Saturday, February 10, 2024

राज्यात सध्या जे चाललंय ते अनाकलनीय ; शिंदे सरकार मधील एका मंत्र्याची प्रतिक्रिया ; सर्वत्र आश्चर्य व्यक्त ;

वेध माझा ऑनलाइन। गोळीबाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. आधी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर मुंबईच्या उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला. त्यानंतर मॉरिस नरोन्हाने ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करत हत्या केली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यापाठोपाठच चाळीसगाव गोळीबार प्रकरणात गंभीर जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महिंद्र मोरे यांचा मृत्यू झाला. या सगळ्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. यावर भाजपचे वरिष्ठ नेते, आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे.दरम्यान सध्या राज्यात जे चाललय ते अनाकलनीय आहे असेही मंत्री पाटील म्हणाले आहेत

घडणाऱ्या घटना चिंताजनक- चंद्रकांत पाटील
राज्यात सुरु असलेल्या गोळीबाराच्या सत्रावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात घडणाऱ्या घडणाऱ्या घटना चिंताजनक आहेत. त्याची योग्य स्तरावर चौकशी आणि कारवाई होते आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. चाळीसगाव गोळीबार प्रकरणात गंभीर जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महिंद्र मोरे यांचा मृत्यू झाला. यावर बोलताना अपुऱ्या माहितीवर बोलणं योग्य नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.  ते नाशिकमध्ये बोलत होते.

भुजबळांना जीवे मारण्याची धमकी, पाटील चंद्रकांत म्हणाले…
छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नाशिकच्या कार्यालयात पत्र पाठवून ठार मारण्याची सुपारी घेतली असल्याची माहिती दिली आहे. यानंतर भुजबळांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यावरही चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात सध्या चाललंय ते अनाकलनीय आहे. कुठे तरी शांतपणे सर्व पक्षांनी त्याचा विचार करणे आवश्यक आहे. छगन भुजबळ यांना आलेल्या धमकीची दखल घेण्याकरिता सरकार सक्षम आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

भुजबळ यांना पुन्हा धमकी ; धमकीचा पत्रात भुजबळांच्या हत्येसाठी बैठक झाल्याचा उल्लेख ;

वेध माझा ऑनलाइन। ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा धमकी आली आहे. यापूर्वी धमकीचे फोन आल्यानंतर आता पत्र आले आहे. या पत्रात छगन भुजबळ यांच्या हत्येसाठी एक बैठक झाल्याचा उल्लेख आहे. या बैठकीला पाच जण उपस्थित होते. ही बैठक कुठे झाली, याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलिसांना हे पत्र दिले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ही धमकी आल्याच्या प्रश्नावर बोलण्यास भुजबळ यांनी नकार दिला.

काय म्हणाले भुजबळ
मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आतापर्यंत फोन आणि मेसेज तर खूप आले. परंतु आता पत्रही आले आहे. आयुष्यात असे अनेक प्रसंग आले आहेत. परंतु काहीही झाले तरी मी माझी भूमिका, माझी आयडॉलॉजी सोडणार नाही. मी घरी बसू शकत नाही. जे परिणाम होतील, त्यासाठी आपली तयारी आहे. आता पोलिसांवर सर्व सोडून दिले आहे. पोलीस शोध घेतील.

काय आहे पत्रात
भुजबळ यांना धमकीचे पत्र आले आहे. त्यात काही नंबर पण देण्यात आले आहेत. काही गाड्यांचे नंबरही दिले आहे. तसेच ज्या हॉटेलसमोर मीटिंग झाली, त्या हॉटेलचे देखील नाव आहे. हत्येच्या कटासाठी पाच लोकांची बैठक झाली. ही बैठक ज्या हॉटेलसमोर झाली त्याची माहिती आहे. आता हा प्रकार पोलिसांवर सोपवून द्यायचे आहे. धमकी आली तरी घरी बसू शकत नाही, जे परिणाम व्हायचे ते होतील. मी माझी भूमिका सोडू शकत नाही. पोलिसांना माहिती दिलीय, ते काय करायचं करतील

Friday, February 9, 2024

निखिल वागळे यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला ; फडणवीस म्हणाले...लोकांच्या भावना भडकतील असे वक्तव्य करणे चुकीचे ...वाचा सविस्तर

वेध माझा ऑनलाइन। 
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याकडून आज ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं. पण ते कार्यक्रमाला जात असताना त्यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. या हल्ल्यात त्यांच्या गाडीवर दगडफेकही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटनेवर आता पुणे पोलिसांची तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील प्रतिक्रिया समोर आली आहे. निखिल वागळे यांनी केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याची माहिती समोर येत आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आधीच त्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांच्या गाडीवर हल्ल्याची घटना घडली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. फडणीसांनी या घटनेनंतर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

“कायदा आणि सुव्यवस्था कुणीही हातामध्ये घेऊ नये. मग ते कुणीही असो, भाजपचं असो किंवा इतर कुणीही असो, आम्ही त्याच्यावर कारवाई करुच. पण त्याचवेळी लोकांच्या भावना भडकतील अशा प्रकारची वक्तव्ये करणं देशाच्या सर्वोच्च नेत्यांना अतिशय खालच्या स्तरावर जाऊन बोलणं हे देखील अत्यंत चुकीचं आहे. तथापि हे कितीही चुकीचं बोलले तरी कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम आहे. ते पोलीस चोखपणे करतील”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

घटनेवर पुणे पोलिसांनीदेखील प्रतिक्रिया दिलीय. “आज इकडे कार्यक्रम होता. कार्यक्रमासाठी आज इथे पोलीस बंदोबस्त लावलेला होता. सहा वाजेपासून कार्यक्रम सुरु देखील झाला होता. निखिल वागळे इथे येणार होते. त्यांच्याशी आम्ही बातचित केली होती. पण इथली परिस्थिती हाताळल्यानंतर ते इकडे येत होते. ट्राफीकमधून येत असताना त्यांच्या गाडीच्या मागेपुढे पोलीस होते. पण येत असताना काही जणांनी त्यांच्या गाडीवर शाई फेकली आणि पाठीमागून दगड फेकले आहेत. त्या संदर्भात आम्ही गुन्हे दाखल करु आणि सगळ्यांवर कारवाई करु”, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली.

“चार वाजेपासून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दिला होता. ते येत असताना मध्य ट्राफीकमध्ये कुणीतरी संधी साधून दगड टाकली आहे. संबंधितांवर कारवाई होईल, अशी प्रतिकक्रिया पोलिसांनी दिली. “निखिल वागळे यांच्या येण्याच्या वेळत थोडा मागेपुढे झाला”, असंही पोलिसांनी सांगितलं.


राज्यातील 4 थी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर भरणार ; नवाज सुतार यांच्या प्रयत्नांना यश ! ;

वेध माझा ऑनलाइन। आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांमध्ये रात्री उशीरा जागण्याचा कल वाढत असल्याचं दिसून येत असल्याने त्यात सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप होत नाही आणि परिणामी मुलांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येत असल्याने तसेच अनेक पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात यामुळे खूपच त्रास व गैरसोयी ला सामोरे जावे लागत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य नवाजबाबा सुतार यांनी या समस्येला प्रकाश झोतात आणले व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांकडे सदर गैरसोय दुर करावी म्हणून निवेदनाद्वारे वारंवार मागणी केली होती तसेच मेलद्वारे स्मरण करून देऊन पाठपुरावा केला होता. राज्य शासनाकडे या आशयाचे मागणीचे अनेक संस्था व नागरिक पालक सुद्धा टाहो फोडत होते. 
दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सदस्य नवाजबाबा सुतार व जनतेतून होत असलेल्या मागणीची दखल घेऊन नुकतेच राज्य सरकारने चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामध्ये राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ वाजलेनंतर भरवण्याबाबतचे शासन परिपत्रक जारी करण्यात आलं आहे अशी माहिती स्वतः नवाज सुतार यांनी निवेदनाद्वारे दिली आहे

विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षी मुंबईतील 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी राज्यपाल बैस यांनीही शाळेच्या वेळा बदलण्याची सुचना केली होती व त्यांच्या सूचनेनुसार आता. हिवाळा व पावसाळा या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे. पावसामुळे व थंडी मुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होणे, धुक्यांचा त्रास लवकर डबा तयार करणे आदी मोठी गैरसोय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सदस्य नवाजबाबा सुतार यांच्या मागणीमुळे दुर झाल्याने विद्यार्थी व पालकांच्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असुन नवाजबाबा सुतार यांचे प्रयत्नांना मोठे यश मिळालेने त्यांचे सर्वत्र कौतुक व आभार व्यक्त केले जात आहे.

Thursday, February 8, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासात्मक दृष्टीमुळे कराडच्या वैभवात पडतेय भर ; कराडचे शिंदे गटाचे नेते रणजित पाटील यांनी दिल्या मुख्यमंत्री शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ;

वेध माझा ऑनलाइन।
आज मुख्यमंत्री शिंदे यांचा वाढदिवस साजरा होत आहे कराडचे शिंदे गटाचे नेते रणजित पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना त्यांच्या वाढदिसानिमित्त आज शुभेच्छा दिल्या आहेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या विकासात्मक दृष्टीमुळे कराडच्या वैभवात भर पडत असल्याची भावना रणजित पाटील यांनी व्यक्त केली आहे

सातारा जिल्ह्याने आतापर्यंत महाराष्ट्राला चार मुख्यमंत्री दिले आहेत. प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी आपला कार्यकाळ विशिष्ट पद्धतीने व विकासात्मक कामे करून सातारा जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावला आहे.  दरम्यान विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराड व परिसराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी देऊन पुढे टाकले आहे. राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळत असताना छोट्या कार्यकर्त्यांचे काम करण्याकडे एकनाथ शिंदे यांचा अधिकचा कल दिसून येतो. जनतेच्या विकासाच्या दृष्टीने घेऊन गेलेले कामे एकनाथ शिंदे तात्काळ मंजूर करतात. कार्यकर्त्याला निराश करत नाहीत.  स्वराज्यरक्षक धर्मवीर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक कराड येथील भेदा चौकामध्ये करण्याचे ठरल्यानंतर याला तात्काळ निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र राज्याचे विकासपर्व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नामदार शंभूराज देसाई साहेब- कर्तव्यदक्ष पालकमंत्री, यांच्या प्रयत्नाने रणजीत पाटील (नाना) यांनी मोठ्या प्रमाणात निधी कराडच्या विकासासाठी आणलेला आहे. त्याचबरोबर कराडमधील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालेला आहे. या निधीतून कराडचे रस्ते चकाचक झालेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराडसाठी दिलेल्या निधीवर एक नजर टाकल्यानंतर त्यांची विकासात्मक दृष्टी आपणाला दिसून येते.

दरम्यान आज मुख्यमंत्री शिंदे यांचा वाढदिवस साजरा होत आहे कराडचे शिंदे गटाचे नेते रणजित पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना त्यांच्या वाढदिसानिमित्त आज शुभेच्छा दिल्या आहेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या विकासात्मक दृष्टीमुळे कराडच्या वैभवात भर पडत असल्याची भावना रणजित पाटील यांनी व्यक्त केली आहे

युवा नेते सूरज शेवाळे यांची भाजप - युवा मोर्चाच्या कराड तालुकाध्यक्षपदी निवड ; सूरज शेवाळे यांचे सर्वत्र होतय अभिनंदन;

वेध माझा ऑनलाइन। मलकापूरचे भाजप चे धडाडीचे कार्यकर्ते व डॉ अतुल भोसले यांचे खंदे समर्थक युवा नेते सूरज शेवाळे यांची भाजप युवा मोर्चाच्या कराड तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली त्यांना याबाबतचे नियुक्तीपत्र देखील देण्यात आले आहे त्यांचे यानिमित्ताने सर्वत्र अभिनंदन होत आहे 

सूरज शेवाळे हे डॉ अतुल भोसले यांचे कट्टर समर्थक मानले जातात प्रत्येक निवडणुकीत ते अतुल भोसले यांचे कट्टरपणे समर्थन करताना दिसतात त्यांचा प्रचार व प्रसार करण्यात देखील ते प्रत्येकवेळी अग्रेसर असतात त्यांचे समाजकारण नेहमीच कासवाच्या चालीने सुरू असते समाजकारण करताना कोणतीही जाहिरातबाजी करताना ते कधीच दिसत नाहीत
कोरोना काळात त्यांनी मोठे काम केले आहे त्यांनी त्याकाळात पेशंटना मोलाची मदत केली आहे गरजू रुग्णांना घरोघरी जाऊन ऑक्सिजन मशीनद्वारे जीवदान देण्यासाठी त्यांनी खारीचा वाटा उचलून आपली समाजकार्याची बांधिलकी जपली आहे गोरगरीब जनतेला धान्य वाटप तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप,रुग्णांसाठी रक्तदान शिबीराचे आयोजन अशा अनेक प्रकारच्या सामाजिक कामाची त्याची मोठी लिस्ट आहे रात्री अपरात्री कशाचीही पर्वा न करता मदतीला धावून जाणारे म्हणून त्यांची ओळख आहे
मलकापूर मधील सर्व सामाजिक उपक्रमात त्यांचा हिरीरीने सहभाग दिसतो गरीबांच्या न्याय हक्कासाठी मलकापूर नगरपालिकेवर केलेलं त्यांचे आंदोलन आजही लोक विसरलेले नाहीत वेळप्रसंगी त्यांनी लोकांच्या प्रश्नासाठी उपोषण देखील केले आहे लोकांच्या मदतीला धावणाऱ्या या व्यक्तिमत्वाची नुकतीच भाजपा- युवा मोर्चा च्या कराड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे सूरज शेवाळे यांच्या झालेल्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

Wednesday, February 7, 2024

जयकुमार गोरे म्हणतात...डॉ अतुलबाबांनी खासदार व्हावं ; अनेक तर्कवितर्क सुरू ; सातारा जिल्ह्यात जोरदार चर्चा ;

वेध माझा ऑनलाइन। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  सातारा लोकसभा मतदारसंघातून सध्या  श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असतानाच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी कराड तालुक्यातील वाठारमधील एका जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यामुळे उमेदवारीवरून तर्कवितर्क सुरू झाले आहेत.या सभेत अतुल भोसले यांनी खासदार व्हावं, अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे असे वक्तव्य करून गोरे यांनी सर्वानाच धक्का दिला आहे

 डॉ. अतुल भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार व्हावं ही आम्हा सर्वांची भावना आहे. मात्र ते लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत. ते कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी अनेकांना संधी दिली, असे म्हणत आता विकासाभिमुख नेतृत्व असलेल्या अतुल भोसले यांना संधी द्या. खरंतर अतुल भोसले यांनी खासदार व्हावं, अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. मी उमेदवारी देणारा अथवा उमेदवारी जाहीर करणारा पदाधिकारी नाही. ते अधिकार दिल्लीत वरिष्ठांना आहेत. मात्र अतुल भोसले यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास होकार दिल्यास काहीच अडचण येणार नाही, असे जाहीर वक्तव्य आमदार जयकुमार गोरे यांनी वाठार येथील जाहीर सभेत केले. 
या वक्तव्यानंतर लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत इच्छुक नसणारे डॉक्टर अतुल भोसले लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्यास होकार देणार का?असे झाले तर मग याठिकाणी इच्छुक असणारे उमेदवार काय करणार ? हे प्रश्न आता सर्वांना पडले आहेत.