Sunday, August 31, 2025

विक्रम पावसकर व अजय पावसकर यांच्या वतीने कराडकरांसाठी तीन समाजोपयोगी उपक्रम जाहीर , फिरता दवाखाना, आजी-आजोबा, महिला व तरुणींसाठी आरोग्य योजना

वेध माझा ऑनलाईन
गेली पन्नास वर्षे कराडच्या सामाजिक जीवनात सक्रिय असणारे हिंदुत्ववादी नेते व ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांच्या कार्याच्या सन्मानार्थ त्यांची सुपुत्र भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर व अजय पावसकर यांच्या वतीने कराडकरांसाठी तीन समाजोपयोगी उपक्रम जाहीर करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात येणाऱ्या सेवा सप्ताहात 17 ते 24 सप्टेंबर दरम्यान या योजना कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
याबाबतची माहिती प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, विनायक पावसकर, हिंदू एकता आंदोलनाचे संस्थापक चंद्रकांत जिरंगे, भाजपचे शहराध्यक्ष सुषमा लोखंडे, अजय पावसकर उपस्थित होते .

अजय पावसकर यांच्या प्रयत्नाने मातृशक्ती आरोग्य भेट योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पंधरा वर्षांच्या पुढील लाडकी आई व ताई यांना सिंदूर हेल्थ कार्ड देण्यात येईल. या कार्डधारक महिलांची तीन महिन्यातून एकदा डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या कार्डधारक महिलांना वर्षातून एकदा पर्यटन सहलीचा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ देण्यात येणार असून दीपावली निमित्त भेटवस्तू देण्यात येणार आहे.

लाडके आजी आजोबा यांच्यासाठी अण्णा पावस्कर हेल्थ कार्ड योजना सुरू करण्यात आले असून या योजनेअंतर्गत ७० वर्षांच्या पुढील आजी-आजोबांना येणार आहे. या डॉक्टरांची या नागरिकांची रक्तदाब डायबिटीस व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात येईल. डॉक्टरने दिलेली प्रत्येक महिन्याच्या औषधी विनामूल्य देण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून निराधार आजोबांना सकाळी व संध्याकाळी जेवणाचे डबे पोहोच करण्यात येणार आहेत. या दोन्ही योजना परिसरात राबविण्यात येणार असून भविष्यात त्या इतर शहराच्या भागात राबवण्याचा मानस आहे. 

हिंदू एकता आंदोलन च्या वतीने दरवर्षी हिंदवी दहीहंडीचे आयोजन करण्यात येते मात्र यावर्षी पूरस्थिती लक्षात घेऊन हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या खर्चाची रक्कम कराड शहराच्या आरोग्यासाठी समर्पण समर्पित करण्याचे विक्रम पावस्कर यांनी जाहीर केले होते. त्यानुसार विक्रम पावस्कर यांच्या संकल्पनेतून व ओम सेवा माध्यमातून कराड शहरासाठी विनामूल्य आरोग्य सेवेचा फिरता दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेनुसार प्रत्येक पेठेमध्ये नियोजित ठिकाणावर एक दिवस याप्रमाणे ही गाडी उभी राहणार असून तज्ञ डॉक्टर नागरिकांची आजारावरील औषधे त्याच ठिकाणी देणार आहेत. तसेच नागरिकांच्या गरजेनुसार, ऑक्सिजन युनिट, वॉकर बेड यासारखे साहित्यही विनामूल्य वापरासाठी उपलब्ध होणार आहे. विनायक पावस्कर व त्यांच्या समर्थकांच्या सामाजिक रुणातून उतराई होण्यासाठी कराडकर यांना विनामूल्य उपलब्ध होणाऱ्या या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन अजय पावसकर यांनी केले आहे.आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांनीही या उपक्रमांचा कराडकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

Saturday, August 30, 2025

मुंबईतील मराठा आंदोलनकर्त्यांना कराडमधून जेवणाचे साहित्य रवाना ;

वेध माझा ऑनलाईन।
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील हे कालपासुन मुंबईत आंदोलनास बसले आहेत. तेथील आंदोलनकर्त्यांच्या जेवण व पाण्याच्या सोयीसाठी भाकरी, पाणी जमा करण्याचे आवाहन कराडच्या मराठा समन्वयकांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत शहर परिसरातून २५ हजारांवर भाकरी-चपाती व जेवणाचे साहित्य जमा झाले कराडच्या दत्त चौकातुन शनिवारी रात्री मुंबईकडे ते सर्व साहित्य रवाना करण्यात आले.  

मुस्लीम समाजासह इतर अन्य समाजांनीही भाकरी व जेवणाचे साहित्य आणुन येथील दत्त चौकात थांबलेल्या समन्यवकांकडे जमा केले. हे सर्व साहित्य  आज मुंबईला रवाना करण्यात आले.

कुख्यात घरफोडी प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर ; सातारा पोलिसांची कारवाई -

वेध माझा ऑनलाइन
पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात सातारा पोलिसांनी केलेल्या कारवाईत कुख्यात घरफोडी प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. लखन भोसले असे मृत आरोपीचे नाव असून तो अनेक घरफोडी आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या वॉन्टेड लिस्टमध्ये आहे या कारवाईत दुसरा एक आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाला आहे शिक्रापूरजवळ संशयित आरोपी लखन भोसले आणि त्याचा साथीदार या भागात असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती.दरम्यान शिक्रापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांच्या घटना वाढल्या होत्या. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मराठा आंदोलनावर चर्चेतून सर्वसमावेशक निर्णयाचा सरकारचा प्रयत्न ; फडणवीस

वेध माझा ऑनलाईन ।
मराठा आंदोलनावर चर्चेतून सर्वसमावेशक निर्णयाचा सरकारचा प्रयत्न आहे. लोकांना एकमेकांसमोर आणत झुंजवायचे किंवा प्यादी लढविण्याचा विरोधकांचा प्रयत्न असला तरी सरकार मात्र कायदेशीर मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडली. ते सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे हे आंदोलनासाठी मुंबईत दाखल झाल्यानंतर विरोधकांची भाषा बदलली आहे. ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांसमोर आले पाहिजेत. त्यांच्यात भांडणे लागायला हवीत, असे काहींचे प्रयत्न आहेत. सकाळपासूनच्या त्यांच्या विधानातून तसे प्रयत्न लक्षात येत आहेत. मात्र, विरोधकांनी आंदोलनावर राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न करू नये. यात त्यांचेच तोंड भाजले जाईल, अशा शब्दांत फडणवीस यांनी विरोधकांना फटकारले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात स्थितीचा आढावा घेतला. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना परिस्थितीची माहिती दिली.
 
फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, विरोधकांनी आंदोलकांच्या मागण्यांबाबत सोयीची भूमिका नव्हे तर ठाम भूमिका घ्यावी. समाजांत भांडणे लावून राजकीय लाभ घ्यायचा असल्याने विरोधक ठाम भूमिका घेत नाहीत. आम्हाला मात्र कोणत्याही समाजाला नाराज करायचे नाही. आम्ही सर्व समाजाच्या इच्छा समजून घेत आहोत आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आताही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण लागू आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकून आहे. त्यानुसार भरती आणि प्रवेश प्रक्रियाही सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

मुंबईत मराठा आंदोलनादरम्यान एका मराठा बांधवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू ;

वेध माझा ऑनलाईन
राजधानी मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनादरम्यान आणकी एका मराठा बांधवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील शिवनेरीजवळ एका मराठा बांधवाचा असाच ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर, सर्वच आंदोलकांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली. मात्र, आता आणखी एका आंदोलक युवकाचा मृत्यू झाल्यानंतर उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या विजय घोगरे (रा.टाकळगाव, ता.अहमदपूर,जि.लातूर) या तरुण कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यांना तत्काळ उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो मराठा बांधव मुंबईत येत आहेत. गाड्या घेऊन, कुणी रेल्वेने तर कुणी मिळेल ते वाहन पकडून मुंबई गाठत आहे. मात्र, गैरसोयी अभावी मराठा बांधवांचे हाल होताना दिसून येते. गेल्या दोन दिवसांपूर्वीच जुन्नर येथे आंदोलनात सहभागी असलेल्या एका कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर, आज मुंबईत अशीच घटना घडल्याने मराठा समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईत आमरण उपोषण करत आहेत. तर कार्यकर्त्यांचा वाढता उत्साह आणि सलग घडणाऱ्या दुर्दैवी घटनांमुळे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मुंबईती सीएसएमटी परिसरात आज विजय घोगरे या युवकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप करत इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरे जरांगे यांच्याशी फोनवर बोलले ...काय बोलले?

वेध माझा ऑनलाईन
राज्यातील मराठा आंदोलकांनी मुंबई धडक दिली असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू झाले आहे. या उपोषणाला महाविकास आघाडीतील अनेक नेते, आमदार, खासदार भेट देऊन आपली भूमिका मांडत आहेत. शिवसेना नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल आणि आजही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी भेट देत त्यांच्यासमवेत चर्चा केली. विशेष म्हणजे आजच्या भेटीत शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी फोनवर बोलणंही करुन दिलं. विशेष म्हणजे दीड ते 2 मिनिटे मनोज जरांगे पाटील यांचं उद्धव ठाकरेंसोबत फोनवर बोलणं झालं आहे. त्यामुळे, दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, काय बोलणं झालं याची उत्सुकता सर्वांनाच आहे. मात्र, मराठा आंदोलकांच्या मुंबई राहण्यासाठी आणि सोयी-सुविधेबाबत चर्चा झाल्याचे समजते.

रोहित पवार यांची सोशल मीडियावर पोस्ट ; म्हणाले...पाणपोया बंद, रेल्वे स्थानकावरील तसेच इतर ठिकाणावरील सार्वजनिक स्वच्छतागृहांना काही ठिकाणी लॉक ;

वेध माझा ऑनलाइन।
मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही मराठा बांधव आणि मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली आहे. त्यासाठी मुंबईत भगवे वादळ आले आहे. हजारो मराठा आंदोलक राज्यभरातून मुंबईत हजर झाले आहेत. या आंदोलकांना पाहून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘सरकार एवढे निष्ठुर झाले तर लोकशाहीलाच काय तर माणुसकीला सुद्धा अर्थ राहणार नाही’ असे म्हटले आहे

रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया एक्स अकाऊंटवर पोस्ट करत म्हटले की, ‘मुंबई शहरातील पाणपोया बंद, रेल्वे स्थानकावरील तसेच इतर ठिकाणावरील सार्वजनिक स्वच्छतागृहांना काही ठिकाणी लॉक करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी पाणी बंद करण्यात आले आहे. पिण्याचे पाणी देखील उपलब्ध केले जात नसल्याचे तसेच सामाजिक संघटना पाठवत असलेली मदत देखील ब्लॉक करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे समजत आहे. खाऊगल्ल्या, टपऱ्या, हॉटेल्स देखील बंद ठेवण्याचे अलिखित आदेश आहेत. शांतेतेच्या मार्गाने आंदोलन करणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आंदोलक माणसं आहेत याचा सरकारला विसर पडला की काय?’
मुंबई शहरातील पाणपोया बंद, रेल्वे स्थानकावरील तसेच इतर ठिकाणावरील सार्वजनिक स्वच्छतागृहांना काही ठिकाणी लॉक करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी पाणी बंद करण्यात आले आहे. पिण्याचे पाणी देखील उपलब्ध केले जात नसल्याचे तसेच सामाजिक संघटना पाठवत असलेली मदत देखील ब्लॉक करण्याचे प्रयत्न… 
पुढे ते म्हणाले, ‘सरकार एवढे निष्ठुर झाले तर लोकशाहीलाच काय तर माणुसकीला सुद्धा अर्थ राहणार नाही. सरकारने त्वरित मूलभूत सुविधा द्याव्यात आणि आंदोलकांशी संवाद सुरू ठेवावा. संवाद ठेवल्यास संवेदनशीलता आणि सामंजस्य दाखवण्यास आंदोलक देखील सकारात्मक प्रतिसाद देतील आणि तोडगा निघेल.’ सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.