Tuesday, January 17, 2023

धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार ? ; पुन्हा मिळाली तारीख ;

वेध माझा ऑनलाइन - धनुष्यबाण कुणाचे या प्रश्नाभोवती गेल्या चार महिन्यांपासून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये वाद शिगेला पोहोचला आहे. याच मुद्यावर आज निवडणूक आयोगामध्ये सुनावणी पार पडली आहे. धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार याचा फैसला पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. निवडणूक आयोगासमोर पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

धनुष्यबाण चिन्ह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे की बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मिळणार या प्रकरणावर आज निवडणूक आयोगात सुनावणी झाली. यावेळी शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. तर शिंदे गटाकडूनही वकिलांची मोठी फौज युक्तिवादासाठी हजर होती.

'शिंदे गटाने दाखल केली कागदपत्र ही जुनी आहे, महेश जेठमलानी यांनी केलेला दावा हा बोगस आहे. शिवसेनेमध्ये जी फूट पडली आहे त्याचा परिणाम पक्षावर होणार नाही त्यामुळे ही फूट ग्राह्य धरू नये. ही फूट काल्पनिक असू शकते. उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच ही खरी शिवसेना आहे. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत निर्णय घेऊ नये, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला होता.
तर, शिंदे गटाकडे पुरेसं संख्याबळ आहे. एखादा गट बाहेर पडला तर त्यात गैर काय आहे. आमदार, खासदारांची जास्त संख्या आमच्याकडे आहे. बहुसंख्येकडे नेणारी आकडेवारी महत्त्वाची आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा, असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला.


कराडच्या पाणी प्रश्नासाठी तीव्र जन आंदोलन उभारणार - ऋतुराज मोरे


वेध माझा ऑनलाइन - 
कराड शहरासाठी उपयुक्त असणारी 24 तास पाणी पुरवठा योजना गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे, पूर्णतः कार्यान्वित झालेली नाही. तसेच काही महिन्यापासून 24 तास पाणी योजना सुरु असल्याचे सांगून प्रत्यक्षात शहराला पूर्वी सारखाच 2 वेळा पाणी पुरवठा केला जात आहे व तरीही वार्षिक बिल न आकारता 24 तास पाणी योजनेचे बिल आकारले जात आहे. हे शहरातील नागरिकांसाठी अन्यायकारक बाब असल्याने कराड शहर काँग्रेस कमिटी या महत्वाच्या पाणी प्रश्नावर मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन इशारा देत आहे कि 24 तास पाणी योजनेची अनियमितता तात्काळ दुरुस्त करावी अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा कराड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऋतुराज मोरे यांनी दिला. आज त्यांनी काँग्रेस पक्षातर्फे निवेदन मुख्याधिकारी रमाकांत डाके उपस्थित नसल्याने उपमुख्याधिकारी विशाखा पवार यांना देण्यात आले.
यावेळी कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे, सातारा जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग झाकीर पठाण, नगरसेवक फारुक पटवेकर, माजी नगरसेवक अशोक पाटील, प्रदीप जाधव श्रीकांत मुळे सामाजिक कार्यकर्ते विजय मुठेकर अमीर कटापुरे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी कराड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऋतुराज मोरे म्हणाले, कराड शहराची 24 बाय 7 पाणी पुरवठा योजना म्हणजे मोठे गौडबंगाल आहे. गेली कित्येक वर्षे कराड शहराला रोज 24 तास पाणी पुरवठा चालू होईल म्हणून कराडकर नागरिक वाट पाहत आहेत. परंतु कराड नगरपालिकेच्या ढिसाळ व अनागोंदी कारभारामुळे आजतागायत कराडकर नागरिकांना रोजचा 24 तास पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. कराड नगरपालिका प्रशासनाने 1 एप्रिल 2022 पासून 24 बाय 7 पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करून मीटर प्रमाणे आकारणी चालू केली. परंतु प्रत्यक्षात शहरात  रोज दोनदा च पाणीपुरवठा केला जात आहे व आकारली जाणारी बिले हि कराडकरांना न परवडणारी आहेत. तसेच पाणी पुरवठा सुरु होण्याच्या आधी व नंतर हवेच्या प्रेशर ने मीटर फिरते असे निदर्शनास येते व त्याची सुद्धा आकारणी कराडकरांकडून केली जात आहे हे अत्यंत अन्यायकारक आहे. अशा अनागोंदी कारभारामध्ये तात्काळ सुधारणा व्हावी तसेच जोपर्यंत 24 तास पाणीपुरवठा योजना पूर्णपणे कार्यान्वित होत नाही तोपर्यंत पूर्वीप्रमाणेच वार्षिक बिल आकारणी व्हावी अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारले जाईल.

एकनाथ खडसे मागील आठ दिवसांपासून नॉट रिचेबल ; राजकीय चर्चांना उधाण ;

वेध माझा ऑनलाइन - पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे एकीकडे महाविकास आघाडीमध्ये गोंधळाची परिस्थितीत निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे मागील आठ दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाथाभाऊ अचानक नॉट रिचेबल झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे नेहमी आक्रमकपणे भूमिका मांडत असतात. कार्यकर्ता असो की कुणीही फोन केला तर नाथाभाऊ बोलण्यासाठी हजर असतात. पण मागील 8 दिवसांपासून एकनाथ खडसे हे नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. पहिल्यांदाच एकनाथ खडसे आठ दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. सर्वसामान्यांचा केव्हाही फोन रिसिव्ह करणारे मात्र पहिल्यांदाच नॉट रिचेबल झाल्याने खडसे समर्थक संभ्रमात पडले आहे
एकनाथ खडसे हे मुंबईत असल्याचे सांगण्यात येत असून त्यांची तब्येत खराब असून आराम करत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. मात्र नेहमी संपर्कात राहणारे नाथाभाऊ पहिल्यांदाच नॉट रिचेबल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे.
मध्यंतरी एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती. पण एकनाथ खडसेंनी याबद्दल स्पष्ट शब्दांत नकार दिला होता.

Monday, January 16, 2023

शिंदे गट की ठाकरे गट? खरी शिवसेना कुणाची? निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी!


वेध माझा ऑनलाइन- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आधी निवडणूक आयोग, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय आणि आता पुन्हा निवडणूक आयोग असा हा वाद पोहोचला असून शिवसेना नेमकी कुणाची? याबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. आज शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आयोगासमोर पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची की ठाकरे गटाची? यावर लवकर निर्णय येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि शिंदे सरकारचं स्थैर्य यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय महत्त्वाचा असल्यामुळे त्याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ४० आमदार आणि १३ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील तत्कालीन ठाकरे सरकार कोसळलं आणि शिंदेंच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं. मात्र, एवढा मोठा गट फुटून बाहेर पडल्यामुळे खरी शिवसेना शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटाची की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील गटाची? हा वाद निर्माण झाला. त्यासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या गटानं निवडणूक आयोगासमोर केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू असून त्यावर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या बाजूने युक्तिवाद केला जात आहे.
१३ खासदार आणि ४० आमदारांसह अनेक राष्ट्रीय आणि राज्य कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा करत आपल्यालाच पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह मिळावं, अशी मागणी एकनाथ शिंदेंच्या गटानं केलं आहे. तसेच, उद्धव ठाकरंनी बाळासाहेब ठाकरेंनंतर पक्षाच्या घटनेत बदल करून स्वत:ची पक्षप्रमुखपदी केलेली निवड आणि पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे स्वत:कडे घेतलेले अधिकार बेकायदेशीर असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी आयोगासमोर केला आहे.मात्र, एकीकडे शिंदे गटाकडून असा दावा करण्यात आला असताना दुसरीकडे ठाकरे गटाकडूनही आपली बाजू जोरकसपणे मांडली जात आहे. काही बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंची पक्षाध्यक्षपदी निवड २०१८मध्येच झाली होती. त्यांची मुदत २३ जानेवारी रोजी संपणार असून पक्षांतर्गत निवडणुकांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगासमोर करण्यात आली आहे.
निर्णय कधी लागणार?
शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद केला जात आहे. आज दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपण्याची शक्यता आहे. युक्तिवाद संपल्यानंतर तीन ते चार दिवसांमध्ये आयोगाकडून अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या आठवड्यात आयोगाचा अंतिम निकाल लागू शकतो, असं सांगितलं जात आहे.

मीही शिक्षण मंडळाशी जोडला गेलो आहे ; राज्यात येत्या जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार ; मंत्री चंद्रकांत पाटील,

वेध माझा ऑनलाइन - एखादी संस्था स्थापन करणे सोपे असते परंतु ती सलग 100 वर्षे चालविणे सोपे नसते येथील शिक्षण मंडळ संस्थेशी मीही जोडलेलो आहे. टिळक हायस्कूल व शिक्षण मंडळ या संस्था राज्यात नावाजलेल्या आहेत कन्या शाळेत विद्यार्थी परिषदेचे कार्यालय पूर्वी होते. तेथे मी यायचो, तेथे पुस्तक चळवळ मोठ्या प्रमाणावर होती. संस्थेला आज केवळ काही रक्कम न देता मी प्रस्ताव तयार करायला सांगतो, निधी दिला जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 साली नविन शैक्षणिक धोरण जाहीर केले होते. संपूर्ण देशात तीन वर्षाचा एकच अभ्यासक्रम असणार आहे. महाराष्ट्र राज्यात येत्या जून महिन्यापासून या धोरणाची अंमलबजावणी केली जाईल, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी यावेळी जाहीर केले. कराड शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवात मंत्री पाटील बोलत होते

यावेळी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री आ. बाळासाहेब पाटील, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल हुद्देदार, चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाईस चेअरमन अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर, मुख्याध्यापक गोकुळ अहिरे, शताब्दी महोत्सव माजी विद्यार्थी समिती अध्यक्ष अॅड. सदानंद चिंगळे, टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी सांस्कृतिक सेवा संघाचे अध्यक्ष मिलिंद पेंढारकर आदी उपस्थित होते.




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 साली नविन शैक्षणिक जाहीर केलेले होते. संपूर्ण देशात एकच तीन वर्षाचा अभ्यासक्रम असणार आहे. महाराष्ट्र राज्यात येत्या जून महिन्यापासून या राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी केली जाईल, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी जाहीर केले.

कराड शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवात मंत्री श्री. पाटील बोलत होते. कार्यक्रमास उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री आ. बाळासाहेब पाटील, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल हुद्देदार, चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाईस चेअरमन अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर, मुख्याध्यापक गोकुळ अहिरे, शताब्दी महोत्सव माजी विद्यार्थी समिती अध्यक्ष अॅड. सदानंद चिंगळे, टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी सांस्कृतिक सेवा संघाचे अध्यक्ष मिलिंद पेंढारकर आदी उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणात मूळ विचार माहिती होतील, असा नागरिक तयार होईल. भगवद्गीता हा हिंदूचा किंवा एका धर्माचा ग्रंथ नाही, तर तो जगाला कसे जगावे अन् कसे जगू नये असे सांगणारे तत्वज्ञान आहे. परंतु ते आमच्या अभ्यासक्रमात नाही. छ. शिवाजी महाराजांचा शाैर्य मोठे आहे, मात्र त्यांचा धडा दोन पानी आहे. घटना लिहिणाऱ्या व हजारो वर्षे ती बदलवणारी लागणार नाही त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा धडा एक पानी अशी खंत व्यक्त केली. तसेच आताच्या अभ्यासक्रमात फाफटपसारा आहे, कुठे इंग्लड, इंडोनियाचा भूगोल आहे, त्याचे आम्हांला काय करायचे आहे.

एखादी संस्था स्थापन करणे सोपे असते, त्यासाठी कागदपत्रे गोळा करणे. परवानग्या घेणे अन् संस्था स्थापन होते. परंतु ती सलग 100 वर्षे चालविणे सोपे नसते. अनेकदा गमतीने असे म्हणतात संस्थेचा नारळ फुटला मग आता संस्था कधी फुटणार असे म्हणतात. मीही या संस्थेची जोडलेलो आहे. कन्या शाळेत विद्यार्थी परिषदेचे कार्यालय पूर्वी होते. तेथे मी यायचो, तेथे पुस्तक चळवळ मोठ्या प्रमाणावर होती. संस्थेला आज केवळ काही रक्कम न देता मी प्रस्ताव तयार करायला सांगतो, निधी दिला जाईल. अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.


Saturday, January 14, 2023

आजपासून टिळक हायस्कूलचा शताब्दी महोत्सव सुरू ; महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन ; चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी यांनी दिली माहिती

वेध माझा ऑनलाइन - कराड येथील टिळक हायस्कूलचा शताब्दी महोत्सव आजपासून सुरू  होत आहे. टिळक हायस्कूल च्या मैदानावर या महोत्सव काळात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली 

ते म्हणाले, या महोत्सव काळात १६.जानेवारी २०२३  रोजी महोत्सवाचा शुभारंभ होत आहे. सकाळी १०:०० वाजता या महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री व उत्तर प्रदेश चे माजी राज्यपाल,मा.ना.श्री.राम नाईक. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील. शालेय शिक्षण, मराठी भाषा व पर्यावरण मंत्री ना.दीपक केसरकर. सातारा जिल्ह्याचे पालक मंत्री व राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई. सातारा जिल्ह्याचे खासदार ना.श्रीनिवास पाटील. कराड दक्षिणचे आमदार.पृथ्वीराज चव्हाण कराड उत्तरचे आमदार.बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

१७.०१.२०२३ रोजी टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा ‘देश रंगीला’ हा कार्यक्रम, १८.०१.२०२३ रोजी आत्माराम विद्यामंदिरचा ‘अमृत महोत्सवी भारत’ व इंग्रजी माध्यमाची शाळेचा    ‘इये मराठीचिये नगरी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. १९.०१.२०२३ रोजी महिला महाविद्यालयाचा ‘महाराष्ट्राची कला’ व स्व.रा.कि.लाहोटी कन्या प्रशालेचा ‘रंग महाराष्ट्राचा’ हा सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. २०.०१.२०२३ रोजी शिक्षण मंडळ कराड चे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. २१.०१.२०२३ रोजी शिक्षण मंडळाच्या गुणवान माजी विद्यार्थ्यांचा ‘मी असा घडलो’ हा मुलाखातीपर कार्यक्रम तसेच शिक्षण मंडळाच्या माजी विद्यार्थ्यांचे ‘कुर्यात सदा टिंगलंम’ हे नाटक सादर होणार आहे २२.०१.२०२३ रोजी शिक्षण मंडळाच्या सर्व शाखांमधील माजी विद्यार्थी/ विद्यार्थिनी, माजी शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा व सायंकाळी माजी विद्यार्थ्यांचा ‘ज्ञानियांचे शिंपले -  स्वरांचे मोती’ अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या शताब्दी महोत्सवाच्या  सर्व कार्यक्रमांना आजी माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी कराड व परिसरातील नागरिक,  शिक्षणप्रेमी व पालकांना मोठ्या संखेने उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी,सचिव चंद्रशेखर देशपांडे यांनी केले आहे.