Saturday, May 14, 2022

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार जाहीर...


वेध माझा ऑनलाइन - मिरज येथील यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार समितीच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा यावर्षीचा यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना जाहीर झाला आहे. रविवार 15 रोजी दुपारी 1.30 वाजता मिरजच्या बालगंधर्व नाट्यगृहात या पुरस्काराचे वितरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे. समितीचे सचिव विठ्ठलराव पाटील यांनी ही माहिती दिली.
या समितीच्या वतीने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे उपपंतप्रधान यासह विविध पदांवर काम करून स्वच्छ चारित्र्याचा वस्तूपाठ देशासमोर ठेवणारे धुरंदर नेते यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा मिरज येथे महाराष्ट्र - कर्नाटक राज्याच्या सीमेवर उभारण्यात आला आहे. या माध्यमातून यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे कार्य, वैचारिक वारसा पुढे नेणार्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात येते. आतापर्यंत माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,  दिवंगत आर.आर. पाटील, वाशिमचे चंद्रकांत ठाकरे, दिवंगत विष्णूअण्णा पाटील, कृषी तज्ज्ञ आप्पासाहेब पवार आदींना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
रविवारी होणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रमास सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार अनिल बाबर, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार श्रीमती सुमनताई पाटील, आमदार मानसिंग नाईक, आमदार विक्रम सावंत यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या अध्यक्षा श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र मेथे, सचिव विठ्ठल पाटील यांनी केले आहे.

सध्या एक मुन्नाभाई भगवी शाल पांघरून फिरतोय ; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

 वेध माझा ऑनलाइन - आम्हाला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे, असं शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. आता फडणवीस म्हणतात आम्हाला गधाधारी म्हणतात. आमचं हिंदुत्व गदाधारी आहे. गध्यांना आम्ही अडीच वर्षांपूर्वीच सोडलं आहे, अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सणसणीत टोला लगावला. यावेळी त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंवर नाव न घेता हल्ला चढवला.दरम्यान सध्या एक मुन्नाभाई भगवी शाल पांघरून फिरतोय असाही टोला उद्धव यांनी राज याना लगावला

काही दिवसांपूर्वी मला एका शिवसैनिकाचा फोन आला. तो मला विचारत होता, साहेब तुम्ही लगे रहो मुन्नाभाई पाहिलात का? मी त्याला विचारलं, त्याचा काय संबंध? तर तो म्हणाला, त्या चित्रपटात संजय दत्तला सगळीकडे गांधीजी दिसत होते. आपणच गांधीजी झाल्यासारखं त्याला वाटत होतं. तसं सध्या एकाला वाटू लागलंय. हल्ली एक मुन्नाभाई फिरतोय, असा टोला ठाकरेंनी लगावला.

सध्या एकजण भगवी शाल पांघरून फिरतोय. आपणच बाळासाहेब असं त्याला वाटू लागलंय. पण मुन्नाभाई चित्रपटाच्या शेवटी संजय दत्तला कळतं की आपल्या डोक्यात केमिकल लोचा झाला आहे. तसंच यांचंही झालंय. त्यामुळे यांना फिरू द्या. कधी ते मराठीचा मुद्दा घेऊन फिरतील. कधी हिंदूंचा मुद्दा घेऊन येतील. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असा चिमटा उद्धव ठाकरेंनी काढला.

शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला अटक

वेध माझा ऑनलाइन - शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांकडून  केतकी चितळेला अटक करण्यात आली  आहे. कळवा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. 

केतकी चितळेनं तिच्या फेसबुक आकाऊंटवर ही आक्षेपार्ह पोस्ट शेअर केलीय. अॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या व्यक्तीनं शरद पवार यांना उद्देशून लिहिलेली ही पोस्ट आहे. शरद पवारांनी जवाहर राठोड यांच्या कवितेवरून केलेल्या वक्तव्यानंतर पवारांवर आक्षेपार्ह भाषेत टिपण्णी असलेली ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
केतकी चितळे हिला नवी मुंबई पोलिसांनी कळंबोली येथून ताब्यात घेतले आहे. तिचा शोध ठाणे गुन्हे शाखा करत होती. आता ठाणे गुन्हे शाखेची टीम रवाना झाले असून तिला नवी मुंबई पोलिसांकडून ठाणे गुन्हे शाखा ताब्यात घेणार आहे. सध्या कळंबोली इथे असलेल्या तिच्या मावशीच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नवी मुंबई पोलिसांकडून ताबा मिळाल्यानंतर केतकी हिला ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले जाणार आहे. त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. 
केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुणे सायबर विभागाकडे तक्रारी दाखल केली.

Friday, May 13, 2022

शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट; केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल

वेध माझा ऑनलाइन - मराठी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिनं तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर ती ट्रोल होत असून तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. केतकी विरोधात कळव्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान केतकीला अटक होण्याची देखील शक्यता आहे. 

केतकी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर बेधडकपणे केलेल्या वक्तव्यांमुळे केतकी अनेकदा अडचणीत सापडली आहे. त्यामुळे नेटकरी तिला ट्रोलदेखील करत असतात. केतकीने आता तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. नेटके यांनी केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, केतकी चितळेनं ही पोस्ट केल्यामुळं पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. केतकीनं ही पोस्ट करुन दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना, तेढ निर्माण करण्याचे कृत्य केलं आहे. शरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीनं केली असल्याची तक्रार नेटके यांनी कळवा पोलिस ठाण्यात केली आहे. 

संभाजी महाराज जयंतीची जय्यत तयारी शंभूतीर्थावर आकर्षक सजावट ; उद्या विविध कार्यक्रम...

वेध माझा ऑनलाइन - येथील भेदा चौकात (शंभूतीर्थ) स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची 365 वी जयंती शनिवार 14 मे रोजी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त शिवतीर्थ परिसरात पताका, कमानी, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

उद्या शनिवारी 14 रोजी सकाळी 8.30 वाजता शिवतीर्थावर गुढी उभारण्यात येणार आहे. तर 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यावेळी किल्ले पुरंदरवरून आणलेल्या ज्योतचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी 5 वाजता 365 माता-भगिनींची पारंपरिक वेशात रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली शंभूतीर्थावर आल्यानंतर शंभूजन्माचा पाळणा होणार आहे. त्यानंतर व्याख्याते प्रा. अरूण घोडके (इस्लामपूर) यांचे ‘छत्रपती संभाजी महाराज' या विषयावर व्याख्यान होणार आहे.    
जयंतीसाठी शिवतीर्थावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. साईट व्ही या जागेला पताका, झालर व रोषणाई करण्यात आली आहे. या परिसरातील सर्व रस्त्यांवर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. शिवतीर्थावर आकर्षक सजावट करण्यात आली असून तेथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळय़ाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तर सायंकाळी व्याख्यानाचा कार्यक्रम याचठिकाणी होणार आहे. आकर्षक विद्युत रोषणाई हे या सोहळय़ाचे वैशिष्टय़ असणार आहे.  
शिव-शंभूप्रेमींनी शहरात प्रथमच भव्य स्वरूपात होणाऱया या जयंती उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.  

पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था
जयंतीनिमित्त शहर व तालुक्यातील शिव-शंभूप्रेमी मोठय़ा संख्येने येणार असल्याने चार चाकी व दुचाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था रत्नागिरी गोडावून, बैलबाजार रस्ता, छत्रपती संभाजी भाजी मार्केट या ठिकाणी करण्यात आली आहे. साईट व्ही लगतच्या रस्त्यांवर कोणीही वाहने लावू नयेत, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

उष्णतेनं हैराण झालेल्यांसाठी आनंदाची बातमी ; या वर्षी मान्सूनचं आगमन वेळे आधीच होणार ; 27 मे ला केरळमध्ये होणार मान्सूनचे आगमन ;

वेध माझा ऑनलाइन -  उष्णतेनं हैराण झालेल्या देशवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या वर्षी मान्सूनचं आगमन वेळे आधीच होणार आहे. येत्या 27 मे रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. पोषक वातावरण राहिल्यास त्या पुढच्या सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात येऊन धडकणार आहे. 
केरळमध्ये मान्सून हा साधारणपणे 31 मे रोजी दाखल होतो. गेल्या वर्षी जूनमध्ये मान्सून दाखल झाला होता. आता या वर्षी आलेल्या चक्रीवादळाचा काही प्रमाणात मान्सूनवर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तब्बल पाच दिवस आधी मान्सून केरळमध्ये धडकणार आहे असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे. 


|

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ ; धमकीच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर केली वाढ...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांची सुरक्षा व्यवस्था तीच आहे पण त्यातील पोलिसांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. राज ठाकरे यांना आलेल्या धमकीच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील पोलिसांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. 

राज ठाकरे यांना देण्यात आलेल्या सुरक्षेचा दर्जा  ( Y +) आहे. मात्र पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. यामध्ये एक पोलीस अधिकारी आणि एक पोलीस अंमलदार वाढवला. भोंगा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना  जीवे मारण्याचा धमकीचे पत्र पत्र आले आहे. या प्रकरणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंची पोलीस सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य पाहाता राज्य सरकारच्या वतीनं राज ठाकरे यांच्या सुरक्षेतील पोलीस कर्मचारी संख्येत करण्यात आली आहे.

राज ठाकरे यांना जीवे मारण्याचं पत्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं आहे. राज ठाकरेंनी भोंग्याविरोधात भूमिका घेतली, तसेच भोंग्यबाबत सुरू असलेलं आंदोलन थांबवण्यासाठी या धमक्या मिळत आहेत अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती. या पत्रात उर्दू शब्दांचा वापर केल्याचा दावा नांदगावकरांनी केला. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत राज्य, केंद्र सरकारनं दखल घ्यावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. आता राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आला आहे. 

उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा..
राज ठाकरेंनी 5 जूनला अयोध्येत जाण्याचं जाहीर केलंय. मनसेनं या दौऱ्याची जोरदार तयारी सुरु केलीय. तर उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही असं भाजपचे उत्तर प्रदेशमधील खासदार  बृजभूषण सिंह म्हटलं होतं. खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवत स्थानिक साधूसंत आणि महंतांच्या उपस्थितीत रॅली काढली होती