Friday, March 8, 2024

कराडात 150 हुन अधिक लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप ; उपक्रमाचे कौतुक ; भाजपचे शहर उपाध्यक्ष अभिषेक भोसले यांचा पुढाकार ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड दक्षिणचे भाजप नेते डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या सहकार्याने आणि कराड शहर भाजप उपाध्यक्ष अभिषेक भोसले यांच्या पुढाकाराने आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पालिकेच्या शाळा क्रमांक 10 मध्ये नुकताच नोंदणी कॅम्प घेण्यात आला 150 हुन अधिक लाभार्थ्यांना यावेळी आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. 
यावेळी अभिषेक भोसले यांनी डॉ अतुलबाबांच्या माध्यमातून कराड शहर व परिसरातील जनतेला या योजनेंतर्गत मोठा लाभ होत असल्याचे आवर्जून सांगितले

सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ किशोर पटेल आणि श्री किशोर आठवले यांची उपस्थिती होती त्यांच्याच हस्ते उपस्थित नागरिकांना आयुष्मान भारतचे कार्ड वितरित करण्यात आले, 

याप्रसंगी श्री विक्रम पाटील,श्री दिलीप जाधव, ओंकार ढेरे, सागर माने, मंगेश वीर, विकी वाघमारे व अभिषेक भोसले मित्रपरिवार तसेच लाभधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते

भाजपच्या विद्यमान खासदारांचीदेखील धाकधूक वाढवणारी बातमी ; स्ट्राईक रेट चांगला नसलेल्या खासदारांचं भाजप तिकीट कापणार ?

वेध माझा ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड घडामोडी सुरु आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात जागावाटपासाठी जोरदार हालचाली घडत आहेत. महायुतीत तर हालचालींना जबरदस्त वेग आला आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला गेले आहेत. दिल्लीत हे दोन्ही नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळवण्यात यश मिळवतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप महाराष्ट्रात 36 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटाची धाकधूक वाढल्याची चर्चा आहे. असं असताना आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भाजपच्या विद्यमान खासदारांचीदेखील धाकधूक वाढवणारी बातमी समोर आली आहे. भाजपच्या नेतृत्वाकडून राज्यातील खासदारांचे अंतर्गत तीन सर्व्हे करण्यात आले. या सर्व्हेतून डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. स्ट्राईक रेट चांगला नसलेल्या खासदारांचं तिकीट कापलं जाऊ शकतं का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.


तिकीट का कापलं जाऊ शकतं?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या डझनभर विद्यमान खासदारांची तिकिटं कापलं जाण्याची शक्यता आहे. सामाजिक समीकरणांसह स्थानिक पातळीवरील राजकारणदेखील या सर्व्हेत पाहण्यात आलं. काही विद्यमान खासदारांबाबत लोकांमध्ये असलेली नाराजी या सर्व्हेमधून समोर आली आहे. निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता असल्याचं आता समोर येत आहे. 3 पेक्षा अधिक वेळा निवडून आल्याने काहींच्या तिकीटाबाबत आक्षेप घेण्यात आलाय.

कोणत्या जागांवर उमेदवार बदलण्याची शक्यता?
प्रीतम मुंडे, 
बीड
सुभाष भामरे, 
धुळे
सिद्धेश्वर स्वामी, 
सोलापूर
संजय काका पाटील, 
सांगली
सुधाकर श्रृंगारे, 
लातूर
उन्मेश पाटील,
 जळगाव
गोपाळ शेट्टी, 
उत्तर मुंबई
पुनम महाजन, 
उत्तर मध्य 
मुंबई
प्रताप चिखलीकर,
 नांदेड
सुजय विखे पाटील, 
अहमदनगर
रामदास तडस, 
वर्धा
रक्षा खडसे,
 रावेर

ईडी च्या कारवाईनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया ; काय म्हणाले; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाईन। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या असलेल्या बारामीत अ‍ॅग्रो कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड साखर कारखान्यावर कारवाई केली आहे. रोहित पवार यांचा बारामती अ‍ॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी रोहित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या कारवाईनंतर रोहित पवार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले रोहित पवार?
माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का? झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू, माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत. या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई. परंतु मी महादेवाचा भक्त आहे. अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेव्हा अनेकांचं थयथयाट झाल्याशिवाय राहणार नसल्याचं रोहित पवार म्हणाले.

रोहित पवारांना ED चा झटका, बारामती अॅग्रोने खरेदी केलेला कारखाना जप्त!

वेध माझा ऑनलाईन।  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची बारामती अॅग्रोच्या संबंधित संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली असून रोहित पवार आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. ईडीने रोहित पवारांशी संबंधित बारामती अॅग्रो संबंधित औरंगाबादमधील कन्नड साखर कारखान्यातील 161.30 एकरची संपत्ती जप्त केली आहे. त्यामध्ये जमीन, शुगर प्लंट, साखर कारखान्याची इमारत आणि इतर गोष्टींचा समावेश आहे.

रोहित पवारांवर आरोप काय? 
कन्नड सहकारी साखर कारखाना डबघाईला आल्यानंतर राज्य सहकारी बँकेने त्याचा लिलाव केला. हा कारखाना 50 कोटी रुपयांमध्ये रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो लिमिटेडने खरेदी केला होता. या प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणी ईडीने बारामती अॅग्रोची चौकशी केली. या लिलाव प्रक्रियेतील कंपन्यांचे एकमेकातले व्यवहार हे संशयास्पद असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.

बारामती अॅग्रो, हायटेक इंजिनिअरिंग, समृद्धी शुगर या कंपन्या लिलावात सहभागी आहेत. हायटेक कंपनीने लिलावासाठी पाच कोटी रूपयांची रक्कम भरली होती. ती रक्कम बारामती अॅग्रोकडून घेतल्याची चर्चा आहे. विविध बँकांतून खेळत्या भांडवलासाठी घेतलेली रक्कम बारामती अॅग्रोने कारखाना खरेदीसाठी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

रोहित पवारांची दोन वेळा चौकशी
बारमती अॅग्रो कथित गैरव्यावहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीनं छापेमारी केली होती. आमदार रोहित पवार यांच्याकडे बारमती अॅग्रो कंपनीची मालकी आहे. बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयांवर छापेमारी करत ईडीकडून तपास करण्यात आला होता. मागील वर्षी याच संदर्भात रोहित पवारांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती.आता ईडीने कन्नड कारखान्याशी संबंधित संपत्ती जप्त करण्यात आली आहे. 

" खऱ्या शिवसेनेची ’ पुन्हा न्यायालयात लढाई, राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाकडून प्रश्न ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाईन। शिवसेना प्रकरणातील राज्यातील लढाई अजून संपलेली नाही. ‘खरी शिवसेना‘ कोणाची हा निर्णय विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने दिला आहे. परंतु विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना उबाठा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल आमच्या न्यायालयाने दिलेल्या निकालाशी विसंगत नाही का? असा प्रश्न सरन्यायाधीशांनी उपस्थित केला. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ एप्रिल रोजी ठेवली आहे.

न्यायालयाने कागदपत्रे मागवली
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाला “मूळ राजकीय पक्ष” म्हणून घोषित करणारा निर्णय दिला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यावर म्हटले की, राहुल नार्वेकर यांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मे 2023 च्या निर्णयाचे उल्लंघन असू शकतो. विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मज्जाव केला होता. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयातून या याचिकेसंदर्भातील पुरावे आणि कागदपत्रे मागवली आहेत.

कपिल सिब्बल यांचा दावा
ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि ए.एम.सिंघवी यांनी न्यायालयात म्हटले की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने 11 मे 2023 रोजी दिलेल्या निकालाचे उल्लंघन केले आहे. विधानसभा अध्यक्षांनी सभागृहातील बहुमताच्या आधारे निर्णय घेतला आहे. न्यायालयाने सभागृहातील बहुमताच्या आधारावर निर्णय घेण्यास मनाई केली होती. नार्वेकर यांनी निकाल देताना २०१८ ची घटना विचारात घेण्याऐवजी १९९९ ची घटना विचारात घेतली, असेही त्यांनी निर्देशनास आणून दिले.

तातडीने सुनावणी घेण्याची मागणी
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ ऑक्टोंबर, नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेऊन निकाल द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यास फलनिष्पती शून्य ठरेल. शिंदे गटाला ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे.


महायुतीच्या जागावाटपाचा मुद्दा ; शिंदे, अजित पवारांच्या जागावाटपाच काय ठरलं ?

वेध माझा ऑनलाईन । महायुतीच्या जागावाटपावर मुंबईत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर दिल्लीत भाजपच्या नेत्यांची स्वतंत्र बैठक झाली आणि त्यातून समोर आलेल्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेच्या चार खासदारांचं तिकीट धोक्यात आल्याची माहिती आहे. तर या चार मतदारसंघात भाजप आपले उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे. महायुतीच्या जागावाटपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे म्हटले, वास्तविकेच्या आधारावर जागावाटप करा… म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांची ताकद पाहूनच विजयी होऊ शकतो का? हे पाहून किती जागा द्यायच्या हे भाजप स्पष्ट करेल. विशेष म्हणजे हे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या भाजपच्या नेतृत्वाशी झालेल्या बैठकीनंतर केलंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या जेपी नड्डा आणि अमित शाह यांच्या बैठकीत चर्चा झालेला फॉर्म्युल्यानुसार, भाजप ३५ ते ३७ जागा, शिंदेंची शिवसेना ८ ते ९ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ३ ते ४ जागा मिळणार असल्याची चर्चा आहे

Sunday, March 3, 2024

ओगलेवाडी येथे भव्य रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद ; 75 जणांनी केले रक्तदान

वेध माझा ऑनलाईन। लायन्स क्लब ऑफ कराड मेन व कलबुर्गी स्टेम्पींग यांचे संयुक्त विद्यमाने ओगलेवाडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले
होते.यावेळी 75 जणांनी रक्तदान केले.यशवंतराव चव्हाण ब्लड बँकेचेवतीने सर्व सोय करण्यात आली होती.

यावेळी बोलताना क्लबचे अध्यक्ष ला.खंडू इंगळे म्हणाले की जगात सर्वश्रेष्ठ दान कोणते असेल तर ते रक्तदान आहे.यामुळे आपण अनेकांचे प्राण वाचवू शकतो.सध्याच्या युगात विज्ञान कितीही प्रगत असले तरी रक्त तयार करण्याचा कारखाना कोणी बनवू शकत नाही.रक्त तयार होणे एक दैवी प्रक्रिया असून त्याचा वापर इतरांचे जीव वाचवण्यासाठी होणे आवश्यक आहे.तरी प्रत्येकानी दर तीन महिन्यांनी रक्तदान
करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी हजारमाचीचे उपसरपंच कदम , सदस्य माने ,कराड लायन्स चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मावजी पटेल,क्लबचे संदिप पवार, प्रविण भोसले, मिलिंद भंडारे, कलबुर्गी स्टेम्पींगचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.