Friday, May 13, 2022

शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट; केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल

वेध माझा ऑनलाइन - मराठी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिनं तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर ती ट्रोल होत असून तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. केतकी विरोधात कळव्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान केतकीला अटक होण्याची देखील शक्यता आहे. 

केतकी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर बेधडकपणे केलेल्या वक्तव्यांमुळे केतकी अनेकदा अडचणीत सापडली आहे. त्यामुळे नेटकरी तिला ट्रोलदेखील करत असतात. केतकीने आता तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. नेटके यांनी केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, केतकी चितळेनं ही पोस्ट केल्यामुळं पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. केतकीनं ही पोस्ट करुन दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना, तेढ निर्माण करण्याचे कृत्य केलं आहे. शरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीनं केली असल्याची तक्रार नेटके यांनी कळवा पोलिस ठाण्यात केली आहे. 

No comments:

Post a Comment