वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्राच्या राजकारणात आज खूप मोठा भूकंप घडू शकतो. कारण महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे यांनी 35 आमदारांसह पक्षाविरोधात बंड पुकारलं आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी मिलिंद नार्वेकर हे स्वत: एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी गुजरातला गेले आहेत. गुजरातच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह थांबले आहेत. तिथे मिलिंद नार्वेकर त्यांची भेट घेण्यासाठी गेले. विशेष म्हणजे नार्वेकर गेले तेव्हा त्यांना हॉटेलमध्ये आत प्रवेश दिला गेला नाही. हॉटेल प्रशासनासोबत बराच वेळ चर्चा केल्यानंतर अखेर एकनाथ शिंदे हे मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी तयार झाले. दोन्ही नेत्यांमध्ये सलग अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत परतण्याची इच्छाच नसल्याचं मत व्यक्त केलं. त्यामुळे शिवसेनेसाठी पुढची वाट ही प्रचंड खडतर असल्याचं मानलं जात आहे. शिंदे 35 आमदारांसह सत्तेतून बाहेर पडले तर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सूरतच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेंच्यासह तब्बल 17 आमदार आहेत. तर आणखी काही आमदार हे मुंबईहून चार्टड विमानाने गुजरातच्या दिशेला निघाले आहेत. शिंदे यांच्यासोबत पक्षातील तब्बल 35 आमदार आहेत. हे सर्वजण भाजपसोबत गेले तर भाजपला खूप मोठा फायदा होणार आहे. भाजप राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा देखील करु शकतं. त्याच पार्श्वभूमीवर या सगळ्या घडामोडी घडवल्या जात असल्याचा कयास बांधला जात आहे. पण या घडामोडींमुळे शिवसेनेला खूप मोठा झटका बसला आहे.
No comments:
Post a Comment