Monday, January 15, 2024

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी कृष्णा कृषी महोत्सवाचे उद्घाटन ; अंतिम टप्प्यातील तयारीची डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केली पाहणी

वेध माझा ऑनलाइन। कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आयोजित आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या तयारीची पाहणी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केली. यावेळी त्यांनी या कृषी महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी (ता. १७) सकाळी ११ वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती दिली.
शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती व शेतीसाठी असणारे साहित्य एकाच छताखाली उपलब्ध व्हावे, यासाठी कृष्णाकाठाचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या जयंतीनिमित्त य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना पुरस्कृत कृष्णा कृषी परिषदेच्या माध्यमातून आणि कृष्णा विश्व विद्यापीठ व कृष्णा सहकारी बँकेच्या सहकार्यातून कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर १७ ते २१ जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुलबाबा भोसले यांनी महोत्सव स्थळाला भेट दिली. यावेळी बोलताना डॉ. अतुलबाबा म्हणाले, या महोत्सवात ११ देशातील कृषी तज्ज्ञ येणार असून पशु, फुले व फळे अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या महोत्सवामुळे या भागातील लोकांच्या कृषी उत्पादनांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. बुधवारी (ता. १७) सकाळी ११ वाजता उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी राज्यसभेचे खासदार श्री. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांच्यासह राज्यभरातील विविध साखर कारखान्यांचे चेअरमन, संचालक व कृषी क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर मोठया संख्येने स्टॉलची उभारणी करण्यात येत आहे. विशेषतः उद्घाटन सत्र व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भव्य शामियाना उभारण्यात येत आहे. या महोत्सवात होणाऱ्या कृषी परिसंवादांसाठी स्वतंत्र सभागृहाचीही उभारणी करण्यात येत आहे. कराडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन होत असून, यासाठी ११ देशातील तज्ज्ञ उपस्थित राहणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी वातानुकूलित एसी सभागृहाची उभारणी करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरु आहे. या महोत्सवाला शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने भेट देतील, असा विश्वास डॉ. सुरेश भोसले यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, कृष्णा कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, भाजपाचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, उमेश शिंदे, रमेश मोहिते, अभिषेक भोसले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


शिवराज्याभिषेक संकल्पनेवर आधारित प्रवेशद्वाराची रचना
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष सर्वत्र साजरे होत आहे. या पार्श्वभूमीवर या महोत्सवाचे प्रवेशद्वार शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या संकल्पनेवर उभारण्यात येत आहे. त्याचसोबत अयोध्या येथे प्रभू श्री रामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणेच्या सोहळ्यानिमित्ताने प्रभू श्री रामाची प्रतिमा प्रवेशद्वाराजवळ उभारली जाणार असून, हे या महोत्सवाचे आगळे-वेगळे आकर्षण ठरणार आहे.


गिरीश महाजन यांचे नव्या भूकंपाचे संकेत ; म्हणाले...फक्त 15 दिवस थांबा... तुम्हाला वाटणारही नाही, असे बडे नेते भाजपमध्ये येतील ; गिरीश महाजन यांच्या दाव्याने खळबळ ;

वेध माझा ऑनलाइन। माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सकाळी सकाळीच महाविकास आघाडीला हा मोठ्या राजकीय भूकंपाचा धक्का बसलेला असतानाच भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आणखी नव्या भूकंपाचे संकेत दिले आहेत. फक्त 15 दिवस थांबा राज्यात आणखी प्रचंड मोठे भूकंप होणार आहेत. तुम्हाला वाटणारही नाही, असे नेते भाजपमध्ये येणार आहेत, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच महायुतीच्या भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गट या तीनही पक्षांचा एकत्रितरित्या मेळावा पार पडला. आगामी निडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगावातील श्रीकृष्ण लॉनमध्ये हा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे मंत्री गिरीश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील या तिघांची उपस्थिती होती. यावेळी गिरीश महाजन यांनी हे संकेत दिले.

अजूनही भूकंप होतील असे संकेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मीडियाशी संवाद साधताना दिले आहेत. मी तुम्हाला बोललो होतो की, राजकारणात मोठे मोठे भूकंप होतील. त्याप्रमाणे आज काँग्रेसचे मिलिंद देवरा यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. पुढे अजूनही मोठे भूकंप होतील, असं वक्तव्य भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी केले असून आगामी काळात आणखी मोठे राजकीय प्रवेश होण्याचे संकेत व्यक्त केले आहेत. आज मिलिंद देवरा यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. पुढच्या 15 दिवसात आपल्याला अपेक्षित नाही अशी लोक भाजपमध्ये प्रवेश करताना दिसतील, असं मोठं विधान गिरीश महाजन यांनी केलं आहे.
दरम्यान, काँग्रेसचे माजी मंत्री मिलिंद देवरा शिंदे गटात गेल्याने काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यावर मंत्री अनिल पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे अनेक आजी माजी आमदार, खासदार आणि पदाधिकारी संपर्कात आहेत. राष्ट्रवादी सोबतच भाजप आणि शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर विकासाचा विचार करून प्रवेश होणार आहेत. येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये अनेक धक्के बसताना दिसतील, असा दावा अनिल पाटील यांनी केला आहे.

Sunday, January 14, 2024

उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर मोठं कांड होणार, अज्ञात व्यक्तीची पोलिसांना फोन करून दिली माहिती ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन । उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर मोठं कांड होणार, असा फोन अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्र पोलीसांना केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या घराबाहेर मोठं कांड करणार आहेत, असा फोन अज्ञात व्यक्तीचा महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला केला आहे. राज्यात विविध घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुका निवडणुका तोंडावर आहेत. अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर ‘कांड’ होण्याचा फोन येणं अत्यंत गंभीर आहे.

नेमकं काय घडलं?
एक व्यक्ती मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवास करत होती. अशात या व्यक्तीच्या कानावर एक संभाषण पडलं. हे संभाषण ऐकून ही व्यक्ती हादरली. जे संभाषण ऐकलं, त्यामुळे या व्यक्तीच्या पायाखालची जमीन सरकली. हे संभाषण होतं, उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं… उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर मोठं कांड करणार असल्याचं या व्यक्तीने एकलं. ताबडतोब या व्यक्तीने महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला अन् या बाबतची माहिती दिली.

अज्ञाताने पोलिसांना दिलेली माहिती अशी की ...
महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या 4 ते 5 व्यक्तींचे संभाषण ऐकलं. या संभाषणातील मुद्दे या व्यक्तीने पोलिसांना कळवले. हे तरुण उर्दू भाषेत संभाषण करत होते. हे तरुण मोहम्मद अली रोडवर रुम रेंटवर घेणार आहेत, अशी माहिती या व्यक्तीने पोलिसांना दिली. त्यानंतर मुंबई पोलीस आता सतर्क झाले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या घडाबाहेर मोठं काहीतरी घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने ही माहिती महाराष्ट्र पोलिसांना दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे यांच्या घराबाहेर काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यंत्रणा अलर्ट मोडवर आहे दरम्यान
ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. महाराष्ट्रातील डाऊट फुल सरकारची नाही ते सुडाने पेटलेलं सरकार आहे ज्या पद्धतीने शिवसेना नेत्यांचं संरक्षण काढून घेतलेल आहे. त्यामुळे भविष्यात काय घडलं तर याची जबाबदारी केंद्राची आणि महाराष्ट्राच्या गृह खात्याची असेल, असं म्हणत संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस आव्हाडांना म्हणाले... तुम्ही शेण खाता .. उद्धव ठाकरेंना म्हणाले...तुम्ही रामाला नाकारलं, म्हणून अयोध्येला यायला तुम्हाला लाज वाटत आहे...

वेध माझा ऑनलाइन। 
आम्ही अयोध्येला जात आहोत. पण तुम्ही येऊ शकत नाही. आता रामाला काय उत्तर द्यावं हे तुम्हाला समजत नाही. म्हणून तुम्हाला यायला लाज वाटत आहे. ज्या रामाला नाकारलं, त्या रामाला काय उत्तर द्यायचं? अरे नजरे कैसे मिलाऊ रामलल्ला से... अशी अवस्था तुमची झाली आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीस म्हणतात ते कारसेवेला गेले होते. मशीद पडली तेव्हा ते अयोध्येत होते. पण फडणवीस यांचं वय तेव्हा काय होतं? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता... उद्धव ठाकरे यांच्या या टीकेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे. मी अवघा वीस वर्षाचा असताना कारसेवेला गेलो होतो. एकदा नाही तीनदा गेलो होतो. बाबरीचा ढाचा पडला तेव्हा मी तिथेच होतो, असं सांगतानाच उद्धवजी, तेव्हा तुम्ही कुठे होता? कारसेवक छाताडावर गोळ्या झेलतो होते, तेव्हा तुम्ही जंगलात जाऊन फोटो काढत होता, अशी खरपूस टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाण्यात कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. कारसेवकांचं अभिनंदन करतो. कालपरवा उद्धव ठाकरे यांनी विचारलं, फडणवीस म्हणतात, ते कारसेवक आहेत, तेव्हा त्यांचं वय काय होतं? अरे हो… मी 20व्या वर्षी कारसेवेला गेलो. जेव्हा रामाची सेवा करण्याचा मौका मिळाला तेव्हा कारसेवेला गेलो. उद्धवजी तुमचं तर वय होतं कारसेवा करण्याचं. तुम्ही कुठे होता? तुम्ही काय करत होता? तुम्ही का गेला नाही कारसेवेला? त्यावेळी तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होता. तेव्हा तुम्ही चित्र काढत होता. ज्यावेळी कारसेवक गोळ्या खात होते, त्यावेळी तुम्ही जंगलात फोटो काढत होते. त्यावेळी तुम्ही कुठल्या तरी वाघाचे फोटो काढत होता. खरे वाघ मशिदीवर चढून कोठारी बंधूच्या रुपाने झेंडा लावत होते, छातीवर गोळी खात होते, मृत्यूमुखी पडत होते, अन् तुम्ही फोटो काढत होता. तुम्ही आम्हाला काय सवाल करता?, असा सवालच देवेंद्र फडणवीस यांनी केला.

माझी आधी ओळख रामसेवक
मीही अभिमानाने सांगतो मी कारसेवक आहे. पहिल्या कारसेवेला 20व्या वर्षी गेलो होतो. त्यावेळी बदायूच्या जेलमध्ये 18 दिवस होतो. दुसऱ्या कारसेवेच्यावेळी जेव्हा कलंकित ढाचा खाली आला तेव्हा मी तिथेच होतो. एवढेच नव्हे तर अटलजींच्या काळात तिसरी कारसेवा झाली. तेव्हाही मी तिथे होतो. कारण मी कारसेवक आहे, राम सेवक आहे. उपमुख्यमंत्री म्हणून माझा परिचय दुसरा आहे. त्यापेक्षा महत्त्वाचा परिचय रामसेवक आणि कारसेवक म्हणून आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तुम्ही शेण खात होता
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. राम मंदिराचं निर्माण आज देशाला अस्मिता देत आहे. हे केवळ मंदिर नाही, भारतीय संस्कृतीचा हुंकार आहे. ही ठाणे धर्मनगरी असली तरी इथे काही महाभाग राहतात. राम काय खात होता हे सांगणारे. राम काय खात होते हे बाजूला ठेवा. तुम्ही नक्कीच शेण खाता हे आमच्या लक्षात आलंय. अशा शेण खाणाऱ्यांना बाजूला ठेवा आणि रामसेवा सुरू ठेवा, असा हल्लाच त्यांनी चढवला.


सातारा जिल्ह्यातील पोलीस अधिकारी झटपट बदलले ! एकूण 44 बदल्या केल्या...

वेध माझा ऑनलाइन। जिल्हास्तरावरील पोलिस आस्थापना मंडळाचे मान्यतेने व शिफारशीनुसार सातारा जिल्ह्यातील 10 पोलिस निरीक्षक, 14 सहाय्यक पोलिस निरीक्षक व 20 पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

नाव / ठिकाण पुढील प्रमाणे...

बाळासाहेब लोंढे -पुसेगाव- (वाचक उपविभाग कोरेगाव), अश्विनी वाघमारे -शाहूपुरी- (कोरेगाव), प्रमोद सावंत- रहिमतपूर- (नियंत्रण कक्ष सातारा), अर्जुन चोरगे- कराड- (शहर वाचक उपविभाग वाई), बशीर मुल्ला- शाहूपुरी- (कराड शहर), शितल जाधव -सातारा तालुका- (वाहतूक शाखा सातारा), शामराव मदने -सातारा- (नियंत्रण कक्ष सातारा), राजेंद्र पुजारी- कराड- (फलटण), विशाल जगताप- सातारा शहर- (आर्थिक गुन्हे शाखा सातारा).

विश्वास कडव- सातारा- (सातारा शहर), चांदणी मोटे- सातारा- (वाई), अनिल पाटील- उंब्रज- (वाहतूक शाखा कराड शहर), भाग्यश्री चव्हाण -शाहूपुरी- (डायल 112 सातारा), महेश पाटील- पाटण- (कराड शहर), भैरवनाथ कांबळे- कराड तालुका-(वाचक उपविभाग कराड), रत्नदीप भंडारे- भुईंज -(सातारा शहर), कृष्णराज पवार- वाई- (सायबर पोलिस) दिपाली गायकवाड- फलटण शहर- (वाचक उपविभाग दहिवडी), अशोक राऊत - कोरेगाव- (जिल्हा विशेष शाखा सातारा).

कराडातील महिंद्रा हॉटेल येथे संजय राऊत आणि इंद्रजित गुजर यांची भेट ; शिवसेना उद्धव ठाकरें गटाचे सातारा जिल्ह्याचे नेते इंद्रजित गुजर यांचा वेध-माझा शी संवाद ;

वेध माझा ऑनलाइन।
कराडच्या महिंद्रा हॉटेल येथे शिवसेना खासदार संजय राऊत आणि सातारा जिल्ह्याचे उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते नगरसेवक इंद्रजित गुजर यांची भेट झाली यावेळी सातारा जिल्ह्यातील पुढील रणनीती ठरण्यासह कराडात शिवसेनेचा मेळावा घेण्यात येण्याबाबत ठरल्याचे इंद्रजित गुजर यांनी वेध माझा शी बोलताना सांगितले...

साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी कै सौ रजनीताई पाटील यांचे नुकतेच निधन झाले त्यानिमित्ताने खासदार पाटील यांचे सांत्वन करण्यासाठी आलेल्या खासदार राऊत यांनी स्वतः फोन करून इंद्रजित गुजर यांना त्याठिकाणी बोलावून घेतले पाटील कुटुंबियांचे सांत्वन करून राऊत यानी गुजर याना आपल्या बरोबर घेत हॉटेल महिंद्रा याठिकाणी त्यांच्याशी तासभर चर्चा केली

शिवसेना खासदार संजय राऊत यापूर्वी कराडात श्री गुजर यांच्या निवासस्थानी आले होते तसेच त्यांच्या आहेर कोलेजवर देखील त्यांनी आपली उपस्थिती लावली होती गुजर यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश करावा ही स्वतः उद्धव ठाकरे यांची इच्छा असल्याचे सूतोवाच राऊत यांनी त्यावेळी केले होते त्यानंतर गुजर यांनी शिवसेनेत प्रवेश करत जिल्ह्यातील राजकारणात ठाकरे गटाची एन्ट्री करून दिली होती
त्यानंतर गुजर यांची सेनेच्या समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली होती 
आज सेना नेते संजय राऊत कराडात आले असता त्यांची इंद्रजित गुजर यांच्याशी भेट झाली असता लवकरच कराडात उद्धव ठाकरे गटाचा मोठा मेळावा घेण्यात येणार असल्याचे आश्वासन गुजर यांनी राऊत याना दिले असल्याचे स्वतः इंद्रजित गुजर यांनी वेध माझाशी बोलताना सांगितले तसेच युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांच्या पुढील काही दिवसांनी होणाऱ्या सातारा जिल्ह्यातील दौर्याबाबत देखील चर्चा झाल्याचे ते म्हणाले... 

आमदार अपात्रता प्रकरण ; शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित आमदार अपात्रता प्रकरणावर 16 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता ; ...शरद पवार गटाची धाकधूक वाढली...!

वेध माझा ऑनलाइन। राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रत प्रकरणावर निकाल दिल्यानंतर पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टात आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. ही सुनावणी 16 जानेवारी रोजी होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे पण ही राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेली नवी याचिका नाही. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी एकत्रित आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. त्याचसंदर्भातली ही सुनावणी असणार आहे. 

राहुल नार्वेकर यांनी कोणालाही अपात्र न करता शिवसेना हा पक्ष शिंदेंना दिला. त्यानंतर ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची भूमिका जाहीर करण्यात आली. पण अद्याप राहुल नार्वेकरांच्या निकालाला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली नाहीये. त्यामुळे जर 16 जानेवारी रोजी सुनावणी झाली तर ही सुनावणी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची एकत्रित आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर होईल. 

राहुल नार्वेकरांनी दिलेला नेमका निकाल काय?
एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचसोबत, शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचा व्हिप अधिकृत ठरवत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा व्हिप विधानसभा अध्यक्षांनी अवैध ठरवलाय. त्यामुळे या निकालात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळालाय.  उद्धव ठाकरेंच्या मनात आलं म्हणून ते एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करू शकत नसल्याची टिप्पणी राहुल नार्वेकर यांनी केलीय. खरी शिवसेना शिंदेंचीच असल्यामुळे शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवत, ठाकरे गटाची आमदार अपात्र करण्याबाबतची याचिका फेटाळण्यात आलीय. सोबतच ठाकरे गटाचेही सर्व आमदार पात्र करण्यात आलेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आमदार अपात्र करण्याबाबतच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळत, दोन्ही गटांतील कोणतेही आमदार अपात्र केले नाहीत. 

शरद पवार गटाची धाकधूक वाढली...

राहुल नार्वेकरांनी शिवसेनेबाबत निर्णय देताना पक्ष संघटनेपेक्षा विधीमंडळातील बहुमताचा विचार केला. त्यामुळे ठाकरे गटाला धक्का तर बसला, पण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची धाकधूकही वाढली आहे. कारण विधिमंडळातील बहुमत हे सध्या अजित पवार गटाकडे आहे. कारण विधिमंडळातील बहुमत हे सध्या अजित पवार गटाकडे आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर अजित पवारांनी दावा केला असून हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचला आहे. दोन्ही बाजूंकडून त्या संबंधित युक्तिवाद सुरू असून कागदपत्रेही जमा करण्यात आली आहेत. आता निवडणूक आयोग त्यावर काय निर्णय घेतंय हे पाहावं लागेल.