Thursday, March 2, 2023

शिवसेना नेते संजय राऊत उद्या नगरसेवक इंद्रजित गुजर यांच्या भेटीला कराडात ; शहराच्या राजकारणात खळबळ ; कराड पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे प्लॅनिंग शिजू लागले ?

वेध माझा ऑनलाईन - कराडचे अपक्ष नगरसेवक इंद्रजित गुजर यांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत उद्या कराडमध्ये येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे इंद्रजित गुजर यांची काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते विनायक राऊत यांनी देखील भेट घेतल्याची माहिती आहे या नव्याने घडणाऱ्या घडामोडीमुळे कराडच्या राजकारणात आता उद्धव ठाकरे गटाची एन्ट्री होणार आहे असेही संकेत यानिमित्ताने मिळत आहेत

कराड शहराचे राजकारण आता नव्याने ढवळून निघत असल्याचे सध्या चित्र निर्माण झाले आहे काही दिवसांपूर्वी कराडच्या यशवंत विकास आघाडीने मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केल्याने येथील राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या होत्या त्यानंतर खडबडून जागे झालेल्या काँग्रेसने  काही दिवसातच काँग्रेस नेते नाना पटोले यांचा कार्यक्रम लगेचच कोलेजवर अरेंज केला होता राष्ट्रवादीचा मेळावा देखील शहराच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचदरम्यान झाला होता  काँग्रेस- राष्ट्रवादी चे एकत्रित मनोमिलन होण्याबाबतच्या चर्चा त्यानंतर कानावर यवू लागल्या होत्या त्यानंतर भाजप- शिंदे गट एकत्रित येऊन दोन्ही काँग्रेसशी शहराच्या निवडणुकीत दोन हात करतील अशी शक्यता बोलून दाखवली जात होती मात्र महाआघाडी म्हणून लढण्यासाठी कराडात  शिवसेना म्हणावी अशी तुलनेत स्ट्रॉंग नाहीये दरम्यान त्याचवेळी अचानकपणे अपक्ष नगरसेवक इंद्रजित गुजर व त्यांचे शहरातील अनेक आजी-माजी काही सहकारी यांची शिवसेना नेते विनायक राऊत यांच्याशी त्याचकाळात भेट झाल्याची बातमी अचानक धडकली मग मात्र कराडात काहीतरी वेगळं घडतय अशा अटकळी कराडच्या राजकारणात व्यक्त होऊ लागल्या उद्या शुक्रवारी शिवसेना नेते संजय राऊत इंद्रजित गुजर याना भेटण्यासाठी अचानक कराडात येत असल्याची बातमी असल्याने त्यातून भविष्यात शहरात महाआघाडी होण्याबाबतचे परफेक्ट प्लॅनिंग तर शिजत नाही ना ? अशा चर्चा आता सुरू आहेत 

दरम्यान राज्यातील परिस्थिती पाहिली तर ग्रामपंचायत निवडणूका असो, पदविधरच्या असो... किंवा नुकत्याच झालेल्या पुण्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुका असोत...महाविकास आघाडीने पुन्हा कम-बॅक केल्याचे पहायला मिळत आहे लोक भाजप विरोधात मतदान करत असल्याचा आत्मविश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांना आता आलेला दिसतोय त्याचाच धागा पकडून कराडमध्येही महाआघाडीचा यशस्वी प्रयोग करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाची एन्ट्री कराडमध्ये होणार अशी माहिती मिळत आहे शिवसेना म्हणून पारंपरिक काही मते शहरात नक्कीच आहेत त्यातच आता नव्याने शहरातील काही आजी माजी नगरसेवक इंद्रजित गुजर यांच्या कॅप्टनशिप खाली शिवसेनेत प्रवेशकर्ते झाल्यास स्ट्रॉंग महाविकास आघाडीचे चित्र शहराच्या राजकारणात दिसेल अशी विश्लेषकाना खात्री वाटतेय आणि याचीच नांदी संजय राऊत यांच्या अचानक जाहीर झालेल्या कराड दौऱ्यातील इंद्रजित गुजर यांच्या भेटीने होईल का? हेच आता पहायचे आहे

Wednesday, March 1, 2023

कसब्यात मनसे, शिंदे गट आणि सर्व मंत्र्यांचा झाला पराभव ; भाजपला धूळ चारत धंगेकर विजयी ;

वेध माझा ऑनलाइन - पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर लागला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहे. रवींद्र धंगेकर यांचा पराभव करण्यासाठी भाजपने मनसे, शिंदे गट आणि सर्वच मंत्र्यांना मैदानात उतरवले होते. पण, पुणेकरांनी धंगेकरांना साथ दिली.

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरूवात झाली. पोस्टल मतदानामध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली.  धंगेकर यांनी आता 11 हजार 40 मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.  विशेष म्हणजे, भाजपने कसबा पोटनिवडणुकीमध्ये सर्व ताकदपणाला लावली होती. मनसे, शिवसेना शिंदे गटाने सुद्धा भाजपला पाठिंबा दिला होता. पण, पुणेकरांनी भाजपला धक्का देत रवींद्र धंगेकर यांना निवडून दिलं आहे. रवींद्र धंगेकर यांच्या विजयाची चाहूल लागताच काँग्रेसच्या समर्थकांनी जोरदार जल्लोषाला सुरुवात केली आहे.
पुण्यात कसबाची पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. भाजपने टिळक वाड्याला नाकारून नवीन उमेदवार मैदानात उतरवला. त्यामुळे सुरवातीपासून भाजपमध्ये नाराजीचे सूर उमटले होते. अखेर ही नाराजी भाजपला महागात पडली आहे. एवढंच नाहीतर गिरीश बापट यांनीही नाराजी दर्शवत प्रचारापासून दूर राहिले होते. भाजपमधील अंतर्गत नाराजी अखेरीस भाजपच्या पथ्यावर पडली आहे. रवींद्र धंगेकर यांनी तब्बल 11 हजार 40 मतांनी विजय मिळवला आहे. धंगेकर यांच्या बाजूने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जोरदार प्रचार केला होता. आदित्य ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांनीही प्रचार केला होता. महाविकास आघाडीने एकीचे बळ दाखवून पूर्ण ताकदीने प्रचार केला. अखेरीस महाविकास आघाडीची मेहनत कामी आली आहे.

मनसेचा भाजपला पाठिंबा वाया
मनसेनं या निवडणुकीमध्ये उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतला होता. ज्या ठिकाणी एखाद्या आमदाराचं निधन होतं, अशा ठिकाणी उमेदवार देणार नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. एवढंच नाहीतर अंधेरी पोटनिवडणुकीप्रमाणे कसबा निवडणुकीसाठी बिनविरोध निवडणूक करण्यासाठी पत्र सुद्धा लिहिले होते. पण, महाविकास आघाडीने उमेदवार उतरवल्यानंतर मनसेनं भाजपला पाठिंबा जाहीर केला. पुण्यात मनसेची ताकद तशी चांगलीच होती. पण, राज ठाकरेंच्या बदलत्या निर्णयाचा मनसेला फटका बसला. मनसेचे सैनिक सुद्धा भाजपच्या मदतीला धावून आले होते पण त्यांची मेहनत वाया गेली आहे.

आता कृष्णा हॉस्पिटल समोरील उड्डाणपूल पाडणार...त्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत पुन्हा झाले बदल..

वेध माझा ऑनलाईन -  सहापदरीकरणांतर्गत कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू असताना आता मलकापूर येथील कृष्णा हॉस्पिटल समोरील उड्डाणपूल पाडण्याचे नियोजन करण्यात आले असून दोन दिवसात हा पूल पाडण्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर मलकापूर येथील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

ढेबेवाडी फाट्याच्या उत्तरेस असणारा व मलकापूर फाटा येथील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. कराड येथील पुलाच्या कामानिमित्त पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी म्हणून वाहतुकीत बदल केले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत...

साताराकडे जाणारी जड वाहतूक भादी हार्डवेअर समोरील यू टर्न ऐवजी कोल्हापूर नाकामार्गे ढेबेवाडी फाटा येथे यू-टर्न घेवून कोल्हापूर नाका मार्गे वारुंजी फाटयावरील ओव्हरब्रीजवरुन सातारा बाजुकडे जातील. हायवेवरील कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक अक्षता मंगल कार्यालय येथून सेवारस्त्यावर येवून गंधर्व हॉटेलपर्यंत सेवारस्त्याने जावून पुन्हा हायवेला मिळतील. कोल्हापूर ते साताराकडे जाणारी वाहने कोयना औद्योगिक वसाहत, मलकापूर येथे सेवारस्त्यावर येऊन सरळ सेवारस्त्याने जावून पंकज हॉटेलच्या पश्चिम बाजूस हायवेला मिळतील व तेथून कोयना नदीवरील पुलावरुन सातारा कडे जातील. यापूर्वी 2 फेब्रुवारी 2023 रोजी पोलिस अधीक्षक कार्यालय यांनी दिलेला मुद्दा क्रमांक 03 मधील ( ब ) मधील भादी हार्डवेअर समोरील यू टर्न रद्द करण्यात येत आहे. ढेबेवाडी फाट्याचे उत्तरेस असलेला व मलकापूर फाटा येथील असलेला भुयारी मार्ग बंद करण्यात येईल. यापुर्वीचे अधिसुचनेप्रमाणे वारुंजी फाटा ते गंधर्व हॉटेल व कोयना औद्योगिक वसाहत ते वारुंजी फाटा पर्यंत एकेरी वाहतूक राहील व सदर रस्त्यावर कोणत्याही ठिकाणी वाहने पार्क करता येणार नाहीत. ढेबेवाडी फाटा व कृष्णा हॉस्पिटलच्या समोरील उड्डाण पुलाखालचा मार्ग खुला राहील. वाहतूक मार्गातील बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घेवून पोलिस दलास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ ; मार्च महिन्यातील पहिल्याच दिवशी खिशाला कात्री लावणारी बातमी ;

वेध माझा ऑनलाईन - सर्वासामन्या लोकांच्या खिशाला झळ बसणारी बातमी आहे. या बातमीनंतर गृहिणींचं बजेट चांगलंच कोलमडणार आहे. दर महिन्याच्या 1 तारखेला LPG चे दर जाहीर होत असतात. मार्च महिन्यातील पहिल्याच दिवशी खिशाला कात्री लावणारी बातमी आहे. महागाईनं सर्वसामान्य लोकांना आणि गृहिणींना मोठा झटका दिला आहे.

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता मुंबईत सिलेंडरचे दर 1,102 रुपये 50 पैसे आणि नागपूरला 1,154 रुपये 50 पैसे झाले आहेत. होळीपूर्वी महागाईचे चटके सामान्य माणसाला बसणार आहेत.

याशिवाय 19 किलो व्यावसायिक सिलेंडरचे दर ३५०.५० रुपयांनी वाढले आहेत. नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेलमधील जेवणाचे दरही वाढण्याची शक्यता आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची चिन्हे आहेत.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार 14.2 किलोचा एलपीजी सिलिंडर दिल्लीत 1103 रुपयांना मिळणार आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर 350 रुपयांनी वाढ झाली आहे. आता दिल्लीत आजपासून 19.2 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी 2119.5 रुपये मोजावे लागणार आहेत.

संजय राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल! ; विधानसभा अध्यक्षांकडून विशेषाधिकार समितीवर 15 सदस्यांची नेमणूक

वेध माझा ऑनलाईन - खासदार संजय राऊत हे पुन्हा अडचणीत आले आहेत. विधिमंडळाचा उल्लेख संजय राऊत यांनी चोर मंडळ असा केला. याचे पडसाद विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले. सत्ताधारी भाजप आणि शिवेसनेच्या आमदारांनी दोन्ही सभागृहांमध्ये आणि सभागृहाबाहेरही गोंधळ घातला. तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनीही संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध केला, तसंच संजय राऊतांविरोधात हक्कभंग आणण्याची मागणीही भाजप-शिवसेना आमदारांनी केली.
हक्कभंग प्रस्ताव दाखल केल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी विशेषाधिकार समितीवर 15 सदस्यांची नेमणूक केली आहे. भाजप आमदार राहुल कुल हे या समितीचे प्रमुख आहेत. भाजप-शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांचाही या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

विशेषाधिकार समितीतील सदस्य
राहुल कुल, अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, नितेश राणे, अभिमन्यू पवार, संजय शिरसाठ, सदा सरवणकर, दिलीप मोहिते पाटील, माणिकराव कोकाटे, सुनिल भुसारा, नितीन राऊत, सुनिल केदार, विनय कोरे, आशिष जयस्वाल

राऊतांची सारवासारव
सर्वपक्षीय नेत्यांनी समाचार घेतल्यानंतर संजय राऊतांची भाषा नरमली आहे. संसद आणि विधिमंडळाचा नेहमीच आदर केल्याची सारवासारव संजय राऊतांनी केली. कोल्हापूरमध्ये विरोधकांचा समाचार घेताना संजय राऊतांची जीभ घसरली. आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही, कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ही पदं आम्हाला दिली आहेत, याची आठवण करून देताना त्यांनी विधीमंडळाचा अवमान केला.

बारावीचा निकाल लांबणीवर पडणार ; शिक्षकांचा बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार ; मोठी बातमी...

वेध माझा ऑनलाईन - महाराष्ट्र स्टेट बोर्डाची परीक्षा सध्या सुरू आहे. यातच राज्यातील काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संपावर गेले आहेत. मात्र त्यात आता दुष्काळात तेराव महिना म्हणून शिक्षकांनी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

2005 पूर्वी व 2005 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी,आश्वासित प्रगती योजना लागू करावी शिक्षकांची रिक्त असलेले पदे भरण्यात यावी इत्यादी मागण्यासाठी शिक्षकांनी आंदोलन सुरू केलं आहे. याच मागण्या जाऊनही पूर्ण करण्यात आलेल्या नसल्यामुळे शिक्षकांनी उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.

परीक्षेच्या आधीपासूनच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. मात्र यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. म्हणूनच शिक्षकांनी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीचं काम बंद केलं आहे आणि यावर बहिष्कार टाकला आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर सुद्धा होऊ शकतो आज शिक्षकांच्या वतीने अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शने व आंदोलन करून शासन विरोधात घोषणाबाजी केली आहे.
या आधी इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये प्रश्नाऐवजी चाक उत्तर छापून आल्याचा प्रकार घडला आहे. तर हिंदीच्या पेपरमध्येही चूक झाल्याचा प्रकार आढळून आला आहे. यंदाच्या बोर्डाच्या परीक्षेत बोर्डाकडून होणाऱ्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना करावा लागतो आहे. तसंच फ्री मार्क्स मिळत असले तरी विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो आहे.

टेम्पो चालकाचा मुलगा mpsc परीक्षेत राज्यात पहिला ;

वेध माझा ऑनलाईन -  नुकताच MPSC राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये सांगलीच्या प्रमोद चौगुले या तरुणाने सलग दुसऱ्यांदा पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे भारत पेट्रोलियममधील नोकरी सोडून त्यांनी स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेतला होता. आपला निर्णय योग्य ठरवत प्रमोद यांनी मिळवलेल्या यशामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

प्रमोद यांचं मुळ गाव मिरज तालुक्यातील सोनी हे आहे. वडील बाळासाहेब चौगुले हे टेम्पो चालक आहेत. तर आई शिवणकाम करून संसाराचा गाढा चालवत होत्या. घरची परिस्थिती बेताची असताना त्यांनी दोन्ही मुलांना शिक्षण दिलं. प्रमोदचं प्राथमिक शिक्षण सोनी गावातच झालं. तर पुढील शिक्षण नवोदय विद्यालयात झालं. त्यानंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली.

... आणि यश मिळालं
इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर प्रमोद यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. भारत कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी पत्करली. नोकरी करत असतानाच UPSC आणि MPSC परीक्षा देण्याची त्यांची इच्छा झाली. त्यासाठी त्यांनी रिस्क घेत 2015 मध्ये भारत कॉर्पोरेशनमधील नोकरी सोडली. UPSC परीक्षेचा अभ्यास सुरू केला. मात्र, लवकर यश मिळालं नाही. तरीही अपयशाने खचून न जाता त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर राज्यसेवा परीक्षा 2020 मध्ये त्यांना घवघवीत यश मिळालं.
राज्यसेवा परीक्षा 2020 चा गेल्यावर्षी निकाल लागला. त्यामध्ये प्रमोद यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवला. यामध्ये उद्योग उपसंचालक म्हणून त्यांची निवड झाली. परंतु, त्यांच्या आवडीची पोलीस अधीक्षक ही पोस्ट तेव्हा नव्हती. त्यामुळे त्यांनी पुन्हा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांनी लक्षणीय मिळवत सलग दुसऱ्यांदा राज्यात पहिला येण्याचा पराक्रम केला आहे.

स्पर्धा परीक्षा करत असतानाही प्रमोद यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. नोकरी सोडून अभ्यास करूनही यश मिळत नव्हतं. तर सांगलीमध्ये आलेल्या पुरात प्रमोद यांचं संपूर्ण घर वाहून गेलं होतं. तसंच कोरोनाकाळात त्यांच्या कुटुंबाला कोरोनानं गाठलं होतं. मात्र, या संकटातही प्रमोद यांनी ध्येयाचा पाठलाग सोडला नाही. त्यामुळे कठीण परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी MPSC परीक्षेत बाजी मारली. त्यांचं हे यश राज्यातील आणि देशातील अनेक तरुण तरुणींसाठी प्रेरणादायी ठरणारं आहे.