Friday, May 13, 2022

पाकिस्तानातील कराची येथे बॉम्बस्फोट ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - पाकिस्तानातील कराची येथे काल रात्री उशिरा बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळत आहे, या बॉम्बस्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट एवढा जोरदार होता की त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला, तसेच यामुळे आजूबाजूला उभी असलेली वाहने देखील उद्ध्वस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. कराचीमध्ये हा स्फोट झाला असून यावेळी बाजारपेठेत प्रचंड गोंधळ उडाला होता.
प्राथमिक माहितीनुसार, या बॉम्बस्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून जखमींची संख्या तेराहून अधिक आहे. बॉम्बस्फोटानंतर सर्वत्र विध्वंसाच्या खुणा दिसत होत्या. अनेक वाहनांचेही नुकसान झाले. कचराकुंडीच्या शेजारी उभ्या असलेल्या एका सायकलमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
या बॉम्बस्फोटात सुमारे दोन किलो स्फोटके आणि सुमारे अर्धा किलो बॉल बेअरिंगचा वापर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. हा स्फोट टायमरने करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या घटनास्थळावरून लोकांना हटवण्यात आले आहे. शहराचे केंद्र जेथे स्फोट झाला. त्यामुळे येथे मोठी गर्दी होत आहे. या भागाला डाउनटाउन म्हणतात. त्याचबरोबर स्फोटामुळे आजूबाजूच्या हॉटेल आणि घरांच्या काचा फुटल्या आहेत. तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सिंध आणि बलुचिस्तानच्या फुटीरतावादी गटांनी जबाबदारी स्वीकारली
त्याच वेळी, सिंध आणि बलुचिस्तानच्या फुटीरतावादी गटांनी त्याची जबाबदारी स्वीकारली आहे. कराची पोलिस याला दहशतवादी हल्ला म्हणत आहेत.

पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा..ओवेसीला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर...नितेश राणेंचे थेट आव्हान...अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीला दिली भेट...

वेध माझा ऑनलाइन - एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी हे औरंगाबादमध्ये गुरुवारी आले. यावेळी ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला असून शिवसेना, भाजप, मनसेने जोरदार टीका केली आहे. ओवैसींवर टीकेचा भडीमार होत असतानाच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी थेट ओवैसींना खुले आव्हान दिलं आहे.

आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं, "या कारट्या ओवेसी ला माहीत आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्या समोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल.. कारण राज्यामध्ये "नामर्दांचे सरकार आहे" याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व!!"
नितेश राणे यांनी आपल्या पुढच्या ट्विटमध्ये म्हटलं, "मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा.. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर.. आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!" पोलिसांना बाजूला करा म्हणत नितेश राणे यांनी थेट आव्हानच दिलं आहे.

नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

वेध माझा ऑनलाइन - नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा तात्पुरता दिलासा मिळाला आहे. त्यांना वैद्यकीय कारणांसाठी जामीन मिळाला नसला तरी, खासगी रुग्णालयात उपचार करण्याची विनंती कोर्टाकडून मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्यावर आता कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार होणार आहेत. उपचांरासह पोलीस बंदोबस्ताचा खर्च देखील नवाब मलिक यांनाच करावा लागणार आहे.

मुंबई सत्र न्यायालयाने नवाब मलिकांना तात्पुरता दिलासा दिला आहे. खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी त्यांनी देण्यात आली आहे. परवानगी जरी दिली असली तरी उपचारादरम्यान केवळ  कुटुंबातील एकाच सदस्याला सोबत राहण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्याकडून वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी सत्र न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला होता. किडनीच्या त्रासामुळे मलिक यांच्या वकिलाने शस्त्रक्रियेची परवानगी मागितली होती. मलिक यांनी वैद्यकीय आधारावर जामीन अर्ज दाखल केला होता. अखेर त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे.
जे. जे. रुग्णालयाऐवजी मलिक यांच्यावर खासगी रुग्णालयात लवकरात लवकर वैद्यकीय उपचार होणे गरजेचे आहे, असा दावा त्यांच्या वकिलांनी केला होता. मात्र, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्याला विरोध दर्शवला होता. त्यामुळे न्या. राहुल रोकडे यांनी मलिक यांच्या वैद्यकीय अहवालाबरोबरच जे. जे.मध्ये आवश्यक सुविधा आहे की नाहीत, याचा अहवाल देण्याचे निर्देश ईडीच्या अधिकाऱ्यांना दिले होते. मला मूत्रपिंडाचा आजार असून त्यामुळे पायांना सूज येत आहे. त्याशिवाय अनेक आजार आहेत. मूत्रपिंडाच्या आजारावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे कायमस्वरुपी उपचार करण्याची इच्छा असल्याने सहा आठवड्यांपुरता जामीन मंजूर करण्यात यावा, असा अर्ज मलिक यांनी केला होता.
दरम्यान, कुर्ला येथील जमीन व्यवहारात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरसोबत झालेल्या आर्थिक व्यवहार प्रकरणात नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून नवाब मलिक आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत.

Thursday, May 12, 2022

महाराष्ट्रातल्या निवडणुका कधी होणार याचा फैसला 17 मे रोजी होणार ; कुठलंही कारण सांगून निवडणुका लांबवू नयेत ;निवडणुका तातडीनं घेण्याचं निवडणूक आयोगावर बंधन!

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रातल्या निवडणुका नेमक्या कधी होणार याचा फैसला आता सुप्रीम कोर्टात 17 मे रोजी होणार आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने आज आपली याचिका सुप्रीम कोर्टात मेन्शन केली आहे. कोर्टाने त्यावर सुनावणीसाठी 17 मे दुपारी दोन वाजताची वेळ निश्चित केली आहे. महापालिका नगरपंचायती सप्टेंबरमध्ये तर जिल्हा परिषद ग्रामपंचायती ऑक्‍टोबरमध्ये घेण्याची विनंती करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्ट पावसाळ्यानंतर निवडणुका घेण्यासाठी मुभा देणार का? याचे उत्तर 17 मे रोजी कळणार आहे. दरम्यान, कुठलंही कारण सांगून निवडणुका लांबवू नयेत असे कोर्टाने स्पष्ट केल्याने निवडणुका तातडीनं घेण्याचं निवडणूक आयोगावर बंधन असल्याचेही आता अधोरेखित झाले आहे


राज्यात निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता
राज्यात निवडणुका पावसाळ्यानंतर आणि त्याही महापालिका, नगरपंचायती एकावेळी तर जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीनंतर अशा दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. राज्यातील जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याची परवानगी द्या असं राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात केलेली ही विनंती मान्य होणार का यावर राज्यातल्या निवडणुकांचं भविष्य ठरणार आहे. तसं झाल्यास गेल्या दोन अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुका शहरी आणि ग्रामीण अशा दोन टप्प्यांत, पावसाळ्यानंतर पार पडण्याची शक्यता आहे. 
दोन आठवड्यात निवडणूक प्रक्रिया जाहीर करा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं 4 मे रोजी दिलेल्या निकालात दिले होते. त्यानुसार निवडणुका तातडीनं घेण्याचं बंधन निवडणूक आयोगावर आहे. त्यामुळे निवडणुका पावसाळ्यात होणार का याबद्दलही कुतूहल निर्माण झालं होतं. पण आयोगानं पावसाळ्यात निवडणुका घेण्यात काय काय प्रशासकीय अडचणी आहेत याचा पाढाच सुप्रीम कोर्टातल्या याचिकेत वाचला आहे. 

सुप्रीम कोर्टानं एक गोष्ट स्पष्ट केली आहे की कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ निवडणूक लांबवता येणार नाही. शिवाय  ट्रिपल टेस्ट पूर्ण होईपर्यंत ओबीसी आरक्षण देता येणार नाहीय. त्यामुळे कुठलंही कारण सांगून निवडणुका लांबवू नयेत. आयोगानं निवडणुकांची तयारी तर सुरु केलीय, पण निवडणूक आयोगाच्या या अडचणींचा विचार करुन पावसाळ्यानंतरची मुभा कोर्ट देणार का हे आता पाहावं लागेल.

मनसेच्या वतीने उपजिल्हा रूग्णालयातील परिचारीकांचा सन्मान...

वेध माझा ऑनलाइन - जागतिक परिचारीका दिनाच्या निमित्ताने मनसेच्या वतीने उपजिल्हा रूग्णालयातील परिचारीकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी, आधुनिक नर्सिंगचा पाया रचणाऱ्या व ज्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी जागतीक परिचारीका दिन साजरा करण्यात येतो त्या फ्लोरेन्स नाईटिंगेल यांची प्रतिमा उपजिल्हा रूग्णालयाला भेट देण्यात आली.
 
यावेळी मनसेच शहर अध्यक्ष सागर बर्गे, पाटण तालुका अध्यक्ष गोरख नारकर, नितिन महाडिक, प्रवीण गायकवाड, भानूदास वास्के, संभाजी चव्हाण, संभाजी सकट, संदीप हावरे, प्रशांत गायकवाड, वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रकाश शिंदे व परीचारीका उपस्थीत होत्या.
यावेळी बोलताना सागर बर्गे म्हणाले की, 1854 मध्ये ब्रिटिश आणि रशियन मध्ये क्रिमियाचे युद्ध झाले. त्यावेळी त्या युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची फ्लोरेन्स नाईटिंगेल यांनी अतिशय बिकट परिस्थितीत सेवा केली. रात्रीच्या वेळी हातात कंदील घेऊन त्या युद्धभूमीवर जाऊन रुग्णांची विचारपूस करत असत. त्यामुळे सैनिक प्रेम आणि आदरने त्यांना 'लेडी विथ लॅम्प असे म्हणत.म्हणुन त्यांच्या जन्म दिनी जागीतक परिचारीका दिन साजरा करण्यात यतो. परिचारिका काम करताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावत असतात. त्यांनी कोविड काळामध्ये अतिशय उल्लेखनीय सेवा केली आहे, त्यांचा सत्कार म्हणजे मानवतेचा सत्कार आहे. असे मत सागर बर्गे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुढील वर्षीपासून आदर्श परिचारिका पुरस्कार देण्यात येणार आहे

माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून १० कोटी ४४ लाख रुपयांचा निधी मंजूर- कराड दक्षिण मधील २८ गावातील पाणंद रस्त्यांना मंजुरी...

वेध माझा ऑनलाइन - कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील गावातील पाणंद रस्त्यांना मातोश्री ग्राम समृध्दी  शेत-पाणंद रस्ते योजना अंतर्गत कामांना निधी मंजूर होण्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून २८ गावातील ४३.५० कि.मी. पाणंद रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. 

शेताकडे जाणारे व शेतीच्या कामांसाठी महत्वाच्या असणाऱ्या पाणंद रस्त्यांना राज्य शासनाकडून मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना अंतर्गत निधी दिला जातो. यासाठी कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण मधील २८ गावातील पाणंद रस्त्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावानुसार ४३.५० कि.मी. एवढ्या अंतराच्या पाणंद रस्त्यांना जवळपास १० कोटी ४४ लाख इतका भरघोस निधी मिळाला आहे.  या मध्ये गोटे येथे NH-4 हायवे ते महादेव मंदिर व स्मशानभूमीकडे जाणारा पाणंद रस्ता रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, चचेगाव येथे कराड-ढेबेवाडी रस्त्यापासून शामराव पवार यांचे शेतापर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, तुळसण येथे जुगाई मंदिर ते देशपांडे शिवार (येळगांव हद्द) पाणंद रस्ता व स्मशानभूमी ते कुंभारकी पाणंद रस्ता मजबूतीकरण व खडीकरण व डांबरीकरण करणे, आटके येथे अंतर्गत पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, किरपे येथे देवकर मळ्यात जाणारा पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, जिंती येथे चव्हाण मळा येथील पाणंद रस्ता करणे, कार्वे येथे अंतर्गत पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, खोडशी येथील स.नं.385 पासून ते स.नं. 343 पर्यंत उत्तर दक्षिण 1500 मीटर पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, शेरे येथे तालु्गडेवस्तीकडे जाणारा रस्ता पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, विंग येथे अंतर्गत पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, वाठार येथे वाठार हायस्कूल ते रेठरे पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, नांदगाव येथे नांदगाव ते विंग पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, येणपे येथे मारुती मंदिराच्या पाठीमागून पिण्याच्या पाण्याच्या टाकीपर्यंत पाणंद रस्ता डांबरीकरण करणे, शेरे येथे प्रकाश विलास निकम यांच्यावस्तीपासून ते विष्णू निकम यांच्या घराकडे जाणारा पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, धोंडेवाडी येथे अंतर्गत पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, नांदलापूर येथे अंतर्गत पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, नारायणवाडी येथे अंतर्गत पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, ओंडशी येथे अंतर्गत पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, पाचुपतेवाडी येथे अंतर्गत पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, पोतले येथे अंतर्गत पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, सवादे येथे अंतर्गत पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, टाळगाव येथे अंतर्गत पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, वडगाव हवेली येथे अंतर्गत पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, वहागाव येथे अंतर्गत पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, वारुंजी येथे अंतर्गत पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, कापील येथे अंतर्गत पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे अशा कराड दक्षिण मधील २८ गावातील ४३.५० कि.मी. पाणंद रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाकडून निधी मिळाला असून लवकरच मंजूर गावामध्ये कामे सुरु होऊन शेतीच्या कामांसाठी सोयीचे होणार आहे.

मुंबईत मंत्रालयासमोरच एका कुटुंबाचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न ; मंत्रालय परिसरात एकच खळबळ...

वेध माझा ऑनलाइन - मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबासह मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ज्या व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला तो व्यक्ती हिंगोली जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत असून त्याचे नाव राजू चन्नाप्पा हुलगुंडे असं आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजू चन्नाप्पा हुलगुंडे हे गेल्या 8 महिन्यांपासून उपोषण करत होते. सार्वजनिक बांधकाम विभागावर त्यांचा आक्षेप होता. बांधकाम विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आज दुपारच्या सुमारास त्यांनी अंगावर रॉकेल ओतून मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.
मंत्रालयासमोर घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी दाव घेत राजू चन्नाप्पा हुलगुंडे यांना ताब्यात घेतलं आहे. वेळीच पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत राजू चन्नाप्पा हुलगुंडे यांना रोखले आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.