सह्याद्री सहकारी साखर कारखाना महिन्याला सात किलो साखर दहा रुपये दराने देणार असल्याची घोषणा कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी सहकार व पणनमंत्री कारखान्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केली. यशवंतनगर (ता. कराड) येथे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 53 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, तालुकाध्यक्ष देवराज पाटील, शहाजीराव क्षिरसागर, रहिमतपूरचे नगराध्यक्ष आनंदा कोरे, जिल्हा बँकेचे संचालक लहूराज जाधव, राष्ट्रवादीचे सरचिटणीस संभाजीराव गायकवाड, कारखान्याच्या उपाध्यक्ष लक्ष्मीताई गायकवाड, संचालक माणिकराव पाटील, लालासाहेब पाटील, संजय थोरात, पांडुरंग चव्हाण, कांतीलाल पाटील, अविनाश माने आजी माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व माजी संचालक उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, सहकारी साखर कारखान्यांनी रस्ते करायचे अन् ऊस मात्र खाजगीकडे घालायचा ही गंभीर बाब आहे. सहकारी कारखान्याकडे ऊस येण्याची काळजी सर्वांनी घ्यावी. सर्व सभासद ऊस उत्पादकांचा सर्व ऊस नेण्याची जबाबदारी सहकारी साखर कारखाना पार पाडत असतो.दरम्यान या सरकारने सप्टेबर संपत आला तरी मंत्री समितीची बैठक घेतलेली नाही. त्यामुळे सहकारी साखर कारखानदारीचे धोरण अद्याप ठरलेले नसल्याने मोठी अडचण होणार असून काही खाजगी कारखाने मात्र सुरू झाले आहेत. पण ते कारखाने नसून खांडसरी आहे. त्यांना एफआरपी अॅक्ट लागू होत नाही.धनगरवाडी हणबरवाडी योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने हणबरवाडी शहापूर योजना सुरू झाली आहे. सभेचे नोटीस वाचन कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी केले. अहवाल वाचन चिफ अकाउंटंट जी. व्ही. पिसाळ यांनी केले. आभार मानसिंगराव जगदाळे यांनी मानले

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा दोन दिवस सातारा दौऱ्यावर

वेध माझा ऑनलाईन। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी भाजपकडून बैठका घेतल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे आजपासून दोन दिवस सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या या दौऱ्यात भाजपच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा भाजपच्या कोअर कमिटीची बैठक रात्री उशिरा घेणार आहेत. केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांचे आज बुधवारी दुपारी साडेचार वाजता खंडाळा येथे आगमन होईल. तेथील विकासकामांची ते पाहणी करतील. त्यानंतर पावणेसहा वाजता त्यांचे साताऱ्यात आगमन होईल. यावेळी ते विविध गणेश मंडळांना भेटी देणार आहेत, तसेच सायंकाळी साडेसहा वाजता शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधतील. त्यानंतर साडेसात ते रात्री नऊ यावेळेत ते विविध गणेशमंडळांना भेटी तसेच बुध कमिटी अध्यक्षांच्या मंडळांना भेटी देतील.
रात्री सव्वानऊ वाजता हॉटल फर्न येथे भाजपच्या कोअर कमिटी बैठकीस उपस्थित राहून सातारा लोकसभेचा आढावा घेतील. तेथेच मुक्कामी थांबतील. गुरुवारी (दि. २८ सकाळी ९ वाजता दत्ताजी थोरात यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर चार भिंती या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन माझी माती, माझा देश उपक्रमांतर्गत पंचप्राण शपथ देतील. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृहात राखीव राहील. तेथून ते पुण्याकडे रवाना होतील.

Tuesday, September 26, 2023

डी जे च्या दणदणाटात दोघांचा मृत्यू ; नाचतानाच खाली कोसळले ; डॉक्टरांनी केले मृत घोषित ;

वेध माझा ऑनलाईन।  अवघ्या १० दिवसांपूर्वीच अँजिओप्लास्टी झाली असतानाही तो गणेश विसर्जन मिरवणुकीला गेला पण...डीजेच्या तीव्र आवाजाने हृदयविकाराचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. ही घटना तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे घडली. शेखर सुखदेव पावशे (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर दुसरी घटना जिल्ह्यातच दुधारी (ता. वाळवा) येथे घडली. तिथेही आवाजाच्या दणदणाटाने ३५ वर्षीय यवकाचा मृत्यू झाला. 

शेखर पावशे याला हृदयरोगाचे निदान झाले होते. नुकतीच अँजिओप्लास्टी झालेली असतानाही तो विसर्जन मिरवणुकाला गेला. संपूर्ण गावात डीजेचा दणदणाट सुरू होता. मिरवणुकीत चालणाऱ्या शेखरला रात्री १० वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले. बसस्थानक परिसरात जाईपर्यंत त्रास वाढल्याने तो घरी परतला. घरात येताच भोवळ येऊन ताे खाली पडला. छातीत असह्य वेदना होऊ लागल्याने त्याला तासगावला खासगी रुग्णालयात नेण्यात आले; पण उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

वाळव्यातही एका तरुणाचा मृत्यू 
 दुधारी (ता. वाळवा) येथे प्रवीण यशवंत शिरतोडे (३५) याचा मृत्यू झाला. शिरताेडे याचा सेंट्रिंग व्यवसाय आहे. साेमवारी सायंकाळी कामावरून घरी पोहोचला. त्यानंतर  विसर्जन मिरवणुकीत गेला. काही वेळातच डीजेच्या दणदणाटाने त्याला अस्वस्थ होऊ लागले. मित्रांसाेबत नाचत असतानाच चक्कर येऊन खाली पडला. त्याला त्वरित खासगी रुग्णालयात नेले परंतु डाॅक्टरांनी मृत घोषित केले.

आ पृथ्वीराज चव्हाण व डॉ अतुल भोसले दिसले शेजारी-शेजारी बसलेले ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन। आ. पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे डाॅ. अतुल भोसले हे दोघे राजकीय  विरोधक काल रात्री कराडात एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसून आले लग्गेच याविषयीची चर्चादेखील शहरात सुरू झाली आहे

मंगळवारी रात्री शहरातील एका गणेश मंडळात  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आणि भाजपचे लोकसभा प्रभारी व कराड दक्षिणचे विधानसभा उमेदवार डाॅ. अतुल भोसले एकमेकांच्या शेजारी बसलेले पहायला मिळाले. गणेशोत्सव सुरू असल्याने आरती निमित्त या दोन्ही नेत्यांच्या शहर व परिसरातील गणेश मंडळांना भेटी देणे सध्या सुरू आहे याच निमित्ताने हे दोघेही याठिकाणी आले होते तेथे उपस्थितांच्या नजरा या दोघांकडेच लागून राहिल्या होत्या पण या दोघांमध्ये कोणतीही चर्चा किंवा काहीच घडले नाही. तरीही हे दोन्ही नेते एकत्र पहायला मिळाल्याची चर्चा मात्र जोरदार झाली...इतकंच!

तलवारीचा धाक दाखवून मागितली खंडणी ; खंडणीखोर अवघ्या 4 तासात पोलिसांच्या ताब्यात ;

वेध माझा ऑनलाइन । फलटण शहरातील मध्यवर्ती भागातील एका व्यापाऱ्यास खंडणीची मागणी करत कोयता व तलवारीचा धाक दाखवून दोघांनी लुटल्याची घटना रविवारी बाजारादिवशी सायंकाळी पावणेपाच सुमारास घडली होती. या घटनेनंतर अवघ्या चार तासात चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २४/०९/२०२३ रोजी सायंकाळी ४.४१ वाजण्याच्या सुमारास १३५ रविवारपेठ उघडया मारुती मंदीरासमोर फलटण येथे मॅचिंग सेंटर दुकानात अरिजय दोशी हे गि-हाईकाला अस्तर देत होते. यावेळी आदित्य अहिवळे या युवक हातात कोयता तर त्याचा मित्र हातात तलवार घेऊन आला. काही कळणार इतक्यात आदित्य अहिवळे याने अरिजय यांच्या अंगावर कोयता उघारुन दुकानाच्या काऊन्टर मधुन अंदाजे २५ हजार रुपये रक्कम जबरदस्तीने काढुन घेवुन गेला.
तसेच वैभव रमनलाल दोशी (वय ५३) यांच्या फुलचंद दुलचंद दोशी यांचे किराणा मालाच्या दुकानात जावुन वैभव दोशी यांना तलवारीचा व कोयत्याचा धाक दाखवुन “प्रत्येक महिन्याला ३ हजार रुपये हप्ता दिला पाहिजे तरच तुम्ही धंदा करुन शकाल व तुम्ही जर ही रक्कम आम्हास दिली नाही तर याच कोयत्याने तुम्हाला जिवे मारु,” अशी धमकी देत दमदाटी केली. त्यानंतर तौसिफ निजामुद्दीन शेख यांच्या दुकानातुन बॅट हिसकावुन घेवुन दुकानातुन बाहेर जावुन दुकानावर दगडफेक केली. या सर्व घडलेल्या प्रकरणात आरोपी विरुद्ध फलटण शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस ठाणे कडील महीला पोलीस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड व गुन्हे प्रकटीकरण पथक हे तात्काळ जाऊन सदर ठिकाणी उपलब्ध असणारे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यावेळी सदरचा आरोपी हा पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत २ आरोपी असुन त्यांनीच सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले. 

साताऱ्यातील ६१ जण हद्दपार ;

वेध माझा ऑनलाइन ।  सध्या सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक सार्वजनिक मंडळांकडून सामाजिक संदेश देणारे देखावे देखील दाखविले जात आहेत. या दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सातारा पोलिसांकडून सुव्यवस्था बिघडवणाऱ्या विरोधात कारवाई केली जात आहे. या दरम्यान, सातारा शहर परिसरातील ६१ जणांनी जिल्हा पोलीस सार्वजनिक ठिकाणी वावर न करण्याचे आदेश सातारा पोलिसांकडून पारित करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक बापूसाहेब बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २८/०९/२०२३ रोजी गणेश विसर्जन असल्याने गणेश विर्सजना दरम्यान, सार्वजनिक शांतता भंग होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचू नये यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे. त्या अनुषंगाने सातारा शहर व तालुक्यातील असलेल्या व सातारा शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील ६१ सराईत गुन्हेगारावर सीआरपीसी कलम १४४ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी प्रस्ताव सादर केले होते. त्याप्रमाणे उपविभागीय दंडाधिकारी यांनी ६१ सराईत गुन्हेगाराना दि. २७ सप्टेंबर ते दि. २९ तारखेच्या सकाळी १० वाजेपर्यंत सातारा तालुका हद्दीत थांबणेस मनाई आदेश जारी केला आहे. सदर कालावधीत नमुद सराईत गुन्हेगार सातारा तालुका हद्दीत मिळुन आल्यास त्याचेवर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गणेशोत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून नागरिकांना आवाहन केले आहे की, नागरीकांना गणेश उत्सवादरम्यान प्रशासनाकडुन देण्यात येणा-या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. त्याचे उल्लंघन केल्यास त्याचेवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल.