वेध माझा ऑनलाइन- राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी माझ्या अधिकाराखाली आहेत. त्यामुळे, जर आम्हाला मतदान केले नाही, तर सरकारचा एकही रुपयाचा निधी नांदगाव गावाला दिला जाणार नाही, असे वक्तव्य आमदार नीतेश राणे यांनी नांदगाव येथे प्रचार सभेत केले होते. त्यानंतर नीतेश राणेंच्या विरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी व नांदगाव ग्रामस्थांना धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
आम्हाला मतदान केले नाही तर निधी देणार नाही, अशी धमकी देणाऱ्या आमदार नीतेश राणे यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नांदगाव शाखाप्रमुख राजा म्हसकर यांनी केली आहे. या संदर्भातील राजा म्हसकर यांनी एक निवेदन कणकवली पोलीस निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिले आहे. तसेच नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल न झाल्यास नांदगाव ग्रामस्थांसमवेत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने दिला आहे.
No comments:
Post a Comment