Wednesday, March 22, 2023

खाजगी ट्रॅव्हल्सकडूनही महिलांना ५० टक्के सूट ; गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर अमलबजावणी सुरू ;

वेध माझा ऑनलाईन ; राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या बसमध्ये महिला प्रवाशांना ५० टक्के सूट देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर याची अंमलबजावणीसुद्धा केली जात आहे. दरम्यान, खाजगी ट्रॅव्हल्सकडूनही बसमध्ये महिलांना ५० टक्के सूट देण्याची घोषणा चंद्रपूरमध्ये कऱण्यात आलीय. चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनने ही घोषणा केली. संघटनेची काल बैठक झाल्यानतंर हा निर्णय घेतला गेला. याची अंमलबजावणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झालीय.


राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करताना उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा जाहीर केल्या. यामध्ये एसटी प्रवासात महिलांना प्रवास तिकिट दरात ५० टक्के सवलत देणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आता चंद्रपूर गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनने महिला प्रवाशांना खाजगी बसमध्ये ५० टक्के सूट देण्याचं जाहीर केलंय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. खाजगी बसमधूनही प्रवास करताना सूट मिळणार असल्याने महिलांनी याबाबत आनंद व्यक्त केलाय. 

राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचं खाजगी ट्रॅव्हल्स मालकांकडून स्वागत करण्यात आलं आहे. तसंच खाजगी ट्रॅव्हल्सनेसुद्धा मोठ्या प्रमाणावर महिला प्रवास करतात. या महिलांच्या सन्मानासाठी आम्ही तिकिटात ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला असल्याचं असोसिएशनचे अध्यक्ष चंदन पाल यांनी सांगितलं.राज्य सरकारनंतर खाजगी ट्रॅव्हल्सकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असं महिला प्रवाशांनी म्हटलंय. या निर्णयामुळे महागाईचा भारही कमी होईल अशा शब्दात महिला प्रवाशांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

राज ठाकरे मुखमंमंत्री होऊ शकतात ; संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य ;

वेध माझा ऑनलाईन - आज मनसेचा पाडवा मेळावा होणार आहे. शिवाजी पार्कवर होणाऱ्या या मेळाव्यासाठी मनसैनिकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र मेळाव्यापूर्वी शिवाजी पार्क परिसरात आणि शिवसेना भवनासमोर मनसेकडून लावण्यात आलेले पोस्टर सर्वाचं लक्ष वेधून घेत आहेत. या पोस्टरवर जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टरवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी शिवसेना भवनासमोर लावलेल्या त्या पोस्टरवर प्रतिक्रिया दिली आहे. देशात लोकशाही आहे. कोणी ही मुख्यमंत्री होऊ शकतो. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. त्यांच्याकडे बहुमत असेल तर होऊ शकतात. बहुमत हे चंचल असतं. आज आमच्याकडे असेल उद्या दुसऱ्या कोणाकडे असेल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना राऊत यांनी केंद्र सरकारला देखील जोरदार टोला लगावला आहे.  महाराष्ट्राची गुढी म्हणून शिवसेनेचा उल्लेख कोला जातो.  त्या गुढीवर केंद्र सरकारने मोगलाईन पद्धतीनं आक्रमक केले आहे. त्यामुळे राज्यातील जनता दुःखी आहे. पण जनतेचा संकल्प आहे, नव्या वर्षात ही गुढी घराघरात उभारल्या शिवाय राहणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Tuesday, March 21, 2023

सोलापुरात शालेय पोषण आहाराच्या तांदळामध्ये आढळला चक्क प्लास्टिकचा तांदूळ ; शाळकरी मुलांचे आरोग्य धोक्यात ; सोलापूरमध्ये खळबळ ;

वेध माझा ऑनलाईन - आपण बाजारातून किंवा रेशन कार्डद्वारे आणलेल्या धान्यामध्ये खडे किंवा कचऱ्याची भेसळ पाहतो. धान्य शेतातून येत असल्याचं आपण गृहित धरुन सर्व धान्य साफ करतो. मात्र, तांदळात प्लास्टिकची भेसळ होत आहे असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही ना? पण असा प्रकार प्रत्यक्षात सोलापुरात घडला आहे. सोलापुरात शालेय पोषण आहाराच्या तांदळामध्ये चक्क प्लास्टिकचा तांदूळ आढळला आहे. या भेसळयुक्त तांदळामुळे शाळकरी मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याप्रकरणी शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

काय आहे प्रकरण?
सांगोला तालुक्यातील घेरडीच्या सरपंच सुरेखा पुकळे यांनी पुराव्यासह भेसळयुक्त तांदळाचा प्रकार उघडकीस आणला आहे. विशेष म्हणजे शालेय पोषण आहारासह रेशनच्या दुकानांमध्ये देखील प्लास्टिकचा तांदूळ भेसळयुक्त असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. प्लास्टिकच्या तांदळाच्या मुद्द्यावरुन सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे सुद्धा आक्रमक झाले आहेत.
आमदार शहाजी बापू पाटील यांनी भेसळयुक्त प्लास्टिकच्या तांदळाबाबत तहसीलदारांना चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. पण सोलापूर जिल्ह्यात प्लास्टिकच्या तांदळाचा प्रकार उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अन्न व भेसळ विभागासह जिल्हा प्रशासनाकडून भेसळयुक्त तांदळाबाबत ठोस निर्णय होण्याची गरज असल्याचं मत सर्वसामान्यांकडून व्यक्त केलं जात आहे.

सरपंचांनी नेमका आरोप काय केला?
“रेशनमधला तांदूळ जेव्हा बघितला तेव्हा माझ्या लक्षात आलं की, तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकची भेसळ केलेली आहे. त्यामुळे मी गावातील दोन-तीन शाळांतील तांदूळ तपासला. त्यावेळीदेखील मला तांदूळमध्ये प्लास्टिकची भेसळ केल्याचं आढळून आलं. आपण म्हणतो की, प्लास्टिकचा वापर बंद केला पाहिजे. कारण प्लास्टिक हानिकारक आहे. प्लास्टिक कुजायला हजारो वर्ष लागतात. तेच प्लास्टिक आपल्या सरकारचा पुरवठा विभाग तांदळात मिक्स करतं”, असा आरोप सरपंच सुरेखा पुकळे यांनी केला आहे

उद्धव ठाकरेंनंतर निवडणूक आयोगाचा पवारांना धक्का, राष्ट्रवादीच्या घड्याळाबाबत मोठा निर्णय!

वेध माझा ऑनलाईन -उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह काढून घेतल्यानंतर आता निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत आहे.

शरद पवारांच्या हातातून घड्याळ जाणार?
 उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह काढून घेतल्यानंतर आता निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत आहे. निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाची समीक्षा करणार आहे, यासाठी निवडणूक आयोगाने पक्षाच्या प्रतिनिधीला आज निवडणूक आयोगाच्या कार्यालयात बोलावलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आता राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाखाली राहू शकत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

एखादा राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा त्याला लोकसभा निवडणुकीवेळी चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये 6 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळतात. याशिवाय पक्षाला लोकसभेच्या एकूण जागांच्या 2 टक्के म्हणजेच तीन राज्यांमधून 11 जागा जिंकाव्या लागतात.आता राष्ट्रवादी बाबत काय निर्णय होतो ते पहावे लागणार आहे
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यामुळे राजकीय पक्षांना अनेक फायदे मिळतात. सर्व राज्यांमध्ये त्यांना एकाच चिन्हावर निवडणूक लढण्यात येते. तसंच दिल्लीमध्ये राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयाला जागा दिली जाते. निवडणुकीच्या वेळी सरकारी प्रक्षेपणांमध्ये वेळही दिला जातो.

निवडणूक आयोगाची नोटीस
2019 सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीप्रमाणेच सीपीआय आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचं राष्ट्रीय पक्ष म्हणून अस्तित्व समिक्षेखाली आलं होतं. पण राज्यांमधल्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे निवडणूक आयोगाने याबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता.
1968 सालच्या सिम्बॉल ऑर्डरनुसार एखाद्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता गेली तर त्याला देशभरातल्या राज्यांमध्ये एकाच चिन्हावर निवडणूक लढता येत नाही. राष्ट्रवादीच्या प्रतिनिधीने केलेल्या अपीलवर निवडणूक आयोगाचं समाधान झालं नाही, तर राष्ट्रवादीला इतर राज्यांमध्ये पुढच्या निवडणुका घड्याळ या चिन्हावर लढता येणार नाहीत. पण राष्ट्रवादीला महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढता येईल.





आता... प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविणे व विक्री करण्यावर प्रतिबंध ; आदेशाचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई ;

वेध माझा ऑनलाईन - दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रशासनाकडूनही आवाहन केले जाते. परंतु काही मूर्तिकार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करतात मात्र आता अशा मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या मूर्ती बनविणे व विक्री करण्यावर प्रतिबंध घातला असून आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्व जिल्हाधिकारी व नगरपालिका/नगरपंचायत यांना पत्रान्वये पीओपी च्या मूर्ती बनविणे व विक्री करणेस प्रतिबंध करणेबाबत कळविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशान्वये पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या मूर्ती बनविणे व विक्री करणेस प्रतिबंध करण्यात आलेले आहे.

यापूर्वी सातारा जिल्हयात पीओपीच्या मूर्ती वितरण तसेच विक्री करणेस मुभा देण्यात आलेली होती. परंतु दि. 01/09/2022 पासून सातारा जिल्हयामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस च्या सर्व प्रकारच्या मूर्ती बनविणे, आयात करणे, वितरण करणे, खरेदी व विक्री करणेस प्रतिबंध केलेला आहे. तसेच सदर आदेशान्वये प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्ती बनविणे व विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याने मुख्याधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांना आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत आदेश देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी म्हंटले आहे

कराडच्या वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाची स्थापना ; मराठी माध्यमाच्या १९९६-९७ च्या बॅचचा पुढाकार ः शिवाजी शिक्षण संस्थेकडून सर्वतोपरी सहकार्याचे जंयत पाटील यांचे आश्वासन ;

वेध माझा ऑनलाईन - वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या १९९६-९७ च्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी २५ वर्षानी घेतलेल्या गेट टुगदेरच्या कार्यक्रमात कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्याची घोषणा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जंयत पाटील यांनी नुकतीच केली. 

वेणूताई चव्हाण महाविद्यालय व माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून तब्बल २५ वर्षांनी गेट टुगेदरचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. माजी प्राचार्या प. ता. थोरात, माजी प्रचार्य बी. ए. कालेकर, विद्यमान प्राचार्य एल. बी. जाधव, प्रा. सुनील फलटणकर, प्रा. व्ही. व्ही जगदाळे, प्रा. बी. जाधव, प्रा. घोरपडे, प्रा. सौ. नागरे-पाटील, जिवाजी कांबळे, तानाजी काटकर आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थीत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात अनेकविध कार्यक्रमांचे आय़ोजन करण्यात आले होते. मृत झालेल्यांना श्रध्दांजली, गुरूजनांचा सत्कार ते फनी गेम्सही यावेळी आयोजीत करण्यात आल्या होत्या.

श्री. पाटील म्हणाले, तब्बल २५ वर्षानंतर एकत्रीत आलेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह फारच चांगला आहे. त्यांनी पुढाकार घेवून घेतलेल्या या अनोख्या कार्यक्रमामुळे नवी प्रेरणा मिळाली आहे. शक्यतो गेट टुगेदर बाहेर होते. मात्र आपण खास महाविद्यालयात आयोजीत केलेल्या कार्यक्रमामुळे कॉलेजचाही सन्मान झाला आहे. मराठी माध्यमाच्या बॅचच्या निमित्ताने कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघाची स्थापना केली जाणार आहे. त्यासाठी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, संस्था हवी ती मदत करण्यास तयार आहे. यावेळी प्रचार्य थोरात, प्राचार्य कालेकर, प्राचार्य जाधव, प्रा. फलटणकर, इंद्रजीत पाटील, सौ. दीपाली देवकर यांची मनोगते झाली. यावेळी दिवसभर फनी गेम्स झाल्या, त्यासोबत मीमीक्रीचाही कार्यक्रम पार पडला. अबुबकर सुरात यांनी सुत्रसंचालन केले. फारूक शेख यांच्या गाण्यांचा कार्यक्रमही यावेळी सादर झाला. श्री. भोईटे यांनी मीमीक्री सादर केली. महेश कुंभार यांनी आभार मानले. अवधूत कलबुर्गी यांनी प्रास्ताविक केले.श्याम पेटकर व मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले

अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. 
तब्बल २५ वर्षांनी एकत्रीत आलेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या आठवणी सांगितल्या, अनेकांनी केलेल्या स्ट्रगलचे वर्णन करताना उपस्थित मित्रांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. प्रत्येकवर्षी असाच कार्यक्रम घेवून हा संघच कॉलेजचा माजी विद्यार्थी संघ म्हणून रजीस्ट्रेशन करण्याची जबाबदारी यावेळी अवधूत कलबुर्गी यांच्याकडे देण्यावर एकमत झाले. त्याला महाविद्यालयानेही सहमती दिली. 


नितीन गडकरीना पुन्हा जीवे मारण्याची धमकी ; फोनवरून मागितली 10 कोटींची खंडणी ; धमकीच्या फोनमुळे खळबळ ;

वेध माझा ऑनलाइन- भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नितीन गडकरी यांच्या कार्यालयात जयेश पुजारी या गुंडाच्या नावाने हा धमकीचा फोन आला असून 10 कोटींची खंडणी मागितली आहे. या धमकीच्या फोनमुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात पुन्हा एकदा धमकीचा फोन आला. दोन वेळा हा फोन करण्यात आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने जयेश पुजारीच्या नावाने फोन केला होता. फोनवर या व्यक्तीने 10 कोटींची खंडणी मागितली. एकापाठोपाठ दुसऱ्यांदा फोन आल्यामुळे नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली याआधी देखील गडकरींच्या कार्यालयात धमकीचे फोन आले होते. जयेश पुजारी या नावानेच हे फोन आले होते. या प्रकरणी पोलिसांनी बंगळुरला जाऊन चौकशी केली होती. पण त्याने हे फोन कॉल केले नाही अशीच माहिती दिली होती. आता या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी गडकरींच्या कार्यालयात चौकशी करत आहेत.