Tuesday, August 5, 2025

प्रा.हर्षद लोखंडे यांना पी.एच.डी.पदवी प्रदान ; हर्षद लोखंडे हे दैनिक कर्मयोगी च्या संपादिका सौ मंगलताई लोखंडे यांचे चिरंजीव होत.

वेध माझा ऑनलाइन ।
एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, पुणे येथील संगणक अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. डॉ. हर्षद नंदकुमार लोखंडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून "Electronics and Telecommunication Engineering" या शाखेत पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
"Object Identification and Tracking for Surveillance Applications" या विषयावर त्यांनी आपले संशोधन प्रबंध सादर केला होता. हे संशोधन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथून माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. संजय गणोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.
या शैक्षणिक प्रवासात सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशिकांत लोखंडे यांचा मोलाचा सहभाग आहे, तसेच इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख डॉ. एम. बी. माळी, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय,पुणे, MIT ADT युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पूजेरी, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. गणेश पाठक, तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. रमेश माळी यांचे सततचे प्रोत्साहन, सहकार्य आणि संस्थात्मक पाठबळ लाभले.
प्रा. डॉ. हर्षद लोखंडे यांनी आजपर्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 20 संशोधन लेखांचे प्रकाशन केले असून, त्यांनी 5 आंतरराष्ट्रीय व १ राष्ट्रीय परिषदांमध्ये आपले संशोधन सादर केले आहे. तसेच, त्यांना १ जर्मन पेटंट आणि १ भारतीय पेटंट मंजूर झाले आहेत. त्यांच्या संशोधन कार्याचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे.
प्रा. डॉ. हर्षद लोखंडे हे दैनिक ‘कर्मयोगी’ चे मालक व प्रकाशक प्रा. एन. डी. लोखंडे आणि संपादिका सौ. मंगलताई लोखंडे यांचे चिरंजीव असून, ते  15 वर्षांच्या अभियांत्रिकी अनुभवातून, MIT ADT युनिव्हर्सिटी, पुणे येथून गुणवत्तापूर्ण अध्यापन करीत आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Monday, August 4, 2025

सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची आज पुण्यतिथी ; कराड व वाळवा तालुक्यात स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन ;

वेध माझा ऑनलाइन।
कृष्णाकाठच्या सहकार, आरोग्य आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांची मंगळवार दि. ५ ऑगस्ट रोजी १२ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त सकाळी ८.३० वाजता कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील स्व. आप्पांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पार्पण व अभिवादन केले जाणार आहे.

स्व. जयवंतराव भोसले यांनी सहकार, शिक्षण आणि आरोग्य यांना केंद्रबिंदू मानून कृष्णाकाठी विकासाचे नवे पर्व सुरू केले. कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणली. तसेच कृष्णा परिवारातील अनेकविध संस्थांच्या माध्यमातून आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन यशस्वी कारकीर्द घडवित आहेत. कृष्णा रूग्णालयाच्या माध्यमातून कराडसह संपूर्ण सातारा जिल्हा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्याच्या परिसरातील रूग्णांना अद्ययावत अशा स्वरूपाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत आहेत.

त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मंगळवारी (ता. ५) कराडसह वाळवा तालुक्यात ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन होईल. तसेच स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 

Sunday, August 3, 2025

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील घराला थेट बॉम्बने उडवण्याची धमकी ;

वेध माझा ऑनलाइन।
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील घराला थेट बॉम्बने उडवण्याची धमकी ही देण्यात आलीये. यामुळे मोठी खळबळ उडाली. गडकरींच्या घराची सुरक्षा आता वाढण्यात आलीये. पोलिस नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आला आहे. या फोननंतर खळबळ उडाली. मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी सकाळी 8:46 वाजता पोलिस नियंत्रण कक्षाच्या 112 क्रमांकावर फोन आला आणि थेट गडकरी यांच घर बॉम्बने उडवून टाकणार असल्याचे म्हटले.
या धमकीच्या फोननंतर स्थानिक पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. धमकीच्या फोननंतर नियंत्रण कक्षाला कॉल आल्यानंतर प्रताप नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिस आणि श्वान पथक गडकरी यांच्या घरात शोध मोहीम राबवत आहेत. यादरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. प्रत्येक बारीक गोष्टीवर पोलिसांची नजर आहे.

मंत्री शंभूराज देसाई आईला मिठी मारून ढसाढसा रडले: काय आहे कारण?

वेध माझा ऑनलाइन।
स्व.बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता आणि याच बंगल्यात मंत्री शंभूराज देसाई यांचा जन्म झाला. त्याच मेघदूत बंगल्यात आज तब्बल 55 वर्षांनी मंत्री शंभूराज देसाई यांनी गृहप्रवेश केला. यावेळी त्यांना आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झालेले बघायला मिळाले.

मेघदूत बंगल्यावर शंभूराज देसाई यांचं बालपण गेलं आहे. आजोबा स्व. बाळासाहेब देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता. या दरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांचा जन्म झाला होता. त्यामुळे पहिली पाच वर्ष शंभूराज देसाई यांनी बालपण घालवलं. त्यानंतर आज तब्बल ५५ वर्षानंतर शंभूराज देसाई आपल्या मातोश्रीसह गृहप्रवेशा दरम्यान आले असताना त्यांचे डोळे पानावले. तर संपूर्ण देसाई कुटुंब भावूक झाले.

निशिकांत दुबेंचं महाराष्ट्रात स्वागत करु, ; देवेंद्र फडणवीसांचे विधान, विरोधक आक्रमक ; निशिकांत दुबे म्हणाले होते...पटक पटककर मारेंगे ; कोणाला म्हणाले होते?


वेध माझा ऑनलाइन।
गेल्या काही दिवसांपासून निशिकांत दुबे यांच्या विधानामुळे महाराष्ट्रात हिंदी-मराठी वाद चर्चेत आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी दुबे यांचे स्वागत करण्याचे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात संताप आहे. विरोधी पक्षनेत्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार निशिकांत दुबे हे सातत्याने चर्चेत आहेत. महाराष्ट्रात हिंदी विरुद्ध मराठी वाद शिगेला पोहोचलेला असताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हिंदी भाषेवरुन टीका केली होती. राज ठाकरे जर महाराष्ट्राबाहेर किंवा उत्तर भारतीय राज्यांमध्ये आले, तर त्यांना पटक-पटक कर मारेंगे असे निशिकांत दुबे यांनी म्हटले होते. राज ठाकरेंनी दुबेच्या धमकीवर खोचक टोला देत प्रतिक्रिया दिली होती. आप मुंबई आइए. मुंबई के समंदर में डुबो-डुबोकर मारेंगे, असे राज ठाकरेंनी म्हटले होते. त्यातच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशिकांत दुबेंबद्दल एक विधान केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एका चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी खासदार निशिकांत दुबे यांचं महाराष्ट्रात आले तर संविधानिकरीत्या त्यांचे स्वागत करू, असे म्हटले आहे. यावरुन आता एकच गदारोळ सुरु आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या स्वागताच्या विधानावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शिवसेना नेते संजय राऊत आणि मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Saturday, August 2, 2025

महादेवी हत्तीणिला परत आणा ; कराडकरांची स्वाक्षरी मोहीम ;


वेध माझा ऑनलाइन।
महादेवी हत्तींनीला परत आणले जावे यासाठी आता कोल्हापूरसह कराडमध्ये देखील स्वाक्षरी मोहीम पार पडली या हत्तींनीला लवकरात लवकर परत आणण्यासाठी यावेळी साकडे घालण्यात आले कराडच्या दत्त चौक येथे ही स्वाक्षरी मोहीम पार पडली 
कोल्हापूर येथे याबाबत मोठी स्वाक्षरी मोहीम पार पडली 2 लाखाहून अधिक स्वाक्षऱ्या यावेळी करण्यात आल्या त्याचे पूजन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते व  त्या स्वाक्षऱ्या राष्ट्रपती मुर्मु याना पाठवण्यात आल्या होत्या
काल कराडमध्ये देखील दत्त चौकात याच मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली यानिमित्ताने महादेवी हत्तींनीला परत आणण्याबाबत कराडकरांनीदेखील कोल्हापूकरांबरोबरीने आपला आवाज उठवला आहे हा आवाज हळूहळू महाराष्ट्रभर उठण्याची शक्यता आहे

Friday, August 1, 2025

शिवराज मोरे यांची युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड;

वेध माझा ऑनलाइन
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करत शिवराज मोरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार करण्यात आली असून, दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब आणि राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अलूवेरू यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

शिवराज मोरे हे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले तरुण नेतृत्व आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी दोन वेळा यशस्वी कार्य केले असून, युवक काँग्रेसमध्येही सरचिटणीस आणि उपाध्यक्षपदी निवडणुकीतून निवड होऊन जबाबदारी पार पाडली आहे. युवक काँग्रेसच्या मागील निवडणुकीत त्यांना राज्यभरातून दुसऱ्या क्रमांकाने सर्वाधिक मते मिळाली होती. ही बाब त्यांच्या नेतृत्व क्षमतेचा व कार्यकर्त्यांशी असलेल्या संपर्काचा स्पष्ट पुरावा मानली जात आहे.
एका सामान्य कुटुंबातून आलेल्या शिवराज मोरे यांनी सामाजिक जाणिवा आणि संघटन कौशल्याच्या जोरावर युवकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी राज्यभर युवकांचे संघटन मजबूत करत युवक काँग्रेसची गती वाढवली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे संपूर्ण राज्यातून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट पसरली आहे.

या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना शिवराज मोरे म्हणाले, “काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. ही केवळ पदाची नव्हे, तर जबाबदारीची संधी आहे. पक्षाच्या विचारधारेनुसार युवकांची नवी पिढी घडविणे, संघटना अधिक मजबूत करणे आणि काँग्रेसचे कार्य गावोगावी पोहोचवणे हे माझे उद्दिष्ट राहील.”

मोरे पुढे म्हणाले, “आज काँग्रेस पक्ष संघर्षाच्या काळातून जात आहे. या कठीण काळात पक्षाला बळ देणे, नव्या उमेदवारांना संधी देणे, आणि सामान्य युवकांपर्यंत पक्षाचे विचार पोहचवणे, यासाठी मी स्वतः झटणार आहे. हे केवळ राजकीय नाही, तर वैचारिक आंदोलन आहे.”
शिवराज मोरे यांच्या या नियुक्तीचे अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी स्वागत केले आहे. काँग्रेस नेत्यांसह विविध सामाजिक संस्थांनी देखील त्यांच्या निवडीचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेस नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.