वेध माझा ऑनलाइन - राज्यात मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांनी महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधानं केली आहेत. नुकतेच हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक होते असे विधान केले होते. यावरुन राज्यात वादंग निर्माण झाले होते. त्यांच्या या विधानावर भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी निषेध व्यक्त केला होता. याच दरम्यान आता छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीरही होते, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीरही होते. शिवाय त्या काळात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी अनेक मशिदी आणि मंदिरं बांधली. साताऱ्यातील शाही मशिदीची देखरेख आमच्या कुटुंबाकडून केली जाते, असंही उदयनराजे भोसले यांनी सांगितले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
उदयनराज म्हणाले,सर्व धर्म समभाव ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराज यांनी मांडली होती.त्यांनी कोणत्याही जाती-धर्मातील लोकांसोबत भेदभाव केला नाही. प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या सोयीने बोलत असतो. मात्र, शिवाजी महाराज अथवा संभाजी महाराजांनी कधीही कोणत्याही धर्माचा अनादर केला नाही.त्यांनी त्याकाळी मंदिर, मशिद बांधल्या. आजही साताऱ्यातील शाही मशिदीची देखरेख आमच्या कुटुंबाकडून केली जाते. त्यामुळे यावरुन कोणताही वाद घालू नये. कारण दोघेही स्वराज्यरक्षक होते आणि धर्मवीरही होते.
No comments:
Post a Comment