Friday, January 20, 2023

पक्षप्रमुख पद कायम राहण्यासाठी ठाकरेंची खेळी ; केल्या दोन मागण्या

वेध माझा ऑनलाईन - उद्धव ठाकरे यांचं शिवसेना पक्षप्रमुखपद कायम राहणार का गोठवलं जाणार? याबाबतची सुनावणी निवडणूक आयोगात सुरू आहे. 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे, त्यामुळे यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुखपद कायम राहण्यासाठी ठाकरे गटाने निवडणूक आयोगात युक्तीवाद केला. प्रतिनिधी सभा घ्यायला आणि नेता निवडीला परवानगी द्या, असे दोन अर्ज ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगात दाखल करण्यात आले आहेत.
उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा पक्षप्रमुख होण्यासाठी प्रतिनिधी सभा घ्यावी लागणार आहे. या प्रतिनिधी सभेमध्ये पुन्हा एकदा पक्षप्रमुखपदाची निवड करण्यात येईल. याच कारणामुळे ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी प्रतिनिधी सभा घ्यायला आणि नेता निवडीला परवानगी द्यायची मागणी केली आहे. ही मागणी मान्य होत नसेल तर प्रतिनिधी सभा घ्यायला आणि पक्षप्रमुखपदाला मुदतवाढ द्या, असंही कपिल सिब्बल निवडणूक आयोगात म्हणाले.
प्रतिनिधी सभेतल्या 271 जणांपैकी 170 जण आमच्यासोबत आहेत. पक्ष सोडून गेलेले प्रतिनिधी सभेचा भाग होऊ शकत नाही. प्रतिनिधी सभाच पक्ष चालवतो, पक्ष सोडून गेलेले प्रतिनिधी सभेचा भाग होऊ शकत नाही, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगात केला.
शिंदे गटाकडून देण्यात आलेली शपथपत्र खोटी, या सर्वांची ओळख परेड घ्या, अशी मागणीही कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाकडे केली. शिंदेना मुख्यनेतेपद कुणी दिलं? ही नियुक्ती होताना राष्ट्रीय कार्यकारिणी झाली का? राष्ट्रीय कार्यकारिणीसाठीची घटना कुठे? असे प्रश्न कपिल सिब्बल यांनी उपस्थित केले.

No comments:

Post a Comment