काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांच्या निधनाने एका राजकीय युगाचा अंत झाला आहे. काही दिवसांपूर्वी सातारा येथील रुग्णालयात विलासकाकांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर रुग्णालयात त्यांच्या तब्येतीबाबत चौकशी केली होती. डॉक्टरांच्या सोबत चर्चेत सांगितले होते कि, काकांची तब्येत सुधारत आहे. तसेच काल सुद्धा काकांचे पुत्र उदयसिंह पाटील यांच्या सोबत फोनवरून काकांच्या तब्येतीची चौकशी केली होती. पण अचानक आज सकाळी समजले कि काकांचे दुःखद निधन झाले. हि बातमी अत्यंत वेदनादायी होती. काकांच्या जाण्याने राज्यातील काँग्रेसचे पितृतुल्य छत्र हरपले आहे अशा शब्दात आ पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली .
आ चव्हाण बोलताना पुढे म्हणाले, काका काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते होते तसेच कोणत्याही पक्षांच्या आमिषाला बळी न पडता काँग्रेसची विचारधारा त्यांनी कधीही सोडली नाही. विचारधारेशी ते कायम प्रामाणिक राहिले. कधीही ते जातीयवादी विचारधारेकडे झुकले नाहीत. जनतेशी नाळ असलेला नेता अशी त्यांची ओळख होती. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे ते सलग ३५ वर्षे आमदार होते. तसेच जवळपास १२ वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून विविध खात्यांची त्यांनी जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती.
विलासकाकांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या दुःखामध्ये मी व माझे कुटुंबीय सहभागी आहोत.
No comments:
Post a Comment