Saturday, January 16, 2021

कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ लसीकरणास उत्साहात प्रारंभ...

कराड, ता. १६ : संपूर्ण जगाच्या दृष्टीने २०२० हे वर्ष अत्यंत वाईट गेले. कोविड – १९ नामक विषाणूने जगभर घातलेल्या थैमानामुळे संपूर्ण जगाची नाकेबंदी झाली होती. भारतातही लाखो लोक कोरोनाग्रस्त झाले. एकूणच लॉकडाऊनच्या स्थितीत आणि भयग्रस्त वातावरणात २०२० हे वर्ष सरले. पण नव्या वर्षात म्हणजेच २०२१ मध्ये मात्र कोरोना लसीच्या निमित्ताने एक आशेचा किरण जगासमोर निर्माण झाला आणि आज खऱ्या अर्थाने लाखो लोक ज्याची गेले वर्षभर वाट पाहत होते; त्या कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाला उत्साहात प्रारंभ झाला. कोरोना काळात पश्चिम महाराष्ट्रासाठी आरोग्य संजीवनी ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आजपासून लसीकरणास प्रारंभ करण्यात आला.

भारत सरकारच्यावतीने आजपासून देशभर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या 'कोविशिल्ड' या लसीचे ५५० डोस कृष्णा हॉस्पिटलला उपलब्ध झाले असून, पहिल्या टप्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र केंद्र उभारण्यात आले असून, या केंद्राचे उद्घाटन कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. कृष्णा हॉस्पिटलमधील डॉ. विश्वास पाटील यांना पहिली लस देण्यात आली. 

याप्रसंगी कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, वैद्यकीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस. टी. मोहिते, दंतविज्ञानचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण एन. डी., फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजुलु, नर्सिंगच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की कृष्णा हॉस्पिटल हे कोरोनामुक्तीचे महत्वाचे केंद्र असून, आत्तापर्यंत याठिकाणी ३३५८ कोरोनाग्रस्त रूग्णांनी उपचार घेतले आहे.  त्यापैकी ३२०० हून अधिक रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कृष्णा हॉस्पिटल हे 'कोविशिल्ड' या लसीसाठीच्या संशोधनासाठीचेही एक महत्वाचे केंद्र राहिले आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये. कृष्णा हॉस्पिटलमध्ये लसीकरणासाठी स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात आले असून, लसीकरणानंतर लाभार्थाला ३० मिनिटे वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या टप्पात आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार असून, त्यासाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या ३००० जणांची नोंदणी करण्यात आली आहे. याठिकाणी दररोज १०० जणांना लस दिली जाणार आहे. 

यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, रोहिणी बाबर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
***

No comments:

Post a Comment