Wednesday, March 1, 2023

कसब्यात मनसे, शिंदे गट आणि सर्व मंत्र्यांचा झाला पराभव ; भाजपला धूळ चारत धंगेकर विजयी ;

वेध माझा ऑनलाइन - पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर लागला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहे. रवींद्र धंगेकर यांचा पराभव करण्यासाठी भाजपने मनसे, शिंदे गट आणि सर्वच मंत्र्यांना मैदानात उतरवले होते. पण, पुणेकरांनी धंगेकरांना साथ दिली.

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरूवात झाली. पोस्टल मतदानामध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली.  धंगेकर यांनी आता 11 हजार 40 मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.  विशेष म्हणजे, भाजपने कसबा पोटनिवडणुकीमध्ये सर्व ताकदपणाला लावली होती. मनसे, शिवसेना शिंदे गटाने सुद्धा भाजपला पाठिंबा दिला होता. पण, पुणेकरांनी भाजपला धक्का देत रवींद्र धंगेकर यांना निवडून दिलं आहे. रवींद्र धंगेकर यांच्या विजयाची चाहूल लागताच काँग्रेसच्या समर्थकांनी जोरदार जल्लोषाला सुरुवात केली आहे.
पुण्यात कसबाची पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. भाजपने टिळक वाड्याला नाकारून नवीन उमेदवार मैदानात उतरवला. त्यामुळे सुरवातीपासून भाजपमध्ये नाराजीचे सूर उमटले होते. अखेर ही नाराजी भाजपला महागात पडली आहे. एवढंच नाहीतर गिरीश बापट यांनीही नाराजी दर्शवत प्रचारापासून दूर राहिले होते. भाजपमधील अंतर्गत नाराजी अखेरीस भाजपच्या पथ्यावर पडली आहे. रवींद्र धंगेकर यांनी तब्बल 11 हजार 40 मतांनी विजय मिळवला आहे. धंगेकर यांच्या बाजूने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जोरदार प्रचार केला होता. आदित्य ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांनीही प्रचार केला होता. महाविकास आघाडीने एकीचे बळ दाखवून पूर्ण ताकदीने प्रचार केला. अखेरीस महाविकास आघाडीची मेहनत कामी आली आहे.

मनसेचा भाजपला पाठिंबा वाया
मनसेनं या निवडणुकीमध्ये उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतला होता. ज्या ठिकाणी एखाद्या आमदाराचं निधन होतं, अशा ठिकाणी उमेदवार देणार नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. एवढंच नाहीतर अंधेरी पोटनिवडणुकीप्रमाणे कसबा निवडणुकीसाठी बिनविरोध निवडणूक करण्यासाठी पत्र सुद्धा लिहिले होते. पण, महाविकास आघाडीने उमेदवार उतरवल्यानंतर मनसेनं भाजपला पाठिंबा जाहीर केला. पुण्यात मनसेची ताकद तशी चांगलीच होती. पण, राज ठाकरेंच्या बदलत्या निर्णयाचा मनसेला फटका बसला. मनसेचे सैनिक सुद्धा भाजपच्या मदतीला धावून आले होते पण त्यांची मेहनत वाया गेली आहे.

No comments:

Post a Comment