वीरशिरोमणी महाराणा प्रताप यांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाच्या परंपरेने पावन झालेल्या राजस्थानातील चित्तोडगड नगरीत श्री दुर्गामाता दौडीचा प्रारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर, हिंदू धर्माविषयी अभिमान आणि राष्ट्रनिष्ठेची भावना जनमानसात रुजविण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या दौडीमुळे राजस्थानच्या ऐतिहासिक भूमीत शिवकार्याचा जागर घडत आहे.
गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या आदेशानुसार कऱ्हाडमधील धारकरी राजस्थानमध्ये प्रचारक व विस्तारक म्हणून दाखल झाले आहेत. महाराणा प्रताप यांच्या शौर्यगाथेची साक्ष देणाऱ्या या भूमीत त्यांनी स्मारकाचे दर्शन घेऊन श्री दुर्गामाता दौडीच्या प्रचारकार्याला सुरुवात केली. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.
महाराणा प्रताप यांच्या स्वातंत्र्यनिष्ठेचा वारसा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या विचारांची प्रेरणा यांचा संगम घडविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता राजस्थानसारख्या ऐतिहासिक प्रदेशातही श्री दुर्गामाता दौड आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्याचा परिचय करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
शौर्य, स्वाभिमान, त्याग आणि धर्मनिष्ठेचा संदेश घेऊन कऱ्हाडचे धारकरी राजस्थानमध्ये कार्यरत झाले आहेत. श्री दुर्गामाता दौडीच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण करणे आणि ऐतिहासिक महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, हा या कार्यामागील प्रमुख हेतू आहे.
No comments:
Post a Comment