वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपालिकेच्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासह विविध विकासकामांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत भाजपचे गटनेते गुंड्याभाऊ वाटेगावकर यांनी बुधवारी पालिका प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. घनकचरा प्रकल्पातील कामांपासून ते रखडलेल्या विकासकामांपर्यंत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले त्यांनी यामध्ये घोटाळा झाल्याची शंका व्यक्त करत या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली.
यावेळी नगरसेवक शिवाजी पवार, सुमित शिंदे, अजय पावसकर, आशुतोष डुबल, किशोरी शिंदे, वैष्णवी वायदंडे, शारदा माने, वर्षा वास्के, सुहास जगताप उपस्थित होते.
वाटेगावकर म्हणाले,
घनकचरा प्रक्रिया केंद्रात बगिचा विकसित करणे, अंतर्गत रस्ते, तांबडी माती टाकणे, शोभेची झाडे लावणे आणि परिसराचे सुशोभीकरण यासाठी ठराव क्रमांक १६३ अंतर्गत सुमारे ₹१ कोटी ८१ लाखांचा खर्च मंजूर करण्यात आला. कागदोपत्री ही कामे पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष पाहणीत अशी कोणतीही कामे दिसून आली नाहीत. त्यामुळे संबंधित कामांचे मोजमाप, बिले आणि देयकांची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली.
बायोगॅस प्रकल्प परिसरातील काही रस्त्यांची कामेही प्रत्यक्षात न होता कागदोपत्री पूर्ण दाखविण्यात आल्याची शंका व्यक्त करत, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
घनकचरा प्रक्रिया केंद्राच्या कारभारावरही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. ओल्या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया होत नसल्याने, मनुष्यबळाची कमतरता, बेल्ट वाहिनीची दुरवस्था आणि कचऱ्याचे वाढते ढीग यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा आरोप त्यांनी केला.याशिवाय बीपीसीएल आणि एअरटेलच्या वाटाघाटींमध्ये हस्तक्षेप झाल्याचा संशय व्यक्त करत त्या व्यवहारांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी शहरातील विकासकामांसाठी मंजूर झालेल्या ₹११ कोटींच्या निधीबाबत खुलासा मागण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावले होते. मात्र, तीन तास प्रतीक्षा करूनही बैठक न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप वाटेगावकर यांनी केला. "सात महिन्यांपूर्वी टेंडर होऊन वर्क ऑर्डर निघालेली अनेक विकासकामे अद्याप सुरू झालेली नाहीत. हा केवळ प्रशासकीय हलगर्जीपणा आहे की यामागे दुसरे काही कारण आहे?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
नगरसेवक शिवाजी पवार यांची टिका
नगरसेवक शिवाजी पवार यांनीही पालिका प्रशासनावर टीका करत, "पालिका निवडणुकीनंतर सहा महिने उलटले, मात्र आतापर्यंत केवळ एकच सर्वसाधारण सभा झाली आहे. विकासकामांवर चर्चा होण्यासाठी नियमित सभा होणे आवश्यक आहे. अन्यथा शहराचा विकास ठप्प होईल," असे सांगितले.
शेवटी, घनकचरा प्रकल्प, विकासकामे आणि कथित आर्थिक अनियमिततेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात आली नाही, तर भाजपच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेवकांनी दिला. पालिकेतील कथित गैरव्यवहारांबाबत भाजपने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेची कराडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे
No comments:
Post a Comment