Saturday, October 10, 2026

नवरात्रीत वॉर्ड क्रमांक १३ उजळला! स्ट्रीट लाईटसह CCTV कॅमेरेही बसवले ; नागरिकांनी मानले अतुलबाबांचे आभार ;

वेध माझा ऑनलाइन
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरातील वॉर्ड क्रमांक १३ मध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या निधीतून विविध ठिकाणी स्ट्रीट लाईट बसविण्यात आले असून, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत.

दैत्य निवारणी चौक ते अजंठा चौक, पंकज हॉटेल बॅक रोड, अग्निशमन दलाच्या गेटसमोरील परिसर तसेच शाहू चौकाजवळील भागात स्ट्रीट लाईटची सुविधा नसल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत होता. या परिसरात प्रकाशव्यवस्था नसल्यामुळे गैरप्रकार वाढल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात येत होत्या. त्यामुळे या भागात स्ट्रीट लाईट बसविण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती.

वॉर्ड क्रमांक १३ चे नगरसेवक आशुतोष डुबल यांनी नागरिकांची ही मागणी आमदार डॉ. अतुल भोसले यांच्यापर्यंत पोहोचवून यासाठी पाठपुरावा केला. विशेष म्हणजे, दैत्य निवारणी देवी मंदिर परिसरात नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांची, विशेषतः महिलांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. ही बाब लक्षात घेऊन उत्सवाच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि परिसरातील सुरक्षितता वाढावी, या उद्देशाने तातडीने उपाययोजना करण्यात आल्या.

आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या निधीतून स्ट्रीट लाईट आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने परिसरातील अंधार दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच नवरात्रोत्सवाच्या काळात अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठीही या सुविधांचा उपयोग होणार आहे.

नागरिकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाल्याने नगरसेवक आशुतोष डुबल यांनी वॉर्डातील नागरिकांच्या वतीने आमदार डॉ. अतुल भोसले यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment