Tuesday, November 26, 2024

खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात: दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स;

वेध माझा ऑनलाईन।
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपटातील कथा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. कारण मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांची असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संजय दुधाणे यांनी कॉपीराईटबाबत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह जिओ स्टुडियो, आटपाट प्रोडक्शन, निर्माती ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. याचप्रकरणी पुणे कोर्टाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स पाठवले आहेत. 


खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे  हक्क 2001 पासून संजय दुधाणे यांच्याकडे आहेत. भारत सरकारच्या कॉपी राईट कार्यालयाचे प्रमाणपत्रही दुधाणे यांच्याकडे आहे.  चित्रपटाच्या निर्मिती आणि प्रदर्शन करण्यास निरंतर मनाई आणि ठरावासाठी दुधाणे यांच्याकडून  अ‍ॅड. रविंद्र शिंदे व अ‍ॅड. सुवर्णा शिंदे यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. याबाबत जातीने हजर रहाण्याचे समन्स न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि ज्योती देशपांडे यांना पाठवले आहेत.
नागराज मंजुळे यांनी वर्षभरापूर्वी पोस्ट शेअर करत 'खाशाबा' सिनेमाची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी सिनेमाचं पोस्टर देखील शेअर केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, ऑलम्पिकच्या इतिहासात भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव गौरवाने नोंदवणाऱ्या अत्यंत प्रतिभावंत पहिलवान खाशाबा जाधवांच्या आयुष्यवर मला चित्रपट करायला मिळतोय ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.
फँड्री,सैराट नंतर 'खाशाबा' हा माझा तिसरा मराठी चित्रपट असेल जो मी दिग्दर्शित करतोय

एकनाथ शिंदे यांनी दिला राजीनामा ; वाचा बातमी

विष माझा ऑनलाइन।
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे एकनाथ शिंदेंनी आज राजीनामा सुपूर्द केला. तर शपथविधीपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची राज्यपालांची एकनाथ शिंदेंना सूचना केली आहे. 

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व मंत्रीमंडळाचा राजीनामा घटनेनुसार मानला जातो.

Monday, November 25, 2024

मनसेची मान्यता रद्द होणार ?

वेध माझा ऑनलाइन।
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपयश आलं. मनसेची निवडणुकीत अतिशय सुमार कामगिरी पाहायला मिळाली. पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही. शिवाय पक्षाच्या मान्यतेसाठी आवश्यक असणारी पक्षाची मतांची टक्केवारी देखील मिळवता आली नाही. त्यामुळे मनसेची मान्यता रद्द होऊ शकते. याबाबतची माहिती विधीमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी दिली आहे. 

एखाद्या पक्षाला मान्यता टिकवायची असेल तर एकूण आठ टक्के मतदान पाहिजे किंवा एक जागा निवडून यायला पाहिजे. दोन जागा आणि सहा टक्के मतदान किंवा तीन जागा  मिळायला हवं, असा निवडणूक आयोगाचा निकष आहे, असं अनंत कळसे म्हणाले. महाराष्ट्र विधासभा निवडणुकीत मनसेला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मागील विधानसभेचं चित्र पाहिलं तर त्यांचा एक आमदार निवडून आला होता. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा एकही आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळे मनसेची मान्यता रद्द होऊ शकते का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 


अजितदादा रोहित पवारांना म्हणाले: थोडक्यात वाचलास

वेध माझा ऑनलाइन।
यशवंतराव चव्हाण यांचा आज 40 वा स्मृतिदिन आहे. यानिमित्त कराडमधील प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी शरद पवार रोहित पवार श्रीनिवास पाटील अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर दाखल झाले होते. यावेळी अजित पवार तेथे पोहचले होते. यादरम्यान अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली. या भेटीत अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्किल टोला लगावला.

अजितदादा म्हणाले: थोडक्यात वाचलास 
अजित पवार आणि रोहित समोर येताच दोघांची भेट झाली. यावेळी ढाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, असा अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्कील टोला लगावला. यावर सभा झाली असती तर निकाल वर-खाली झाला असता, अशी कबुली रोहित पवारांनी दिली. अजित पवार माझे काका आहेत, म्हणून मी पाया पडलो. शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणे माझी जबाबदारी आहे, असंही रोहित पवारांनी सांगितले

रोहित पवारांना वाकून नमस्कार करायला लावला ; काय म्हणाले अजितदादा ?

वेध माझा ऑनलाइन
राज्यात निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून यंदा जनतेनं सत्तेच्या चाव्या महायुतीकडे एकहाती  सोपवल्या आहेत. अशातच लोकसभेत पराभवाची चव चाखलेल्या दादांनी विधानसभेत मात्र, काकांना पछाडलं. दादांच्या राष्ट्रवादीनं यंदाच्या निवडणुकीत 41 आमदार निवडून आणले. अशातच घवघवीत यशानंतर आज  यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिले. त्यावेळी अजितदादा आणि रोहित पवारांची भेट झाली. दोघांमधील संवादही चर्चेचा विषय ठरला. एवढंच काय, रोहित पवारांना दादांनी आग्रह करत खाली वाकून नमस्कार करायला लावला. त्यानंतर अजितदादांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी रोहित पवारांसोबतच्या भेटीबाबत बोलताना अजित पवारांनी शरद पवारांचाही उल्लेख केला. 

यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी प्रीतीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवार उपस्थित होते. त्यावेळी दोघेही आमने-सामने आले. दोघांमध्ये मिश्किल सवांद झाला. अजित पवारांनी अगदी काका या नात्यानं हक्कानं रोहित पवारांना खाली वाकून नमस्कार करायला लावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते म्हणाले की, "मराठी संस्कृती आहे... आम्ही लवकर आलो असतो तर, साहेबांची भेट झाली असती... आम्ही दर्शन घेतलं असतं... टायमिंग जुळलं नाही... मी डिपार्मेंटवरही चिडलो... रोहितला मी शुभेच्छा दिल्यात..."


फडणवीस होणार मुख्यमंत्री !

वेध माझा ऑनलाइन।
राज्याच्या विधानसभा निकालानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीच्या बाजून कौल दिला. मतदार राजानं अगदी भरभरून मतांचं दान महायुतीच्या पदरात टाकलं. अशातच आता तिढा आहे तो म्हणजे, मुख्यमंत्रीपदाचा. राज्याच्या सत्तेची चावी तर महायुतीला मिळाली, पण मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण सध्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा भाजपचाच असणार, अशी माहिती विश्वसनिय सुत्रांनी दिली आहे. अशातच महायुतीतला तिसरा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. तसा ठरावही राष्ट्रवादीचे सर्व मंत्री करणार असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे आरएसएसनंही देवेंद्र फडणवीसांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती मिळत आहे. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्रीपदी आरएसएस आणि भाजप हायकमांडची पसंती असल्याची माहिती समोर येत आहे. विश्वसनिय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप कार्यकर्त्यांच्या मोठ्या पाठिंब्यासोबतच फडणवीस यांच्या नावाला महायुतीतूनही पाठिंबा मिळत असल्याचं दिसत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आक्षेप नसल्याचं जाहीर करुन टाकलं आहे.

Sunday, November 24, 2024

शरद पवार म्हणाले...योगी आदित्यनाथांच्या 'बटेंगे तो कटेंगे', या घोषणेमुळं मतांचं ध्रुवीकरण झालं; आमचा पराभव झाला असला तरी लोकांमध्ये जाऊन पुन्हा नव्यानं उभं राहू,"

वेध माझा ऑनलाइन।
 "योगी आदित्यनाथांच्या 'बटेंगे तो कटेंगे', या घोषणेमुळं मतांचं ध्रुवीकरण झालं. आमचा पराभव झाला असला तरी लोकांमध्ये जाऊन पुन्हा नव्यानं उभं राहू," असा विश्वास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कराड येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला दरम्यान, हा लोकांनी दिलेला निर्णय असून आम्हाला तो मान्य आहे असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

अजित पवार यांना जास्त जागा आल्या हे मान्य करणं गैर नाही. मी बारामतीत उमेदवार दिला नसता तर वेगळा मेसेज बाहेर गेला असता. तसंच नवखा उमेदवार आणि अनुभवी उमेदवार लढत याबाबत आम्हाला कल्पना होती. त्यामुळं अजित पवार आणि युगेंद्र पवार यांची तुलना होवू शकत नाही," असं म्हणत शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांचा झालेला पराभव मान्य केला. दरम्यान "विरोधी पक्षनेता असणं कधीही योग्य आहे. ती फिगर आमच्याकडे नाही. त्यामुळं विरोधी पक्षनेता द्यायचा की नाही हा सरकारचा निर्णय आहे," असं शरद पवार म्हणाले.

 'लाडकी बहीण योजने'बाबत शरद पवार म्हणाले की, "महायुतीनं 'लाडकी बहीण योजने'बाबतचा खोटा प्रचार केला. हे सरकार गेलं तर महाविकास आघाडी लाडकी बहीण योजना बंद करेल, असा खोटा प्रचार महायुतीनं केला. त्यामुळं महिलांनी आमच्याविरोधात मतदान केलं असल्याचं काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं. त्यामुळं याचा फटका आम्हाला बसला असावा."
निकालानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी 'ईव्हीएम'वर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर शरद पवार म्हणाले की, "याबाबत अधिकृत माहिती नसल्यामुळं मी 'ईव्हीएम' मशीनवर भाष्य करणार नाही. अधिकृत माहिती घेवून मी याबाबत अधिक बोलेन...
"