Tuesday, December 13, 2022

स्व. जयमाला जयवंतराव भोसले यांची ९० वी जयंती साजरी...

वेध माझा ऑनलाइन -  आयुष्यात माणूस म्हणून जन्माला येणे ही सर्वात मोठी आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. अशावेळी दुसऱ्यांच्या जीवनात आनंद पसरविण्यासाठी आणि त्यातून स्वतःचा आनंद मिळविण्यासाठी हे आयुष्य सार्थकी लावले, तर जीवन नक्कीच सुखकारक बनविता येईल, असे प्रतिपादन जळगाव येथील दीपस्तंभ फौंडेशनचे संचालक यजुर्वेन्द्र महाजन यांनी केले. कृष्णा उद्योग समूहाच्या आधारवड स्व. जयमाला जयवंतराव भोसले (आईसाहेब) यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त आयोजित 'आई' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. दरम्यान डॉ अतुल भोसले यांनी यावेळी आपल्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला या भावपूर्ण कार्यक्रमात आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत त्यांनी काही आठवणी जाग्या केल्या भोसले कुटुंबात जन्म झाला हे आपले भाग्य असल्याचे सूतोवाच त्यांनी यावेळी केले 

व्यासपीठावर कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, सौ. गौरवी भोसले व श्री. विनायक भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आईसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

दरम्यान, व्याख्यानात बोलताना श्री.  महाजन म्हणाले, सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) आणि  स्व. जयमाला भोसले (आईसाहेब) यांच्यासारख्या व्यक्ती या परिसराला लाभल्या हे या भागातील लोकांचे भाग्य म्हणावे लागेल. इथे राहणाऱ्या प्रत्येकाला त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद लाभले आहेत. त्यांनी जी संस्कारांची पेरणी केली, तेच सामाजिक कार्याचे संस्कार त्यांच्या पुढच्या पिढीतही परावर्तित झाल्याचे या संपूर्ण कुटुंबाला पाहिल्यावर दिसून येते. ग्रामीम भागात आप्पासाहेबांनी शिक्षण, सहकार आणि आरोग्य क्षेत्रात जे काम उभे केले आणि डॉ. सुरेशबाबांनी ज्याप्रकारे या कामाचा विस्तार केला, ते पाहून त्यांच्या कार्याला सलाम करावासा वाटतो

प्रत्येकाच्या जीवनात आई ही सर्वात जवळची व्यक्ती असते. आई प्रचंड त्याग करते, प्रेम करते, कष्ट करणे आणि माफ़ही करते. प्रेम, त्याग, कष्ट आणि माफ करण्याची वृत्ती आली की जीवनात सर्वोत्कृष्ट होता येते. मायबाप जी संस्कारांची शिदोरी देतात, ती प्रत्येकाला नेहमीच आयुष्यभर पुरते. सध्याच्या काळात मोबाईल व टीव्ही बघण्यात महिलांची मोठी शक्ती आणि सर्जनशीलता वाया जात आहे. त्याऐवजी त्यांनी पुस्तक वाचनाला अधिक वेळ दिला तर अधिक संस्कारक्षम पिढी घडविता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की मुलींच्या शिक्षणासाठी आप्पांनी शिक्षणसंस्थेची स्थापना केली. आजसुद्धा कृष्णा अभिमत विद्यापीठात विविध विद्याशाखेत शिक्षण घेणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या सर्वाधिक आहे. किंबहुना जिल्ह्यात सर्वाधिक महिलांना नोकरीची संधी मिळवून देणारा कृष्णा उद्योग समूह आहे. आप्पांच्या प्रेरणेतून सुरू झालेला कृष्णा महिला सरिता बझार आणि कृष्णा महिला औद्योगिक संस्था उत्तम काम करत आहे. तिथेही महिलांना मोठी रोजगार संधी निर्माण झाली आहे. आप्पांच्या या सगळ्या कार्यामागे आईचे मोठे पाठबळ होते.

आईसाहेबांच्या आठवणी सांगताना डॉ. अतुल भोसले म्हणाले, की आप्पांनी या परिसराचा विकास करण्याच्यादृष्टीने अनेक विधायक कामे केली. या प्रत्येक कामात आज्जींनी त्यांना खंबीर साथ दिली. ज्या-ज्यावेळी आप्पासाहेबांसमोर राजकीय - सामाजिक अडचणी उभ्या राहिल्या, त्या-त्यावेळी आज्जींनी या अडचणींतून मार्ग काढत, आपले कुटुंब सांभाळत आप्पांच्या सामाजिक कार्याला पाठिंबा देण्याचे कार्य केले. आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले, संस्कार केले. माझ्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मलाही त्यांनी संस्कारांची शिकवण दिली. अशा कुटुंबात माझा जन्म झाला हे मी माझे भाग्य समजतो.  आप्पांच्या जाण्यानंतर त्या दुःखातून आज्जींना सावरण्याचे व त्यांना आधार देण्याचे मोठे काम विनूबाबांनी केले. नातू या नात्याने मला आणि विनूबाबांना त्यांचा मिळालेला स्नेह आणि प्रेम न विसरण्यासारखे आहे.

कार्यक्रमाला जि. प. सदस्या सौ. श्यामबाला घोडके, रेठरे बुद्रुकच्या सरपंच सौ. सुवर्णा कापूरकर, माजी सरपंच सौ. प्रविणा हिवरे, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सारिका गावडे, कृष्णा बँकेच्या संचालिका सौ. सारिका पवार यांच्यासह विविध संस्थांच्या चेअरमन, व्हॉईस चेअरमन आणि संचालिकांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्राचार्य डॉ. वैशाली मोहिते यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले.


No comments:

Post a Comment