Monday, November 25, 2024

फडणवीस होणार मुख्यमंत्री !

वेध माझा ऑनलाइन।
राज्याच्या विधानसभा निकालानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीच्या बाजून कौल दिला. मतदार राजानं अगदी भरभरून मतांचं दान महायुतीच्या पदरात टाकलं. अशातच आता तिढा आहे तो म्हणजे, मुख्यमंत्रीपदाचा. राज्याच्या सत्तेची चावी तर महायुतीला मिळाली, पण मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण सध्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा भाजपचाच असणार, अशी माहिती विश्वसनिय सुत्रांनी दिली आहे. अशातच महायुतीतला तिसरा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. तसा ठरावही राष्ट्रवादीचे सर्व मंत्री करणार असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे आरएसएसनंही देवेंद्र फडणवीसांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती मिळत आहे. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्रीपदी आरएसएस आणि भाजप हायकमांडची पसंती असल्याची माहिती समोर येत आहे. विश्वसनिय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप कार्यकर्त्यांच्या मोठ्या पाठिंब्यासोबतच फडणवीस यांच्या नावाला महायुतीतूनही पाठिंबा मिळत असल्याचं दिसत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आक्षेप नसल्याचं जाहीर करुन टाकलं आहे.

No comments:

Post a Comment