Friday, January 20, 2023

भर रस्त्यात तहसीलदारांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न ; कुठे घडली घटना ?

वेध माझा ऑनलाईन - बीड जिल्ह्यांतील केज च्या नायब तहसीलदार आशा वाघ यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सरकारी अधिकाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यामुळे केजमध्ये या प्रकरणाची चर्चा होत आहे. कौटुंबिक वादातून आशा वाघ यांच्यावर हल्ला झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही कौटुंबिक वादातून त्यांच्या भावानेच त्यांच्यावर हल्ला केला होता. 

केज तहसील कार्यालयातील, संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला झाल्याची थरारक घटना घडली आहे. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आशा वाघ यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या असून सध्या त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नायब तहसीलदार आशा वाघ आज दुपारी जेवण करून तहसील कार्यालयाकडे मोपेडवरून येत होत्या. त्याचवेळी एका चारचाकी वाहनाने त्यांचा रस्ता अडवला. त्यातून उतरलेल्या एका महिलेसह इतर 4 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी बॉटलमधील पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या आहेत. केज येथील सरकारी रुग्णालयात आशा वाघ यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस या घटनेचा तपास घेत आहेत. हल्लेखोर फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

शिवसेना कोणाची ? आजही उत्तर मिळाले नाही ; पडली ; उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत येत्या 23 जानेवारीला संपणार

वेध माझा ऑनलाईन - केंद्रीय निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीत शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंना मिळणार की शिंदेंना मिळणार? या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आज देखील मिळालं नाही शिवसेना आणि धनुष्यबाणावरील केंद्रीय निवडणूक आयोगात सुरु असलेली सुनावणी पुढे ढकलली आहे. निवडणूक आयोगात आज शिवसेना आणि धनुष्यबाण नेमका कुणाचा? याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. सोमवारी 23 जानेवारी रोजी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. लेखी उत्तरं मिळाल्यानंतर आयोग पुढील कार्यवाही करणार आहे.  

आज ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला तर शिंदे गटाच्या वतीनं महेश जेठमलानी, मनिंदर सिंह यांनी युक्तीवाद केला. जवळपास चार तास चाललेल्या या सुनावणीनंतरही  शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंना मिळणार की शिंदेंना मिळणार? महाराष्ट्राला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर आज देखील मिळालं नाही. आजच्या सुनावणीत ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक झाली. ठाकरे गटाचे देवदत्त कामत आणि शिंदे गटाचे महेश जेठमलानी यांच्यात शाब्दिक चकमक झाल्यानंतर आयोगाला मध्यस्थी करावी लागली.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरतं गोठवलं आणि ठाकरेंना मशाल तर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिलं. त्यानंतर धनुष्यबाण या शिवसेनेच्या मूळ चिन्हावर दोन्ही गटांनी दावा केला. त्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत येत्या 23 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे आजची सुनावणी दोन्ही गटांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी एक तास दहा मिनिटं युक्तिवाद केला. त्यांच्यानंतर ठाकरे गटाकडून देवदत्त कामत यांनी देखील युक्तिवाद केला. 

कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादातील महत्वाचे मुद्दे 
शिंदे गटाच्या याचिकेतील मुद्दे खोडण्याचा कपिल सिब्बल यांच्याकडून प्रयत्न, जर यांचं बंड झालं होतं तर एक महिना आयोगाकडे येण्यासाठी का लावला? 
राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्यासोबत आहे, शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीर 
ठाकरे गटाची कार्यकारिणी बरखास्त होऊ शकत नाही. ठाकरेंची कार्यकारिणी घटनेप्रमाणे आहे. 
राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ द्या किंवा निवडणूक घ्या
एकनाथ शिंदेंचं प्रतिज्ञापत्र तपासून पाहा. आम्हाला प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी द्या. दोन्ही ठिकाणी आमचं संख्याबळ जास्त, सभागृहांमध्येही आमचं स्थान आहे 
पक्षप्रमुख पदाला मुदतवाढ द्या, ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी, घटनेनुसार प्रतिनिधी सभा आमच्याकडे, शिंदे गटाकडे प्रतिनिधी सभा नाही, जी आहे ती घटनाबाह्य 
शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये कमतरता, 61 पैकी 28 जिल्हाप्रमुखांची प्रतिज्ञापत्र नाहीत
 लोकशाहीनुसार म्हणणं मांडायला हवं होतं, गुवाहाटीला का गेले? पक्षाच्या सभेला उपस्थिती न लावता ते गुवाहाटीला गेले, एकनाथ शिंदे आधी शिवसेनेत होते आणि ते कार्यरत होते.
राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटानं कोणती कागदपत्रं सादर केली आहेत का? शिंदे गट राजकीय पक्ष नाही. 
शिवसेनेच्या सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारच, ठाकरे गटच खरी शिवसेना; ठाकरे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त होऊ शकत नाही, शिवसेनेची घटना सिब्बल यांच्याकडून आयोगासमोर सादर 
हा वाद म्हणजे संसदीय पद्धतीची थट्टा

देवदत्त कामत यांनी केलेला युक्तिवाद
ठाकरे गटाचं काम आयोगाच्या घटनेनुसारच
शिंदे शिवसेनेत होते, मग शिवसेना बोगस असं कसं म्हणू शकतात...
शिवसेनेची घटना बोगस हा शिंदे गटाचा दावा कोणत्या आधारे?
शिंदे गटाची प्रतिनिधी सभाच झाली नाही
सादीक अली केस याठिकाणी लागू होऊ शकत नाही, राजकीय पक्ष म्हणून आमचं संख्याबळ लक्षात घ्या...
मुख्य नेतेपद पक्षाच्या घटनेतच नाही, त्यामुळं ते घटनाबाह्य

महेश जेठमलानी यांनी केलेला युक्तिवाद
उद्धव ठाकरेंनी मविआ कशी बनवली?
युतीचं आश्वासन देऊन मतं मिळवली अन् नंतर मतदारांना सोडून दिलं आमच्या संख्येबाबत कोणताही वाद नाही मुख्य नेतापद हे कायदेशीर आहे पक्षघटनेचं आम्ही पालन केलं आहे. 
शिंदेंच्या बंडानं शिवसेनेत फूटच

दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्रं आयोगासमोर सादर
शिवसेनेच्या ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत 160 राष्ट्रीय कार्यकारणी प्रतिनिधी, 2,82,975 संघटनात्मक प्रतिनिधी, 19,21,815 प्राथमिक सदस्य अशा एकूण 22 लाख 24 हजार 950 पक्षसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे सादर केली आहे. तर शिंदे गटाने 12 खासदार, 40 आमदार, 711 संघटनात्मक प्रतिनिधी, 2046 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी आणि 4,48,318 प्राथमिक सदस्य अशा 4,51,127 पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे आयोगाकडे सादर केली आहेत.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत थोडक्यात बचावले ; भर समुद्रात त्यांची स्पीड बोट पडली बंद...काय झाले पुढे?

वेध माझा ऑनलाईन - राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत रायगड जिल्ह्यातील मांडवा इथून मुंबईत गेट वे ऑफ इंडिया असा स्पीड बोटीने प्रवास करताना थोडक्यात बचावले. भर समुद्रात त्यांची बोट बंद पडली होती. स्पीड बोटीची सर्व यंत्रणा बंद पडल्यानंतर बोटीच्या कॅप्टनला रेस्क्यूसाठी SOS हा आपत्कालीन संदेशसुद्धा पाठवता येत नव्हता.
समुद्रात अचानक ओढवलेल्या या संकटात प्रसंगावधान राखत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या स्वीय सहायकाने दुसरी स्पीड बोट बोलवली. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे. 

भर समुद्रात अशा संकट प्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या स्विय सहाय्यकाने मोबाईलची रेंज कमी असतानाही तात्काळ प्रयत्नं करून दुसरी स्पीड बोट मागवली. दुसरी बोट काही वेळातच घटनास्थळी बचाव कार्यासाठी दाखल झाली. त्यामुळे भर समुद्रात भरकटत चालेल्या स्पीड बोटीला दूसऱ्या बोटीने भर समुद्रात बचाव कार्य करत उद्योग मंत्री उदय सामंत यांना सुखरूप परत आणले.राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत अलिबाग ते मुंबई असा प्रवास स्पीड बोटीने करत होते. समुद्रात प्रवासा दरम्यान यांच्या स्पीड बोटीचे इंजिन बंद पडले. समुद्रातील लाटांमुळे स्पीड बोट भरकटली होती. 

पक्षप्रमुख पद कायम राहण्यासाठी ठाकरेंची खेळी ; केल्या दोन मागण्या

वेध माझा ऑनलाईन - उद्धव ठाकरे यांचं शिवसेना पक्षप्रमुखपद कायम राहणार का गोठवलं जाणार? याबाबतची सुनावणी निवडणूक आयोगात सुरू आहे. 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे, त्यामुळे यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुखपद कायम राहण्यासाठी ठाकरे गटाने निवडणूक आयोगात युक्तीवाद केला. प्रतिनिधी सभा घ्यायला आणि नेता निवडीला परवानगी द्या, असे दोन अर्ज ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगात दाखल करण्यात आले आहेत.
उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा पक्षप्रमुख होण्यासाठी प्रतिनिधी सभा घ्यावी लागणार आहे. या प्रतिनिधी सभेमध्ये पुन्हा एकदा पक्षप्रमुखपदाची निवड करण्यात येईल. याच कारणामुळे ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी प्रतिनिधी सभा घ्यायला आणि नेता निवडीला परवानगी द्यायची मागणी केली आहे. ही मागणी मान्य होत नसेल तर प्रतिनिधी सभा घ्यायला आणि पक्षप्रमुखपदाला मुदतवाढ द्या, असंही कपिल सिब्बल निवडणूक आयोगात म्हणाले.
प्रतिनिधी सभेतल्या 271 जणांपैकी 170 जण आमच्यासोबत आहेत. पक्ष सोडून गेलेले प्रतिनिधी सभेचा भाग होऊ शकत नाही. प्रतिनिधी सभाच पक्ष चालवतो, पक्ष सोडून गेलेले प्रतिनिधी सभेचा भाग होऊ शकत नाही, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगात केला.
शिंदे गटाकडून देण्यात आलेली शपथपत्र खोटी, या सर्वांची ओळख परेड घ्या, अशी मागणीही कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाकडे केली. शिंदेना मुख्यनेतेपद कुणी दिलं? ही नियुक्ती होताना राष्ट्रीय कार्यकारिणी झाली का? राष्ट्रीय कार्यकारिणीसाठीची घटना कुठे? असे प्रश्न कपिल सिब्बल यांनी उपस्थित केले.

Thursday, January 19, 2023

पाणी मीटर रीडिंगची आकारणी गैरवाजवी ; ती त्वरित रद्द करा ; बाळासाहेबांची शिवसेना कराड शहर व कराड तालुका यांच्यावतीने कराड नगरपालिकेला निवेदन ;

वेध माझा ऑनलाईन - कराड नगरपरिषदेने चोवीस तास पाणी योजनेंतर्गत नागरिकांकडून दोन हजार पाचशे रुपयांचे शुल्क घेउन पाण्याची मीटर बसवली आहेत. मात्र चोवीस तास पाणी योजना अद्यापही चालू नाही, तरी ब-याच वर्षापासून सुरु असलेले दिवसातून दोन वेळा येत असलेले पाणी यावरही ( दर मंगळवारी व शनिवारी एक वेळ पाणी येत नाही). कराड
नगरपरिषदेने एप्रिल महिन्यापासून मीटरप्रमाणे पाणीपट्टी आकारली आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेली मीटर रीडिंगची आकारणी गैरवाजवी आहे. ती त्वरित रद्द करावी अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गट यांच्याकडून करण्यात आल्याचे कराड शहर अध्यक्ष राजेंद्र माने यांनी निवेदनाद्वारे कळवले आहे कॉन्ट्रॅक्टर व प्रशासनाच्या चुकीचे खापर कराड मधील नागरिकांवर फोडू नये. तसेच हा प्रकल्प अजून चालू नाही याला कोण जबाबदार? प्रकल्पाशी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला काळया यादीत टाका व कराडकरांना न्याय द्या...असे या निवेदनात म्हटले आहे

अभिनेत्री राखी सावंतला अटक; आपत्तीजनक व्हिडीओ शेअर केल्याचा राखीवर आरोप ; काय आहे बातमी...

वेध माझा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री-डान्सर राखी सावंतबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. राखी सावंतला पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त आहे. मुंबईतील अंबोली पोलिसांनी राखीला ताब्यात घेतलं आहे. एका महिलेचा आपत्तीजनक व्हिडीओ शेअर केल्याचा राखीवर आरोप आहे. काही वेळेत अभिनेत्रीला अंधेरी कोर्टात हजर केलं जाणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्राने राखी विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आता राखीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शर्लिन चोप्राने स्वतः आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
शर्लिन चोप्राने ट्विट करत अंबोली पोलिसांनी राखीला अटक केल्याचं सांगितलं आहे. सोबतच शर्लिन चोप्राने आपल्या एफआरआयबाबत अतिरिक्त माहितीसुद्धा नमूद केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, राखीने काही काळापूर्वी मॉडेलचा आपत्तीनजक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे. या आरोपांतर्गत राखीला अंबोली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Wednesday, January 18, 2023

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या मुलगा आणि सुनेवर 420 चा गुन्हा दाखल ; काय आहे प्रकरण?

वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक सद्धा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीच्या ताब्यात आहे. तर दुसरीकडे, त्यांचा मुलगा फराज मलिक याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.
नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याच्यावर दुसरी पत्नी हॅमलीनच्या व्हिसासाठी बनावट कागदपत्र दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी फरार आणि त्याची पत्नी हॅमलीन विरोधात सुद्धा पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. हॅमलीनही फ्रांसची नागरिक आहे. कलम 420, 465, 468, 471, 34 IPC नुसार गुन्हा दाखल केला आहे.

2 मार्च 2022 ते 23 जून 2022 दरम्यान कुर्ल्यामध्ये हे बनावट दस्तावज तयार केले आहे. त्यांच्यासह अन्य लोकांवरही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, फराजने जी कागदपत्र दिली होती, त्यामुळे मॅरेज सर्टिफिकेट बोगस असल्याचे समोर आले. Bmc चं विवाह नोंदणी प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड झालं आहे. एक वर्षांपूर्वीच कुर्ला पोलिसांना पडताळणीसाठी हे Visa डिपार्टमेंट कडून पाठवण्यात आलं होतं. मात्र तब्बल एक वर्षांपासून कुर्ला पोलिसांकडून फाईलवर कोणतीही कारवाई झाली नव्हती. अखेरीस आता गुन्हा दाखल केला आहे.