Tuesday, December 13, 2022

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील काही पाेलिस निरीक्षक हे आजही महाविकास आघाडीचे सरकार असल्यासारख वागत आहेत. काही पाेलिस अधिकारी हे हिंदु विराेधी भुमिका घेत असल्याची तक्रार आमच्यापर्यंत आली आहे. त्या सर्वांची नावे आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यापर्यंत पाेहचविणार आहाेत. सातारा जिल्ह्यातील फलटण, महाबळेश्वर, सातारा, पाचगणी येथील पोलीस निरीक्षक हिंदू विरोधी भूमिका घेत आहेत. तेव्हा त्या सर्व पाेलिस निरीक्षकांचा सांगून कार्यक्रम करणार असे भाजप आमदार नितेश राणे यांनी आज सातारा येथील पत्रकार परिषदेत जाहीरपणे सांगितले.नितेश राणेंच्या या वक्तव्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे.

नितेश राणे म्हणाले, महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा कसा आणता येईल. यावर आम्ही काम करत आहे. हिवाळी अधिवेशनात तो विषय कदाचित मांडला जाईल. पोलिसांना कोणत्या कायद्यांतर्गंत शिक्षा द्यावी, याबाबत स्पष्टता नाही. परंतु धर्मांतर विरोधी कायदा आणल्यानंतर त्यात स्पष्टता येईल. पोलिस अधिकारी हिंदू विरोधी भूमिका घेत आहेत. त्यांचा बंदोबस्त केला जाईल.

नितेश राणेंच्या अडचणी वाढणार ; नांदगाव ग्रामस्थांना धमकी देणे भोवणार!

वेध माझा ऑनलाइन- राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी माझ्या अधिकाराखाली आहेत. त्यामुळे, जर आम्हाला मतदान केले नाही, तर सरकारचा एकही रुपयाचा निधी नांदगाव गावाला दिला जाणार नाही, असे वक्तव्य आमदार नीतेश राणे यांनी नांदगाव येथे प्रचार सभेत केले होते. त्यानंतर नीतेश राणेंच्या विरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी व नांदगाव ग्रामस्थांना धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

आम्हाला मतदान केले नाही तर निधी देणार नाही, अशी धमकी देणाऱ्या आमदार नीतेश राणे  यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नांदगाव शाखाप्रमुख राजा म्हसकर यांनी केली आहे. या संदर्भातील राजा म्हसकर यांनी एक निवेदन कणकवली पोलीस निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिले आहे. तसेच नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल न झाल्यास नांदगाव ग्रामस्थांसमवेत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने दिला आहे.

राज्यातील शाळांना 1100 कोटी अनुदान ; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाला मोठा निर्णय

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील शाळांना 1100 कोटी अनुदान देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. या  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 6 हजार 10 प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना तसेच 14 हजार 862 तुकड्यांना अनुदान मिळेल. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे 63,338 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना होणार आहे.

राज्य सरकाराच्या या निर्णयाची माहिती देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत की, आज मंत्रिमंडळाने सर्व शाळा आणि तुकड्याने 20 टक्क्यांप्रमाणे अनुदान, यातच ज्यांना अनुदान नाही त्यांना 20 टक्के, तसेच जे 20 टक्क्यांच्या टप्प्यात आहे, त्यांना 40 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच 40 टक्के असणाऱ्यांना 60 टक्के अनुदान देण्यास मान्यता देण्यात येणार आहे. यामुळे 63,338 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना लाभ मिळणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.  
राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, त्रुटींच्या पुर्ततेनंतर 20 टक्के अनुदानासाठी 367 शाळा पात्र असून 40 टक्के अनुदानासाठी 284 शाळा पात्र आहेत. 20 टक्के अनुदान घेत असलेल्या 228 शाळांना 40 टक्के अनुदान देण्यात येईल.  तर 40 टक्के अनुदान घेत असलेल्या 2009 शाळांना 60 टक्के अनुदान देण्यात येईल.
मुल्यांकनानुसार अनुदानास पात्र परंतु शासनाच्या स्तरावर अद्याप घोषित न केलेल्या 3122 शाळांना 20 टक्के अनुदान देण्यात येईल. अनुदानासाठी पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळांना अटी व शर्ती लागू राहतील. त्याच प्रमाणे त्रुटींची पुर्तता करण्यासाठी शेवटची संधी म्हणून एक महिन्याची मुदत देण्यात येत आहे. अन्यथा, पुढील एक महिन्यात अशा शाळा व तुकड्यांना स्वयं अर्थसाहाय्यित म्हणून मान्यता देण्यात येईल. ज्या शाळा यासाठी तयार होणार नाहीत, त्यांची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

स्व. जयमाला जयवंतराव भोसले यांची ९० वी जयंती साजरी...

वेध माझा ऑनलाइन -  आयुष्यात माणूस म्हणून जन्माला येणे ही सर्वात मोठी आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. अशावेळी दुसऱ्यांच्या जीवनात आनंद पसरविण्यासाठी आणि त्यातून स्वतःचा आनंद मिळविण्यासाठी हे आयुष्य सार्थकी लावले, तर जीवन नक्कीच सुखकारक बनविता येईल, असे प्रतिपादन जळगाव येथील दीपस्तंभ फौंडेशनचे संचालक यजुर्वेन्द्र महाजन यांनी केले. कृष्णा उद्योग समूहाच्या आधारवड स्व. जयमाला जयवंतराव भोसले (आईसाहेब) यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त आयोजित 'आई' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. दरम्यान डॉ अतुल भोसले यांनी यावेळी आपल्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला या भावपूर्ण कार्यक्रमात आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत त्यांनी काही आठवणी जाग्या केल्या भोसले कुटुंबात जन्म झाला हे आपले भाग्य असल्याचे सूतोवाच त्यांनी यावेळी केले 

व्यासपीठावर कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, सौ. गौरवी भोसले व श्री. विनायक भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आईसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

दरम्यान, व्याख्यानात बोलताना श्री.  महाजन म्हणाले, सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) आणि  स्व. जयमाला भोसले (आईसाहेब) यांच्यासारख्या व्यक्ती या परिसराला लाभल्या हे या भागातील लोकांचे भाग्य म्हणावे लागेल. इथे राहणाऱ्या प्रत्येकाला त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद लाभले आहेत. त्यांनी जी संस्कारांची पेरणी केली, तेच सामाजिक कार्याचे संस्कार त्यांच्या पुढच्या पिढीतही परावर्तित झाल्याचे या संपूर्ण कुटुंबाला पाहिल्यावर दिसून येते. ग्रामीम भागात आप्पासाहेबांनी शिक्षण, सहकार आणि आरोग्य क्षेत्रात जे काम उभे केले आणि डॉ. सुरेशबाबांनी ज्याप्रकारे या कामाचा विस्तार केला, ते पाहून त्यांच्या कार्याला सलाम करावासा वाटतो

प्रत्येकाच्या जीवनात आई ही सर्वात जवळची व्यक्ती असते. आई प्रचंड त्याग करते, प्रेम करते, कष्ट करणे आणि माफ़ही करते. प्रेम, त्याग, कष्ट आणि माफ करण्याची वृत्ती आली की जीवनात सर्वोत्कृष्ट होता येते. मायबाप जी संस्कारांची शिदोरी देतात, ती प्रत्येकाला नेहमीच आयुष्यभर पुरते. सध्याच्या काळात मोबाईल व टीव्ही बघण्यात महिलांची मोठी शक्ती आणि सर्जनशीलता वाया जात आहे. त्याऐवजी त्यांनी पुस्तक वाचनाला अधिक वेळ दिला तर अधिक संस्कारक्षम पिढी घडविता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की मुलींच्या शिक्षणासाठी आप्पांनी शिक्षणसंस्थेची स्थापना केली. आजसुद्धा कृष्णा अभिमत विद्यापीठात विविध विद्याशाखेत शिक्षण घेणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या सर्वाधिक आहे. किंबहुना जिल्ह्यात सर्वाधिक महिलांना नोकरीची संधी मिळवून देणारा कृष्णा उद्योग समूह आहे. आप्पांच्या प्रेरणेतून सुरू झालेला कृष्णा महिला सरिता बझार आणि कृष्णा महिला औद्योगिक संस्था उत्तम काम करत आहे. तिथेही महिलांना मोठी रोजगार संधी निर्माण झाली आहे. आप्पांच्या या सगळ्या कार्यामागे आईचे मोठे पाठबळ होते.

आईसाहेबांच्या आठवणी सांगताना डॉ. अतुल भोसले म्हणाले, की आप्पांनी या परिसराचा विकास करण्याच्यादृष्टीने अनेक विधायक कामे केली. या प्रत्येक कामात आज्जींनी त्यांना खंबीर साथ दिली. ज्या-ज्यावेळी आप्पासाहेबांसमोर राजकीय - सामाजिक अडचणी उभ्या राहिल्या, त्या-त्यावेळी आज्जींनी या अडचणींतून मार्ग काढत, आपले कुटुंब सांभाळत आप्पांच्या सामाजिक कार्याला पाठिंबा देण्याचे कार्य केले. आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले, संस्कार केले. माझ्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मलाही त्यांनी संस्कारांची शिकवण दिली. अशा कुटुंबात माझा जन्म झाला हे मी माझे भाग्य समजतो.  आप्पांच्या जाण्यानंतर त्या दुःखातून आज्जींना सावरण्याचे व त्यांना आधार देण्याचे मोठे काम विनूबाबांनी केले. नातू या नात्याने मला आणि विनूबाबांना त्यांचा मिळालेला स्नेह आणि प्रेम न विसरण्यासारखे आहे.

कार्यक्रमाला जि. प. सदस्या सौ. श्यामबाला घोडके, रेठरे बुद्रुकच्या सरपंच सौ. सुवर्णा कापूरकर, माजी सरपंच सौ. प्रविणा हिवरे, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सारिका गावडे, कृष्णा बँकेच्या संचालिका सौ. सारिका पवार यांच्यासह विविध संस्थांच्या चेअरमन, व्हॉईस चेअरमन आणि संचालिकांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्राचार्य डॉ. वैशाली मोहिते यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले.


कराडला शोभायात्रेने विजय दिवस समारोहास प्रारंभ

वेध माझा ऑनलाइन -  विजय दिवस समारोहात आज शोभा यात्रेने उत्साहात प्रारंभ झाला. विजय दिवस चौकातील विजय स्तंभास अभिवादन केल्यानंतर शोभा यात्रेस भाई गंगाराम गुजर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, गट शिक्षणाधिकारी सन्मती देशमाने, माजी नगराध्यक्षा श्रीमती शारदा जाधव, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, राष्ट्रवादीच्या सरचिटणीस संगीता साळुंखे यांच्या उपस्थितीत त्यास प्रारंभ झाला. 
यावेळी जेष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार, विजय दिवस समितीचे विनायक विभुते, चंद्रकांत जाधव, सहसचीव विलासराव जाधव, अॅड. परवेझ सुतार, उद्योजक सलीम मुजावर, महालिंग मुंढेकर, सतीश बेडके, रत्नाकर शानभाग, प्रा. बी. एस. खोत, रमेश जाधव, मिनल ढापरे, भरत कदम, राजु अपिने, पौर्णिमा जाधव, आसमा इनामदार, प्राजक्ता पालकर, मिल्ट्री होस्टेलचे सहाय्यक अधिक्षक धनाजी जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते. 
शोभा यात्रेत येथील लाहोटी कन्याप्रशाळेचा महिला सबलीकरणांतर्गत ती चा सन्मान, टिळक हायस्कुलचा स्वच्छ भारत मिशन, एसएमएस इंग्लिश मेडीयम स्कूलचा पर्यावरण विषयक, शाहीन हायस्कूलचा भारतीय स्वयंसिध्दतेवर, पालिका शाळा क्रमांक बाराचा संविधान विषयक जनजागृती, कोटा ज्युनियर कॉलेजचा स्त्री भ्रूण हत्या, यशवंत हायस्कूलचा कारगील युध्दातील प्रसंगावर, कमला नेहरू ज्युनियर कॉलेजचा महिला सबलीकरण, दि. का. पालकर माध्यमिक शाळा, डॉ. द. शी. एरम अपंग सहाय्य संस्थेचा जय जवान जय किसान हे चित्ररथ सहभागी झाले होते.  सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे एनसीसी छात्र, आदर्श विद्यार्थी, आदर्श विद्यार्थीनी सहभागी झाले होते. विजय दिवस चौकातून सुरू झालेली पदयात्रा उपजिल्हा रुग्णालय, कृष्णा नाका मार्गे कन्या शाळा, चावडी चौक, आझाद चौक, दत्त चौकमार्गे विजय दिवस चौकात आली. भरत कदम यांनी सुत्रसंचालन केले.

सुनावणी पुढे ढकलली :

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी 10 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. मात्र, ही सुनावणीदेखील प्रकरणाच्या निर्देशासाठी असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गटाने या प्रकरणाची सुनावणी 7 सदस्यीय खंडपीठासमोर करण्याची मागणी केली आहे. सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवण्याची मागणी ठाकरे गटाकडून ही मागणी केवळ एका मुद्यांवर झाली आहे. त्यामुळे सत्ता संघर्षाच्या सुनावणीला आणखी वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टात सुरू असलेली सुनावणी अतिशय महत्त्वाची समजली जात आहे. पक्षांतर बंदी कायदा आणि इतर कायदेशीर बाबींचा कस या प्रकरणाच्यानिमित्ताने लागणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीत दोन्ही पक्षांनी कोणत्या मुद्यांवर युक्तिवाद होणार, महत्त्वाचे मु्द्दे हे एकत्रितपणे सादर करण्याचे निर्देश घटनापीठाने दिले होते. दोन्ही बाजूंने अजून बऱ्याच गोष्टीवर एकमत झालेले नसल्याचे चित्र आजच्या सुनावणीत दिसून आले.

Monday, December 12, 2022

कराडातील उपजिल्हा रुग्णालयात बोगस डॉक्टरला अटक...

वेध माझा ऑनलाइन - कराड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात डॉक्टर म्हणून फिरणाऱ्या तोतयाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सुहास दिलीप गोरवे वय- 27, रा. दुशेरे, ता. कराड असे त्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. याबाबत उपजिल्हा रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक निलेश शंकर माने यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात सोमवारी सकाळी एकजण डॉक्टरसारखे पांढरे अ‍ॅपरन व गळ्यात ओळखपत्र घालून फिरत असल्याचे सुरक्षारक्षक श्रावण दणाने यांना दिसले. संबंधिताच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे दणाने यांनी ही बाब लिपिक निलेश माने यांना सांगीतली. निलेश माने यांनी आवारात जाऊन पाहिले असता संबंधित व्यक्ती डॉक्टर असल्याच्या अविर्भावात फिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच त्या व्यक्तीच्या गळ्यात महाराष्ट्र शासन, राष्ट्रीय आरोग्य अभियान असे लिहीलेले ओळखपत्र होते. संशय वाटल्यामुळे लिपिक माने यांनी संबंधिताकडे विचारणा केली असता, मी सोनवडी आरोग्य केंद्रात अधिपरिचारक आहे, असे त्याने सांगितले.
संबधित व्यक्तीवर संशय बळावल्याने लिपिक माने यांनी अधिक विचारपूस केली असता. संबंधिताने मी सदरचे ओळखपत्र सातारच्या जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर एका झेरॉक्स सेंटरमधून बोगस तयार करुन घेतल्याचे सांगितले. संबंधित व्यक्ती तोतया डॉक्टर म्हणून फिरत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे लिपिक माने यांनी याबाबतची माहिती वैद्यकीय अधिक्षक आर. जी. शेडगे यांना दिली. तसेच पोलीसही त्याठिकाणी पोहोचले. पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेऊन अटक केली. याबाबतचा गुन्हा कराड शहर पोलिसात नोंदविण्यात आला आहे.