Tuesday, June 21, 2022

40 आमदार माझ्यासोबत आहेत आणखी 10 आमदार येणार ; एकनाथ शिंदे यांचा गुवाहाटी येथे पोचल्यावर दावा

वेध माझा ऑनलाइन - राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. कालपासून बंडाच्या पवित्र्यात सूरतमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांना आज भल्या पहाटे सूरतहून एअरलिफ्ट करण्यात आलं. सूरत विमानतळावरून एका चार्टर विमानानं हे सर्व आमदार गुवाहाटीला रवाना झाले होते. मध्यरात्री अडीच वाजता शिवसेना आमदारांना घेऊन एक बस मेरिडियन हॉटेलवरून विमानतळावर दाखल झाली होती. त्यानंतर हे सर्व आमदार विमानानं आसामधील गुवाहाटीत दाखल झाले. 

गुवाहाटी विमानतळावर दाखल होताच एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेणार असल्याचा पुनरुच्चार केला. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, "शिवसेनेचे 40 आमदार माझ्यासोबत आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आणि त्यांची भूमिका पुढे घेऊन जाणार आहोत." पुढे बोलताना ते म्हणाले की, मला कोणावरच टीका टिप्पणी करायची नाही. शिवसेनेचे आमदार माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत. बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आम्ही सर्वजण पुढे घेऊन जाणार आहोत." तसेच, सध्या 40 आमदार माझ्यासोबत आहेत आणखी 10 आमदार इथे येणार असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.  

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आता स्वतंत्र गट स्थापन करण्याची आता दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा फोटो व्हायरल झाला आहे. शिंदे यांनी स्वतंत्र गटासाठी आवश्यक असलेली 37 ही संख्या पूर्ण केली असल्याचे सध्या चित्र आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुंबईत दाखल झाले आहेत. आज भाजप आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडणार आहेत.


कराड पालिकेने प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमधील झालेल्या चुकांकडे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी वेधले लक्ष...कराड शहरातील प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर...

वेध माझा ऑनलाइन - येथील नगरपरिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी शहरातील पंधरा प्रभागांमधील मतदार याद्या आज प्रसिद्ध केल्या दरम्यान येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी या याद्यांमधील महत्वाच्या झालेल्या चुकांकडे लक्ष वेधले आहे त्यांनी निवेदन देऊन याबाबत पालिका प्रशासनाला योग्य ती सूचनादेखील केली आहे 

त्यांनी निवेदनात म्हटले आहे की शहरातील नगरपरिषदेच्या निवडणूकी संदर्भातील जाहीर झालेल्या प्रभाग रचनेनुसार मतदार प्रारुप यादी प्रसिद्ध झाली आहे यामध्ये प्रभागात समाविष्ट भाग व यादी मधील समाविष्ट मते यामध्ये तफावत दिसून येत आहे आहे तरी आपण  यामधील तफावत लक्षात घेऊन त्यामध्ये योग्य ती दुरुस्ती करावी

दरम्यान या याद्यांबाबत काही सूचना किंवा हरकती असतील तर 27 जूनपर्यंत कराड नगर परिषद कार्यालयात त्या दाखल करावयाच्या आहेत असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे

मंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी बंडाचं हत्यार उपसलं. या पार्श्वभूमीवर दिवसभरात काय- काय घडामोडीं घडल्या...वाचा सविस्तरपणे...

वेध माझा ऑनलाइन -  सोमवारी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटली. त्यामुळे सेनेत फूट पडण्याची परिस्थिती निर्माण झाली. आणि याच परिस्थितीत सेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी बंडाचं हत्यार उपसलं. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. याच पार्श्वभूमीवर दिवसभरात घडलेल्या घडामोडींचा घेतलेला हा आढावा...


सकाळी 7 वाजता -  शिवसेनेतले प्रबळ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या आमदारांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली. शिंदेचा गट काल संध्याकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती 

सकाळी 7.15 -  शिंदेंच्या नाराजीची कुणकुण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचली... वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक बोलवण्याचे आदेश

सकळी 8 वाजता - 'नॉट रिचेबल' एकनाथ शिंदे गुजरातमध्ये असल्याची माहिती  आली. एकनाथ शिंदे यांना फोन केला असता गुजराती टोनमध्ये संदेश ऐकू येत होता.

सकाळी 9 वाजता -  शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या 25 पेक्षा जास्त गटासह सूरतमध्ये मुक्कामाला असल्याची माहिती समोर आली.सूरतच्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे 11 आमदारांसह रात्री उशिरा प्रवेश करतानाचा व्हिडीओ समोर आला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकरणात मोठी खळबळ उडाली.  

सकाळी 9.20 वाजता : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नाराज असताना शिवसेनेचे जवळपास 25 आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली. यांत बुलढाण्यातील दोन आमदारांचा समावेश असल्याची माहिती समोर आली.  मेहकरचे आमदार संजय रायमुलकर, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे दोन्ही शिवसेनेचे आमदार नॉट रिचेबल असणऱ्यांची नावे समोर

सकाळी 10 वाजता : एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर शिवसेनेच्या बड्या नेत्यांकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू झाला. संजय राऊत, मिलिंद नार्वेकर यांच्याकडून अनेक शिवसेना आमदारांना फोन करण्यात आले. आमदारांमधील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न  सुरू झाला

सकाळी 10.30 -  25  नॉट रिचेबल आमदारांपैकी मराठवाड्याचे 6, कोकणातील 3, पश्चिम महाराष्ट्रातील 4, विदर्भातील दोन आमदारांचा समावेश असल्याची माहिती समोर

सकाळी 11.00 -  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीत पोहोचले. विधानपरिषद निवडणूक आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबद्दल फडणवीस पक्षश्रेष्ठींशी चर्चा...फडणवीस यांच्या दिल्लीवारीमुळे चर्चांना उधाण

सकाळी 11.30 -  जागतिक योग दिनानिमित्त शिंदे यांनी फेसबुकवर पोस्ट केली. योग म्हणजे संतुलित मन, सुखी निरोगी आणि समृद्ध जीवनाचा राजमार्ग असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय.

सकाळी 11.45 - महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलाय. शिवसेना खासदार संजय राऊत यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द करण्यात आला. तर मंत्री उदय सामंत यांचा रत्नागिरी दौरा आणि छगन भुजबळ यांचा नियोजित नाशिक दौरा रद्द. तर दुसरीकडे कोकणातील शिवसेना आमदार मुंबईत पोहोचले

दुपारी 12.00- राज्यातील राजकीय नाट्याबाबत शरद पवार... जयंत पाटील चर्चा... दिल्लीतून शरद पवार यांची जयंत पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

दुपारी 12.40 - काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतचा घरोबा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अमान्य होता. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतचा
घरोबा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अमान्य असल्याची माहिती समोर

दुपारी 1.00-  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यात चर्चा तसंच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हेसुद्धा दिल्लीला रवाना 

दुपारी 1 .15 - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन मिलिंद नार्वेकर, रवी फाटक  सूरतकडे रवाना... एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा  करण्यासाठी ठाकरेंचे विश्वासू सूरतला निघाले... उद्धव ठाकरेंनी आपला निरोप निकटवर्तीयांच्यामार्फत एकनाथ शिंदेंकडे पाठवला.

दुपारी 1.30 - वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारांची बैठक

दुपारी 1.30  - राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला... मंत्रालयात अजित पवार यांच्या दालनात बैठक

दुपारी 1.40 -  काँग्रेस मंत्री आणि आमदारांना मुंबईतच थांबण्याच्या सूचना...  संध्याकाळी पुन्हा एकदा काँग्रेसची बैठक होणार आहे.

दुपारी 1.45 -  एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेची खलबतं.. वर्षा बंगल्यावर शिवसेनेचे  नेते दाखल

दुपारी 2 - कुणाला मुख्यमंत्री करायचा हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचंही पवारांनी म्हटलंय. तसंच सरकार पडलं तर विरोधी बाकावरही बसू शकतो असंही पवारांनी स्पष्ट केलंय.

दुपारी 2.00 - शिवसेनेची 'वर्षा'वर सुरु असलेली बैठक संपली. शिवसेनेच्या 55 पैकी 18 विधानसभा आमदारांची बैठकीला उपस्थिती 

दुपारी 2.15 - भूपेंद्र यादव, मंगलप्रभात लोढांची 'ऑपरेशन'साठी निवड केल्याची माहिती समोर... सूरतमधील फार्महाऊसची भाजप नेत्यांकडून बुकिंग...

दुपारी 2.45 - एकनाथ शिंदेंही बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. शिंदेंशी बोलणे होत नाही तोवर कोणतंही वक्तव्य करणार नसल्याचे राऊतांनी म्हटलंय. तसंच मुख्यमंत्र्यांबाबत काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करता येतील असंही राऊतांनी म्हटलंय. 

दुपारी 3.00 - शिंदेंच्या बंडाळीनंतरशिवसैनिक आक्रमक... सेना भवनाबाहेर शिवसैनिक जमायला सुरुवात

दुपारी 3.15 -  गुजरात प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटलांच्या  भेटीला भागवत कराड

दुपारी 3.45 -मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक सूरतमध्ये पोहोचले.. एकनाथ शिंदेंच्या जुन्या सहकाऱ्यांना 10 मि. ताटकळत ठेवलं

दुपारी 3.50 -  शिंदेंचा कोणताही  प्रस्ताव शिवसेना  स्वीकारणार नाही. शिवसेनेत प्रस्ताव देण्याची पद्धत नाही, शिवसेना नेत्यांच्या बैठकीत भूमिका, तर एकनाथ शिंदेचा डाव उधळून लावण्याचा  शिवसेनेचा प्रयत्न

साायंकाळी 4.39 - शिवसेनेचे नार्वेकर आणि फाठक सुरतच्या  हॉटेलमध्ये पोहोचले

 साायंकाळी 4.45 - 10 मिनिटांच्या खोळंब्यानंतर शिवसेना नेत्यांचा मेरिडियन हॉटेलमध्ये प्रवेश

सायंकाळच्या सुमारास एकनाथ शिंदे आणि नार्वेकर यांच्यातील बैठक संपली

मिलिंद नार्वेकर व एकनाथ शिंदे यांची बैठक संपली ; एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत परतण्याची इच्छाच नसल्याचं बैठकीत व्यक्त केलं मत...शिवसेनेतील फूट अटळ...

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्राच्या राजकारणात आज खूप मोठा भूकंप घडू शकतो. कारण महाविकास आघाडी सरकार  संकटात सापडलं आहे. शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे यांनी 35 आमदारांसह पक्षाविरोधात बंड पुकारलं आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी मिलिंद नार्वेकर हे स्वत: एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी गुजरातला गेले आहेत. गुजरातच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह थांबले आहेत. तिथे मिलिंद नार्वेकर त्यांची भेट घेण्यासाठी गेले. विशेष म्हणजे नार्वेकर गेले तेव्हा त्यांना हॉटेलमध्ये आत प्रवेश दिला गेला नाही. हॉटेल प्रशासनासोबत बराच वेळ चर्चा केल्यानंतर अखेर एकनाथ शिंदे हे मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी तयार झाले. दोन्ही नेत्यांमध्ये सलग अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत परतण्याची इच्छाच नसल्याचं मत व्यक्त केलं. त्यामुळे शिवसेनेसाठी पुढची वाट ही प्रचंड खडतर असल्याचं मानलं जात आहे. शिंदे 35 आमदारांसह सत्तेतून बाहेर पडले तर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सूरतच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेंच्यासह तब्बल 17 आमदार आहेत. तर आणखी काही आमदार हे मुंबईहून चार्टड विमानाने गुजरातच्या दिशेला निघाले आहेत. शिंदे यांच्यासोबत पक्षातील तब्बल 35 आमदार आहेत. हे सर्वजण भाजपसोबत गेले तर भाजपला खूप मोठा फायदा होणार आहे. भाजप राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा देखील करु शकतं. त्याच पार्श्वभूमीवर या सगळ्या घडामोडी घडवल्या जात असल्याचा कयास बांधला जात आहे. पण या घडामोडींमुळे शिवसेनेला खूप मोठा झटका बसला आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार का ?

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर आता आणखी एक मोठी घडामोड व्हायची शक्यता आहे.  लवकरच राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या सूरतमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 29 आमदार आहेत. हे आमदार आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा देणार नाही, असं पत्र राज्यपालांना देऊ शकतात. या पत्रात शिवसेनेचं नाव घेतलं जाणार नाही, असंही सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठकीला उपस्थित असलेले 7 आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

 काल महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच एकनाथ शिंदे आणि काही आमदार मुंबईहून सूरतच्या दिशेने रवाना झाले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 29 आमदार असतील, तर राज्यातलं महाविकासआघाडी सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

एकनाथ शिंदे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार...???

वेध माझा ऑनलाइन - राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होणार असून एकनाथ शिंदे आज संध्याकाळी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे आपल्या 35 समर्थक आमदारांसोबत सुरतमध्ये असून ते आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. 

आज संध्याकाळी केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेसोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. ही बैठक अहमदाबादमध्ये होणार  तसेच भाजपचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील हे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या भेटीला गेले आहेत.
एकनाथ शिंदे हे सुरतमध्ये असून त्यांना आणि समर्थक आमदारांना अहमदाबादला एअर लिफ्ट करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामागे दोन कारणं आहेत, एक म्हणजे केंद्रीय मंत्री अमित शाह आणि जेपी नड्डा हे त्यांची भेट घेणार आहे. दुसरं म्हणजे शिवसेनेचे काही नेते सुरतमध्ये येत असल्याने त्यांची आणि एकनाथ शिंदे यांची भेट होऊ नये यासाठी गुजरात भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. 


एकनाथ शिंदे यांच्या बंडाला मातोश्रीचा आशीर्वाद ? राजकीय वर्तुळात चर्चा...

वेध माझा ऑनलाइन - सध्या मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं शिवसेनेतील बंड राज्यभर चर्चेत असताना आता या बंडामागे   मातोश्रीचाच हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री केल्यास सेना भाजप सोबत जायला तयार असल्याचीही चर्चा आहे बंडाच्या नावाखाली एकनाथ शिंदे भाजपशी वाटाघाटी घडवून आणत आहेत अशीही राजकीय वर्तुळात आता चर्चा आहे आणि त्यामुळेच ना शिंदे यांच्या बंडाला मातोश्रीचाच आशीर्वाद आहे का ?अशी शंकाही उपस्थित होऊ लागली आहे.
सेना आमदार महा आघाडीबरोबर नाखूष आहेत अशीही माहिती समोर येत आहे या सर्वच कारणामुळे भाजप सोबत जाण्यासाठी शिंदे यांचे बंड मातोश्रीच्या आशीर्वादाने आहे का? अशी चर्चा जोर धरू लागली आहे