छत्रपती शिवाजी महाराजांचे अद्वितीय शौर्य, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे अतुलनीय बलिदान, महाराणा प्रतापांचा स्वाभिमान आणि माँ भवानीचा आशीर्वाद हृदयात घेऊन कऱ्हाडच्या धारकऱ्यांनी राजस्थानच्या वीरभूमीत श्री दुर्गामाता दौडीचा भगवामय जागर घडविला. गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातून राजस्थानात प्रचारक व विस्तारक म्हणून गेलेल्या धारकऱ्यांनी उदयपूर, चित्तोडगड, भिलवाडा आणि फालना परिसरात शिवकार्याचा विचार पोहोचवत श्री दुर्गामाता दौडीच्या माध्यमातून धर्मजागृतीचा संदेश दिला.
महाराणा प्रताप यांच्या शौर्यगाथेने पावन झालेल्या मेवाडच्या भूमीतून या उपक्रमाला सुरुवात करत धारकऱ्यांनी ऐतिहासिक वारसा, हिंदवी स्वराज्याची प्रेरणा आणि राष्ट्रनिष्ठेचा विचार जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला. महाराष्ट्रातून राजस्थानपर्यंत भगव्या ध्वजाचा सन्मान, शिवरायांच्या विचारांचा जयघोष आणि श्री दुर्गामातेच्या भक्तीचा जागर घडविण्याचा प्रयत्न या दौडीच्या माध्यमातून करण्यात आला.
महाराणा प्रतापांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन धारकऱ्यांनी श्री दुर्गामाता दौडीच्या प्रचारकार्याला प्रारंभ केला. राजस्थानमध्येही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे धारकऱ्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, धर्मवीर संभाजी महाराजांचे बलिदान आणि महाराणा प्रतापांचा स्वाभिमान या ऐतिहासिक प्रेरणांचा संगम साधत तरुणांमध्ये राष्ट्रनिष्ठा, ध्येयनिष्ठा आणि सांस्कृतिक अस्मितेची भावना जागृत करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्याचा विस्तार महाराष्ट्राबाहेर राजस्थानच्या भूमीत होत असून, कऱ्हाडच्या धारकऱ्यांनी प्रचारक व विस्तारक म्हणून स्वीकारलेली जबाबदारी या उपक्रमातून अधोरेखित झाली. केवळ एका प्रदेशापुरते मर्यादित न राहता शिवरायांचे विचार, धर्मवीर संभाजी महाराजांच्या त्यागाची प्रेरणा आणि हिंदवी स्वराज्याचा इतिहास नव्या भागांतील जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे कार्य सुरू आहे.
भगव्या ध्वजाच्या साक्षीने, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘जय महाराणा प्रताप’, ‘गुरू गोविंदसिंह महाराज की जय’ आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषात राजस्थानच्या वीरभूमीत श्री दुर्गामाता दौडीचा जागर करण्यात आला. या उपक्रमातून महाराष्ट्र आणि राजस्थान यांच्यातील ऐतिहासिक प्रेरणांचा धागा जोडत शिवकार्याच्या विस्ताराचा निर्धार धारकऱ्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment