कराड शहरातील ४५ रस्त्यांच्या कामांसाठी आमदार डॉ. अतुल भोसले आणि महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊन कामांचे वर्क ऑर्डरही निघाले आहेत. मात्र प्रत्यक्षात कामांना सुरुवात होत नसल्याने, तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापन, ड्रेनेज, रस्ते आणि कचरा गाड्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांची चांगलीच कानउघाडणी केली. येत्या आठवडाभरात प्रश्नांवर ठोस तोडगा न निघाल्यास कराड पालिकेत 'बोंबाबोंब' आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपच्या नगरसेवकांनी दिला.
मुख्याधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीस नगरसेवक गुंड्याभाऊ वाटेगावकर शिवाजी पवार, अजय पावसकर, सुमित जाधव, गणेश पवार, वैष्णवी वायदंडे, आशुतोष डुबल, सुहास जगताप, सुरज माने, सचिन वास्के तसेच अतुल शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत शहरातील बीपीसीएल गॅस पाईपलाईन आणि एअरटेल कंपनीच्या केबल टाकण्याच्या कामालाही विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या कामांसाठी तीन महिन्यांपूर्वी ठराव होऊनही प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याने रस्त्यांची कामे रखडल्याचा आरोप करण्यात आला.
भाजपचे पदाधिकारी अतुल शिंदे यांनी स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व बीएलओ संदर्भातील कॅम्पबाबत प्रश्न उपस्थित केला. राजकीय नेत्यांना अशा प्रकारचे कॅम्प घेण्यास परवानगी नसताना काही पदाधिकाऱ्यांनी कोणत्या अधिकाराने कॅम्प आयोजित केला, असा सवाल त्यांनी केला. त्यावर मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी कोणत्याही राजकीय नेत्यांना अशा प्रकारच्या कॅम्पला परवानगी नसून, असे आयोजन झाले असेल तर ते बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले.
प्रितीसंगम बागेतील अव्यवस्थेचाही मुद्दा बैठकीत गाजला. नगरसेवक अजय पावसकर यांनी बागेत गाढवे फिरत असल्याची बाब उपस्थित करत मंदिर परिसरात खाद्यपदार्थ नेण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली. देवस्थान असणारा तो परिसर आहे याचे भान त्याठिकाणी ठेवणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले तसेच शहरातील तीनही बागांची योग्य देखभाल होत नसल्याचा आरोप करण्यात आला.
यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी गाढवे फिरल्याच्या घटनेबाबत मुख्याधिकारी व्हटकर यांनी चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. मात्र केवळ कर्मचाऱ्यांवर कारवाई न करता संबंधित ठेकेदाराचे बिल रोखावे, अशी एकमुखी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली.
नगरसेवक आशुतोष डुबल यांनी मान्सूनपूर्व कामांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. धोकादायक वृक्षांच्या फांद्यांची छाटणी, ड्रेनेज स्वच्छता आणि इतर प्रतिबंधात्मक कामे वेळेत न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक सुहास जगताप यांनी प्रितीसंगम बागेत नियमावली तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक असलेले फलक लावण्याची मागणी केली.
कंपन्यांसोबत बैठक घेण्याची मागणी
बीपीसीएल गॅस पाईपलाईन आणि एअरटेल कंपनीच्या केबल टाकण्यास नेमका विलंब का होत आहे, याचा खुलासा करण्यासाठी संबंधित कंपन्यांसोबत सर्व नगरसेवकांची तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली. कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे अथवा इतर कोणत्याही कारणामुळे कराड शहरातील विकासकामे रखडत असतील तर त्याचा जाब विचारला जाईल, असा इशाराही देण्यात आला.
नगरसेवक शिवाजी पवार आक्रमक ;
नगरसेवक शिवाजी पवार हे यावेळी आक्रमक झाले त्यांनी बैलबाजार रोडच्या कामाचा मुद्दा उपस्थित केला. नोव्हेंबर २०२५ मध्ये मंजूर झालेल्या या रस्त्यासाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून १ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून ८ एप्रिल २०२६ रोजी कामाचे वर्क ऑर्डरही देण्यात आले. मात्र त्यानंतर गॅस पाईपलाईन व केबल टाकण्याच्या कारणामुळे काम रखडल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment