वेध माझा ऑनलाईन ।
मराठा आंदोलनावर चर्चेतून सर्वसमावेशक निर्णयाचा सरकारचा प्रयत्न आहे. लोकांना एकमेकांसमोर आणत झुंजवायचे किंवा प्यादी लढविण्याचा विरोधकांचा प्रयत्न असला तरी सरकार मात्र कायदेशीर मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडली. ते सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषदेत बोलत होते.
मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे हे आंदोलनासाठी मुंबईत दाखल झाल्यानंतर विरोधकांची भाषा बदलली आहे. ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांसमोर आले पाहिजेत. त्यांच्यात भांडणे लागायला हवीत, असे काहींचे प्रयत्न आहेत. सकाळपासूनच्या त्यांच्या विधानातून तसे प्रयत्न लक्षात येत आहेत. मात्र, विरोधकांनी आंदोलनावर राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न करू नये. यात त्यांचेच तोंड भाजले जाईल, अशा शब्दांत फडणवीस यांनी विरोधकांना फटकारले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात स्थितीचा आढावा घेतला. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना परिस्थितीची माहिती दिली.
फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, विरोधकांनी आंदोलकांच्या मागण्यांबाबत सोयीची भूमिका नव्हे तर ठाम भूमिका घ्यावी. समाजांत भांडणे लावून राजकीय लाभ घ्यायचा असल्याने विरोधक ठाम भूमिका घेत नाहीत. आम्हाला मात्र कोणत्याही समाजाला नाराज करायचे नाही. आम्ही सर्व समाजाच्या इच्छा समजून घेत आहोत आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आताही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण लागू आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकून आहे. त्यानुसार भरती आणि प्रवेश प्रक्रियाही सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
No comments:
Post a Comment