Tuesday, July 28, 2020

पावसाळी अधिवेशन 7 सप्टेंबर पासून घेण्याचा निर्णय

मुंबई :
 येत्या ३ ऑगस्टपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे.आता पावसाळी अधिवेशन येत्या ७ सप्टेंबरपासून घेण्याचा निर्णय आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधी पूर्वीच आटोपते घेण्यात आल्यानंतर विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून रोजी सुरू होणार होते.मात्र राज्यातील कोरोनाचे संकट अधिक गडद झाल्याने हे अधिवेशन पुन्हा पुढे ढकलण्यात येवून ते ३ ऑगस्टपासून घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.या दरम्यानच्या काळात राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यासह,काही लोकप्रतिनिधी,अधिकारी आणि विधानभवनातील कर्मचा-यांनाही कोरोनाची लागण झाल्याने ३ ऑगस्टपासून सुरू होणा-या या अधिवेशनावर कोरोनाची छाया होती.आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पावसाळी अधिवेशन येत्या ७ सप्टेंबरपासून घेण्यावर एकमत झाले.

कामकाज चालविण्यासाठी विधानसभेच्या एकूण २८८ सदस्यांपैकी २९ आमदारांच्या कोरमची आवश्यकता असून,सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे मिळून केवळ ३० आमदारांच्या उपस्थितीत कामकाज करण्याचा पर्याय आहे. मात्र मर्यादित लोकप्रतिनिधींमध्ये अधिवेशन घेण्यास भाजपाने विरोध दर्शविला आहे.अधिवेशनाला उपस्थित राहणे हा प्रत्येक सदस्याचा संवैधानिक अधिकार आहे. कोणत्याही सदस्याच्या संवैधानिक अधिकारावर गदा आणता येणार नाही असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले

No comments:

Post a Comment