Wednesday, January 18, 2023

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते की स्वराज्यरक्षक होते... उदयनराजे काय म्हणतात ;

वेध माझा ऑनलाइन - राज्यात मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांनी महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधानं केली आहेत. नुकतेच हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज  धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक होते असे विधान केले होते. यावरुन राज्यात वादंग निर्माण झाले होते. त्यांच्या या विधानावर भाजप आणि शिंदे गटाच्या  नेत्यांनी निषेध व्यक्त केला होता. याच दरम्यान आता छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले  यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीरही होते, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीरही होते. शिवाय त्या काळात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी अनेक मशिदी आणि मंदिरं बांधली. साताऱ्यातील शाही मशिदीची देखरेख आमच्या कुटुंबाकडून केली जाते, असंही उदयनराजे भोसले यांनी सांगितले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
उदयनराज म्हणाले,सर्व धर्म समभाव ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराज यांनी मांडली होती.त्यांनी कोणत्याही जाती-धर्मातील लोकांसोबत भेदभाव केला नाही. प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या सोयीने बोलत असतो. मात्र, शिवाजी महाराज अथवा संभाजी महाराजांनी कधीही कोणत्याही धर्माचा अनादर केला नाही.त्यांनी त्याकाळी मंदिर, मशिद बांधल्या. आजही साताऱ्यातील शाही मशिदीची देखरेख आमच्या कुटुंबाकडून केली जाते. त्यामुळे यावरुन कोणताही वाद घालू नये. कारण दोघेही स्वराज्यरक्षक होते आणि धर्मवीरही होते.


कराड पालिकेचे अभियंता रफिक भालदार आदर्श अभियंता पुरस्काराने सन्मानित ;

वेध माझा ऑनलाइन - कराड येथील परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने कराड पालिकेचे अभियंता रफिक दस्तगिर भालदार यांना राज्यस्तरीय आदर्श अभियंता पुरस्कार नुकताच देण्यात आला
कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले

कराडचे तहसीलदार विजय पवार नायब तहसीलदार विजय माने संजय गांधी बबनराव तडवी डॉक्टर मनोज पाटील अरुण भिसे कादर नाईकवडी बी एम गायकवाड बहुजन शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रवीण लादे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाज भूषण आप्पासाहेब गायकवाड सचिव बुद्धभूषण गायकवाड सल्लागार राजेंद्र माने विद्या मोरे सुजाता वरे शंकरराव वीर प्रमोद काशीद सचिन कांबळे आनंदराव सव्वाखंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला..

याप्रसंगी परिवर्तन प्रतिष्ठान चे अध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड म्हणाले,
समाजात पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळावी हाच उद्देश ठेवून सदरचा पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांना देण्यात आला आहे भालदार  यांनी अभियंता म्हणून गेली 35 वर्षांहून अधिक काळ कराड पालिकेच्या सर्व विभागात काम केले आहे स्वच्छ सर्वेक्षण तसेच माझी वसुंधरा स्पर्धेत त्यांनी आपले मोठे योगदान दिले आहे त्यांच्या आतापर्यंतच्या एकूणच कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे

Tuesday, January 17, 2023

वडिलांच्या निधनानंतर आईचा पुनर्विवाह लाऊन दिला ; कोल्हापूरच्या तरुणाने उचलले क्रांतीकारक पाऊल ;

बंध माझा ऑनलाईन - आईवडील हे मुलांचे लग्न लावून देतात. मात्र, कोल्हापुरात एका तरुणाने आपल्या वडिलांच्या निधनानंतर आईचा पुनर्विवाह लाऊन देण्याचे क्रांतिकारक पाऊल उचलले. कोल्हापुरातील युवराज शेले या तरुणाने हा धाडसी निर्णय घेतला.

मागील दोन वर्षात कोरोनाच्या महामारीमध्ये रत्ना शेले यांच्या सख्ख्या बहिणी आणि भावांचा एकूण तब्बल सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर पतीचंही अपघाती निधन झालं. त्यामुळे हतबल झालेल्या रत्ना यांना सावरण्यासाठी मुलाने आईचा दुसरा विवाह करून देण्याचा चंग बांधला होता. तसेच 12 जानेवारीला त्याचा तो निर्णय पूर्ण झाला.

राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी नगरीत हे क्रांतिकारक पाऊल पडले आणि त्याचे कौतुक सर्वत्र होऊ लागले. कष्टकरी तरूणानं, अनिष्ठ रूढींचं ओझं फेकून देत, एक वेगळा विचार कृतीत आणला. त्यातून खर्‍या अर्थानं माणुसकी, स्त्री सन्मान आणि भावनांचा आदर पहायला मिळाला. करवीर तालुक्यातील शिंगणापूर मधील युवराज हा आई आणि वडिलांसोबत राहत होता. त्याचे वडिल नारायण शेले सेंट्रींग काम करत होते. मात्र, 26 जुलै 2022 ला त्यांना एका वाहनानं धडक दिली. यानंतर उपचार घेत असताना दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला.
यानंतर युवराज आणि त्याच्या आईवर जणू आभाळ कोसळलं. त्याची आई तर या अपघातामुळं खचून गेली. एका खासगी रक्तपेढीमध्ये काम करून आणि सायंकाळच्या वेळीस नृत्य कलाकार म्हणून काम करत उदरनिर्वाह करणार्‍या युवराजनं, स्वतःला सावरत आईला धीर दिला. मात्र, या दुःखातून युवराजची आई बाहेर येत नव्हती. कुटुंब प्रमुखावर काळानं घातलेला घाला, आईचं वैधव्य, त्यातून घरात साचलेलं नैराश्य अशा गोष्टी युवराज अनुभवत होता.
काल परवापर्यंत हसत खेळत काम करणारी त्याची आई अगदीच अबोल झाली होती. एकटी पडली होती. कुंकू नसलेलं कपाळ आणि बांगड्याविना सुने सुने दिसणारे आईचे हात युवराजच्या मनाला अगणित वेदना द्यायचे. शेवटी खुप विचार करून, युवराजनं थेट आपल्या आईचा पुनर्विवाह करण्याचा धाडसी निर्णय घेतला. हा निर्णय ऐकल्यावर समाज काय म्हणेल, असं सांगून आईनं पुनर्विवाहाला स्पष्ट नकार दिला. मात्र, युवराज आपल्या निर्णयावर ठाम होता.
युवराज यांच्या लांबच्या नातेवाईकांपैकी, कर्नाटकातील करजगा गावचे मारूती व्हटकर यांचा 2 वर्षापूर्वी घटस्फोट झाल्यानं तेही एकटेच होते. आपल्या आईचा विवाह, मारूती यांच्याशी करण्याचा निर्णय घेवून युवराजनं त्यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीची जाणीव करून देवून, युवराजनं मारूती यांना विवाहासाठी तयार केलं आणि दोघांची संमती मिळाल्यावर, गुरूवारी 12 जानेवारीला शिंगणापूरमध्ये आपल्या आईचा पुनर्विवाह युवराजनं लावून दिला.
या विवाहामध्ये त्यांच्या गल्लीतील नागरिकांनीही मोठी मदत केली. 38 वर्षीय आईच्या भावभावना, इच्छा-आकांक्षा आणि वृध्दत्वामध्ये जोडीदाराची लागणारी गरज या गोष्टी पटवून देवून, युवराजनं आपली आई रत्ना यांना पुनर्विवाहासाठी अखेर तयार केलं. कोल्हापूरच्या तरुणाने घेतला हा धाडसी निर्णय ज्यांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला त्या समाज सुधारकांच्या कार्याला मिळालेली चालना देणारा ठरला आहे.

चोरीला गेलेल्या 43 इलेक्ट्रिक मोटारी पोलिसांकडून हस्तगत ; एकुण 2 लाख 36 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत ; कराड तालुक्यातील 7 जण ताब्यात ;

वेध माझा ऑनलाइन - पेरले व कालगाव ता. कराड गावातील सात जणांनी मिळून कराड तालुक्यातील कालगांव, पेरले, भुयाचीवाडी, खराडे वगेरे गांवामध्ये विहिरीवरील इलेक्ट्रीक मोटारी चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या चोरट्यांच्याकडून ताब्यात घेवून चोरीस गेलेल्या 43 इलेक्ट्रीक मोटारी, गुन्हा करताना वापरलेली हत्यारे, गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल असा एकुण 2 लाख 36 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेतकऱ्यांच्या शेतावरील, विहीरीवरील इलेक्ट्रीक मोटारी चोरी जाण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सपोनि रमेश गर्जे, पोउनि अमित पाटील यांच्या अधिपत्याखाली एक विशेष पथकास तयार केले आहे. या विशेष पथकाने संशयितांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे कसोशिने व कौशल्याने विचारपूस केली. या चोरट्यांनी उंब्रज, औंध, बोरगांव, तळबीड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेले गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये अभय जनार्दन चव्हाण, आप्पा रघुनाथ सातपुते, गणेश बाळासोा कांबळे , गणेश महेंद्र चव्हाण सर्व रा. पेरले, ता. कराड, जि. सातारा, शुभम कालिदास जेटीथोर, साहिल कालिदास जेटीथोर, कपिल सत्यवान जेटीथोर सर्व रा. कालगांव, ता. कराड जि. सातारा  अशी सात संशयित चोरट्याची नावे आहेत.सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अरुण देवकर, सपोनि संतोष तासगांवकर, रमेश गर्ज, संतोष पवार, रविंद्र भोरे, पोउन अमित पाटील, मदन फाळके, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, संतोष पवार, अतिष घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, गणेश कापरे, विशाल पवार, मोहन पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, धीरज महाडीक, वैभव सावंत, पृथ्वीराज जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.

शिंदे गटाचे 7 जिल्हाप्रमुख बोगस? ठाकरे गटाचा आक्षेप;

वेध माझा ऑनलाइन - शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाकडे जाणार याचा निर्णय आजही लागला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेली ही सुनावणी आता शुक्रवारी, 20 जानेवारीला होणार आहे. दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगामध्ये सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे पुरावे समोर आले आहे. शिंदे गटाचे महेश जेठमलानी यांनी नुकताच निवडणूक आयोगासमोर आम्ही सादर केलेला कागदपत्रांमध्ये कुठलीही त्रुटी नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय घेतं? हे दोन्ही गटाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.

ठाकरे गटाचा आक्षेप काय?
शिंदे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या एफिडेव्हिटमध्ये माजी विरोधी पक्ष नेता म्हणून विजय चौगुले यांचं नाव आहे. मात्र, शिंदे गटाने सादर केलेल्या खऱ्या शिवसेनेचा दावा केलेल्या यादीत ते जिल्हाप्रमुख म्हणून दाखवण्यात आले आहेत. अशी अनेक नावे या यादीत असल्याचा ठाकरे दावा गटाने केला आहे. यावर निवडणूक आयोगात आक्षेप घेण्यात आला आहे.

ठाकरे गटाने 7 जिल्हाप्रमुखांवर आक्षेप घेतले आहेत. राजाभाई केणी, तालुकाप्रमुख पदावर असताना रायगडचे जिल्हाप्रमुख दाखवले. राम चंद्रकांत रघुवंशी, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद यांना नंदुरबारचे जिल्हाप्रमुख दाखवले. किरसिंग वसावे, माजी परिषद सदस्य असताना नंदूरबारच जिल्हाप्रमुख दाखवले. नितीन मते माजी जिल्हाप्रमुख असताना चंद्रपूरचे जिल्हाप्रमुख दाखवले. दत्तात्रय साळुंके, जिल्हा समन्वयक असताना धाराशीवचे जिल्हाप्रमुख दाखवले. तर सुरज साळुंखे, युवा सेना राज्य विस्तारक असताना धाराशीव जिल्हाप्रमुख दाखवले असा ठाकरे गटाचा आक्षेप आहे

 

हॅलो महाराष्ट्राचे सकलेन मुलानी राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित... मान्यवरांच्या हस्ते झाला पुरस्कार वितरण सोहळा

वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून कराड येथील परिवर्तन प्रतिष्ठांच्या वतीने हॅलो महाराष्ट्राचे सकलेन मुलाणी यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कराडचे तहसीलदार विजय पवार नायब तहसीलदार विजय माने संजय गांधी बबनराव तडवी डॉक्टर मनोज पाटील अरुण भिसे कादर नाईकवडी बी एम गायकवाड बहुजन शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रवीण लादे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाज भूषण आप्पासाहेब गायकवाड सचिव बुद्धभूषण गायकवाड सल्लागार राजेंद्र माने विद्या मोरे सुजाता वरे शंकरराव वीर प्रमोद काशीद सचिन कांबळे आनंदराव सव्वाखंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.. 

परिवर्तन संस्थेच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार हे समाजाला प्रेरणा देणारे आहेत असे मत विजय पवार यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या मोरे यांनी केले उपस्थित मान्यवरांचे स्वागत आप्पासाहेब गायकवाड यांनी केले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले या पुरस्कार वितरण सोहळ्यास कराड शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

अभयकुमार देशमुख यांच्या मसनवाटा व वुई हेट बायोलाॅजिकल वाॅर पुस्तकाचे प्रकाशन ;

वेध माझा ऑनलाइन ; वाचक अन् लेखकांची संख्या वाढण्यासाठी युवा लेखक तयार होण्यासाठी प्रयत्नवादी राहिले पाहिजे. प्लेग, कोरोना असे जेव्हा केव्हा पन्नास, शंभर वर्षानी आजार, साथ येईल. तेव्हा अभयकुमार देशमुख यांचे वुई हेट बायोलाॅजित वाॅर हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.कराड येथील अभयकुमार देशमुख यांच्या मसनवाटा व वुई हेट बायोलाॅजिकल वाॅर पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दै. सकाळचे सातारा आवृत्तीचे सहयोगी संपादक राजेश सोळस्कर अध्यक्षस्थानी होते. निमसोडचे माजू सरपंच मोहन देशमुख, विठ्ठलराव देशमुख, जेष्ठ पत्रकार शशिकांत पाटील, गोरख तावरे, हेमंत पवार, सचिन शिंदे, अशोक मोहने, संदीप चेणगे, विकास भोसले, पराग शेणोलकर, शरद गाडे, संतोष वायदंडे यांच्यासह पत्रकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, ज्या वयामध्ये पत्रकारीता करतो. त्या वयात कांदबरी लिहीणे ही कौतुकास्पद बाब आहे. आज वुई हेट बायोलाॅजीकल वाॅर व मसनवाटा अशा दोन कादंबऱ्या प्रकाशीत करत आहोत. त्या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये पिढी बदलतानाचा प्रवास लिहीला आहे. अलीकडच्या लेखक व वाचकांची संख्या घटत असलेल्या स्थितीत देशमुख यांनी चोखाळलेली वेगळी वाट कौतुकास्पद आहे. नव्या लेखकांनी तयार व्हावे, नव्या वाटा धुंडाळाव्यात त्याशिवाय इतिहास कळणार नाही. अनेक पत्रकार त्यांच्या व्यवसायात आलेले अनुभव लिहीतीत. मात्र अभयने सामाजिक भान असलेले लिखाण केले. ते कौतुकास्पद आहे. चीनमधून आला हेही खर आहे. काळजी घेतली गेली नाही. हेही समजून घ्यायला हवे. जास्त फकटा बसला. तज्ञ सांगत होते तेही एकल नाही. तीन लाख लोक घरवापसी झाली. मात्र त्या लोकांनी ऐकल नाही. योग्य यंत्रणेने कोरोनाच्या दाहकतेची माहिती दिली नसल्याने मोठे नुकसान झाले. यापुढे आता काळजी घ्यावी लागेल.

संपादक राजेश सोळसकर म्हणाले, कोरोनाचा कालवधी सर्वांसाठी अवघड व कठीण कालवधी होता. या काळात आपण अनेक जवळची माणसे गमावली. ज्या स्वतःसह कुटूबांची जबाबदारी महत्वाची होती. त्या काळात जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्विकारलेल्या आमदार बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्याला सावरले. त्याचे नेतृत्व महत्वाचे ठरले. कोरोना काळात जबाबदारी लक्षात ठेवून त्यांनी काम केले. वास्तिवक तज्ञांनाही मान्य आहे, की कोरोना चीनने जाणीवपूर्वक पसरवला. महासत्ता होण्यासाठी चीन कोणत्याही थराला जावू शकतो. त्यासाठी त्यांनी अमेरिकेला लक्ष करत त्यांची अर्थव्यवस्था खिळखिळू करण्याचा डाव आखला होता. मात्र जगभरतत कोरोनाने फार बदल घडवले. कोरोनानंतर व पूर्व अशी जगात ओळख झाली. त्याची फार मोठी किंमत मोजावी लागली. अशा संनेदनशील विषयांना हात घातला तो कौतुकास्पद आहे. अभयकुमार देशमुख यांनी प्रास्ताविक केले. संतोष गिरी व सौ. विभुते यांनी सुत्रसंचलन केले.