Monday, October 2, 2023

वर्षा बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत खलबतं, पितृपक्षानंतर राज्यात मोठ्या राजकीय हालचाली?

वेध माझा ऑनलाइन। या दोन दिवसात रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची वर्षा बंगल्यावर तब्बल दोन तास एक महत्त्वाची बैठक पार पडली. अचानक झालेल्या या बैठकीमुळे अनेक चर्चांना उधाण आले. या बैठकीनुसार, पितृपक्षानंतर एक महत्त्वाचा निर्णय होणार असल्याची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

राज्यातील तिन्ही वरिष्ठ नेत्यांची शनिवारी एक महत्त्वाची बैठक वर्षा बंगल्यावर पार पडली. या बैठकीमध्ये सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सुरू असलेला पक्षाबाबतचा संघर्ष तसेच, आमदार अपात्रता प्रकरण, मंत्रिमंडळ विस्तार आणि 12 आमदार नेमणूक प्रकरणी चर्चा झाल्याची माहिती आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच आमदार आपात्रतेच्या प्रकरणात कधी सुनावणी घ्यायची याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, आता या प्रकरणात कायदेशीर पेच प्रसंग निर्माण झाला त्याला राज्य पातळीवर कशाप्रकारे तोड द्यायचं याची चर्चा झाल्याचीही माहिती आहे.

आमदार अपात्रतेबाबत कायदेशीर पेच प्रसंग टाळण्यासाठी एका 'लॉं फर्म'ची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची आणि राज्यातील विधी विभागाची सांगड घालून कशाप्रकारे व्यूहरचना असावी याबाबत देखील चर्चा झाली आहे. यासोबतच शिंदे गटातील आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील चर्चा झाली असल्याची  माहिती आहे.

पुढील आठवड्यात दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची रविवारी बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महाराष्ट्रातून भाजपचे प्रमुख असणारे देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी राज्यातील या महत्त्वाच्या विषयासंदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस वरिष्ठांशी देखील चर्चा करू शकतात. त्या अनुषंगानेदेखील बैठकीची शक्यता आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार पितृपक्षाच्या पंधरवड्यानंतर राज्यात सरकार एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने शनिवारी पार पडलेली बैठक आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच दिल्ली येथे जाणं महत्त्वाचं मानलं जात आहे. त्यामुळे आता रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होणार , रखडलेले पालकमंत्री पदाचा वाटप होणार की सरकार आणखी काही वेगळा निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचा लक्ष लागले आहे.

राज्यातील "या' जिल्ह्यात कमी वेळेत होणार जास्त पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज ;

वेध माझा ऑनलाईन । पुढील काही तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या कालावधीमध्ये कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यामध्ये सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, पुणे तसेच घाट क्षेत्रांमध्ये काही ठिकाणी कमी वेळात जास्त पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे झाड उन्मळून पडणे, दरड कोसळणे, डोंगरांवरून माती वाहून येण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होईपर्यंत प्रवास न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 

गेल्या काही दिवसांपासून दरड कोसळून अपघात होण्याचे प्रमाण पावसाळ्यामध्ये सातत्याने वाढलं आहे. त्यामुळे प्रवास करताना काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. धरणांमध्ये पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.

47 लाख रुपयांचा गुटखा जप्त ; सातारा पोलिसांची कारवाई

वेध माझा ऑनलाइन ; काल जवळपास 47 लाख रुपये किंमतीचा गुटखा व 20 लाख रुपयांचा टाटा 1109 ट्रक कंटेनर असा एकूण 67 लाखाचा मुद्देमाल पोलिसांकडून साताऱ्या जवळ शेंद्रे गावच्या हद्दीत जप्त करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलिसांना अशी मिळाली की, टाटा 1109 ट्रक कंटेनर मधून गुटखा पुणेहून घेवून येणार आहे. या माहितीवरून सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने संशयित वाहन ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे नमुद पथकाने शेंद्रे ता. जि. सातारा गावचे हद्दीत राजस्थानी हायवे होटलचे जवळ संबधित टाटा 1109 ट्रक कंटेनर आल्याने त्यास थांबवून त्यामधील चालकाकडे विचारपूस केली असता. त्याने कंटेनरमध्ये विमल रजनीगंधा गुटखा असल्याचे सांगितल्याने  47 लाख 1 हजार 920 रुपये किमतीचा प्रतिबंधीत गुटखा व 20 लाख रुपये किमतीचा ट्रक कंटेनर असा एकूण 67,01,120 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे सातारा तालुका पोलीस ठाणे येथे याबाबत गुन्हा नोंद केला आहे.

छत्रपतीं शिवाजी महाराजांची लंडनमधील वाघनखे खोटी आहेत हे सिद्ध करून दाखवा ; आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे विरोधकांना आव्हान ;

वेध माझा ऑनलाइन। छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफझलखानाचा कोथळा काढला. त्यासारखी व त्यावेळची वाघनखं महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा पाहायला मिळणार आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया म्युझियममधून वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार आहेत, परंतु ती वाघनखं महाराष्ट्रात येण्याअगोदरच त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरले आहेत का? असा सवाल करीत त्यावर त्यांनी आक्षेप घेतला असल्याने यावर साताऱ्याचे भाजप आमदार छत्रपती शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी थेट आव्हान दिले आहे. छ. शिवाजी महाराजांची लंडनमधील वाघ नखे ही खरी आहेत का खोटी हे सिध्द करून दाखवा, असे शिवेंद्रराजेंनी म्हंटले आहे.

महात्मा गांधी जयंती निमित्त साताऱ्यातील शिवतीर्थावर भाजप आमदार छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होत स्वच्छता केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ नखांबाबत करण्यात आलेल्या आरोपांवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, विरोधकांनी वाघ नखांबाबत केलेला प्रश्न यामध्ये राजकारण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुधीर मुनगंटीवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून जी वाघ नखे लंडनमध्ये होती, ती भारतात येत आहेत.

विरोधक म्हणतायेत ही वाघ नखे खरी आहेत का? तर माझा त्यांना उलट सवाल आहे ती खोटी आहेत हे सिद्ध करा अशा पद्धतीने ज्या गोष्टीं सोबत मराठी माणसाची अस्मिता जोडली गेलेली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबईत येवून वाघनखांच स्वागत, पूजन करावे, अशी मी विनंती करतो.छ. शिवाजी महाराज यांची वाघनखं साताऱ्यात आणण्यात येणार असून तेव्हा मिरवणूक काढली जाईल. यावेळी शिवतीर्थावर वाघनखं आणून त्याची विधीवत पूजा करण्यात येणार आहे. छ. शिवाजी महाराजांना हार अर्पण केला जाईल. तेथेही सातारकर तसेच महाराष्ट्रातील लोकांनी येवून दर्शन घ्यावे, असे आवाहन शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी केले.

मणिपूरमधील हिंसाचारामागे खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात ; गुप्तचर यंत्रणांना मिळाले पुरावे ;

वेध माझा ऑनलाईन। मणिपूरमध्ये पुन्हा सुरू झालेल्या हिंसाचारामागेही खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याचे उघड झाले आहे. कॅनडात खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येनंतर कुकी समुदायाच्या एका वरिष्ठ नेत्याने खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूसोबत बैठक घेतल्याचे पुरावे गुप्तचर यंत्रणांना मिळाले आहेत.

कॅनडाच्या सरे येथील गुरुद्वारात आयोजित खलिस्तानी समर्थकांच्या बैठकीचा व्हिडीओ भारतीय यंत्रणांना मिळाला आहे. त्यात कुकी फुटीरतावादी नेता लीन गंग्ते हादेखील आहे. गंग्ते हा नॉर्थ अमेरिकन मणिपूर ट्रायबल असोसिएशनचा प्रमुख आहे. २ मिनिट २० सेकंदाच्या या व्हिडीओत तो उपस्थित लोकांना संबोधित करताना दिसतो. ३ तास चाललेल्या या बैठकीनंतर खलिस्तानी नेटवर्कने हवालाद्वारे कोट्यवधी रुपये मणिपूरला पाठवले.

 विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी ४ आरोपींना अटक
मणिपूरमधील एका किशोरवयीन विद्यार्थ्याचे आणि विद्यार्थीनीचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी रविवारी ही माहिती दिली. आरोपींना कोठे नेण्यात आले याची माहिती त्यांनी दिली नाही.

कुकी नेत्यांना हवाय कॅनडात आश्रय
कॅनडातील गुरुद्वारातील कार्यक्रमात गंग्ते म्हणाला, जसे तुम्ही लोक खलिस्तानची मागणी करत आहात, त्याचप्रमाणे आम्हीही वेगळ्या मणिपूरसाठी लढत आहोत.
सरकारला मणिपूरमधील आमच्या समाजाच्या नेत्यांना नेस्तनाबूत करायचे आहे. या नेत्यांना कॅनडात राजकीय आश्रय द्यावा.

समान सत्तावाटप व्यवस्थेची गरज’
सुभाषचंद्र बोस यांचे नातू सुगत बोस यांनी मणिपूरमध्ये एकमत निर्माण करण्यासाठी ईशान्येकडील राज्यात न्यायसंगत समान सत्तावाटप व्यवस्था उभारण्याची गरज व्यक्त केली.

कराड शहरात पैगंबर जयंती उत्साहात ;


वेध माझा ऑनलाइन। ईद-ए-मिलाद निमित्त रविवारी कराड शहरात मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत 25 घोडे व सजवलेल्या रिक्षा अन्य वाहने घेऊन समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शाही जामा मस्जिद येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. ही मिरवणूक जामा मस्जिद येथून भाजी मंडई दर्गा मोहल्ला चावडी चौक आझाद चौक मार्गे बाजारपेठेच्या मुख्य रस्त्याने दत्त चौकात गेली तेथून कामगार चौकात जनता बँक महात्मा ज्योतिराव फुले चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक जोतिबा मंदिर कन्या शाळा दर्गा मोहल्ला मार्गे काढून जामा मस्जिद येथे मिरवणुकीची सांगता झाली. 
मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनाचा जयघोष करण्यात आला. 

महमद पैगंबर यांच्या जन्मदिनाच्या औचित्य साधून कराड शहरातील प्रमुख चौकात मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने मक्का मदिनाच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या तसेच रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक सजावट करण्यात आली होती. मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडली लहान मुले युवक यांचा मिरवणुकीतील सहभाग लक्षवेधी होता. 
जामा मशीद येथे मौलाना यांच्याकडून दुवा करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. पैगंबर जयंती उत्सव कमिटीतील सर्व पदाधिकारी सदस्य व कराडवासीय या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांनी जयंतीच्या पार्श्वभूमीवर चौक बंदोबस्त ठेवला होता.

Sunday, October 1, 2023

सह्याद्री कारखाना चालू हंगामात इथेनॉलचे उत्पादन घेणार : आ. बाळासाहेब पाटील

वेध माझा ऑनलाइन ।सह्याद्री सहकारी साखर कारखाना चालू हंगामात सुरुवातीपासून इथेनॉलचे उत्पादन घेणार आहे. प्रतिदिन एक लाख लिटर इथेनॉल उत्पादन क्षमतेच्या नव्याने उभारलेल्या प्लांटची गेल्या हंगामाच्या अखेरीस चाचणी घेण्यात आलेली आहे. त्यानुसार इथेनॉलचे उत्पादन घेण्यात येणार आहे. सभासदांना दिवाळीची साखर व कर्मचाऱ्यांच्या बोनस संबंधात संचालक मंडळ लवकरच योग्य निर्णय घेईल असा विश्वास सभासदांना सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिला.

कारखान्याच्या सुवर्ण महोत्सवी गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ कारखान्याचे संचालक लालासाहेब पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ चारुशीला पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला याप्रसंगी मार्गदर्शन करताना आ बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, कराड उत्तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष देवराज पाटील, कारखान्याच्या व्हॉइस चेअरमन लक्ष्मी गायकवाड, संचालक मानसिंगराव जगदाळे, जशराज पाटील, माणिकराव पाटील, कांतीलाल पाटील, शहाजीराव क्षीरसागर, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक लहुराज जाधव, प्रशांत यादव, तानाजीराव साळुंखे, प्रणव ताटे आधी उपस्थित होते.

आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, प्रतिदिन 1250 मॅट्रिक टन गाळप क्षमतेने सुरू झालेला कारखाना आजच्या हंगामात प्रतिदिन 7500 हजार मॅट्रिक टनाने सुरू आहे. प्रतिदिन 11000 मॅट्रिक टन वाढीव गाळप क्षमतेने सुरू करण्याचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केलेले होते. मात्र 23 मे रोजी आलेल्या चक्रीवादळामुळे विस्तारवाढ प्रकल्पाचे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीमुळे विस्तारवाढ प्रकल्पाच्या उभारणीस विलंब होणार आहे. गाळपच्या दृष्टीने ऊस तोडणी मजूर टोळ्या 390, बैलगाड्या 834, ट्रॅक्टर गाड्या 374, तोडणी मशीन 11 असे नियोजन आहे. ऊस उत्पादकांनी ऊस सह्याद्री कारखान्यास पाठवावा व सहकार्याची भूमिका घ्यावी.

लालासाहेब पाटील म्हणाले, कारखान्याच्या बॉयलर प्रदीपनाची संधी मिळाली. संचालक मंडळ आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विचाराने व समन्वयाने काम करीत आहे. यात एकसंघपणा महत्त्वपूर्ण ठरला आहे. सभासदांचा विश्वस्त सह्याद्री कारखाना आहे. सभासद शेतकऱ्यांनी याच कारखान्याला ऊस घालावा. कारखाना पुरस्कृत अनेक योजना सुरू आहेत. 36, 000 सभासदांचा कारखाना उत्कृष्ट दर्जाची साखर निर्मिती करीत आहे. शहाजी क्षीरसागर, अजितराव पाटील यांनीही मार्गदर्शन केले. कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. व्ही बी चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश माने यांनी आभार मानले.