वेध माझा ऑनलाइन। सभासदांनी पाच- सहा वर्षापासून वाढीव साखरेची मागणी केली होती. सभासदांच्या मागणीचा विचार करत सह्याद्री सहकारी साखर कारखाना महिन्याला सात किलो साखर दहा रुपये दराने देणार असल्याची घोषणा कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी सहकार व पणनमंत्री कारखान्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केली. यशवंतनगर (ता. कराड) येथे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 53 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, तालुकाध्यक्ष देवराज पाटील, शहाजीराव क्षिरसागर, रहिमतपूरचे नगराध्यक्ष आनंदा कोरे, जिल्हा बँकेचे संचालक लहूराज जाधव, राष्ट्रवादीचे सरचिटणीस संभाजीराव गायकवाड, कारखान्याच्या उपाध्यक्ष लक्ष्मीताई गायकवाड, संचालक माणिकराव पाटील, लालासाहेब पाटील, संजय थोरात, पांडुरंग चव्हाण, कांतीलाल पाटील, अविनाश माने आजी माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व माजी संचालक उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, सहकारी साखर कारखान्यांनी रस्ते करायचे अन् ऊस मात्र खाजगीकडे घालायचा ही गंभीर बाब आहे. सहकारी कारखान्याकडे ऊस येण्याची काळजी सर्वांनी घ्यावी. सर्व सभासद ऊस उत्पादकांचा सर्व ऊस नेण्याची जबाबदारी सहकारी साखर कारखाना पार पाडत असतो.दरम्यान या सरकारने सप्टेबर संपत आला तरी मंत्री समितीची बैठक घेतलेली नाही. त्यामुळे सहकारी साखर कारखानदारीचे धोरण अद्याप ठरलेले नसल्याने मोठी अडचण होणार असून काही खाजगी कारखाने मात्र सुरू झाले आहेत. पण ते कारखाने नसून खांडसरी आहे. त्यांना एफआरपी अॅक्ट लागू होत नाही.धनगरवाडी हणबरवाडी योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने हणबरवाडी शहापूर योजना सुरू झाली आहे. सभेचे नोटीस वाचन कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी केले. अहवाल वाचन चिफ अकाउंटंट जी. व्ही. पिसाळ यांनी केले. आभार मानसिंगराव जगदाळे यांनी मानले
No comments:
Post a Comment