Thursday, August 12, 2021

पावसकरांचे राजकारण काँग्रेसच्या कुबड्यांवर ...जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांचा घणाघात

कराड
जनशक्तीकडे बहुमत आहे का याची काळजी तुम्ही करू नका.आमची आघाडी सक्षम आहे. तुम्ही ज्या दोन नगरसेवकांचा पाठिंबा घेतला ते काँग्रेसचे सदस्य आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी स्थायी समितीवर आपल्याला जाता यावे.यासाठी भाजपाने काँग्रेसचा घेतलेला हा पाठिंबा आहे. पावसकरांचे राजकारण हे काँग्रेसच्या कुबड्यांवर चालणारे राजकारण आहे.त्यांनी आमची मापे काढण्यापेक्षा स्वतःचे आत्मचिंतन करावे. अशी बोचरी टीका जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांच्यावर केली. दरम्यान आमचा आरोप पावसकर गटावर आहे मात्र भारतीय जनता पार्टीबद्दल आम्हाला आदर आहे असे खोचक विधान देखील राजेंद्र यादव यांनी यावेळी केले...

 कराड पालिकेत आयोजित पत्रकार बैठकीत ते आज (गुरुवारी) बोलत होते. यावेळी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण सभापती सौ.स्मिता हुलवान,बांधकाम सभापती हणमंतराव पवार, नगरसेविका प्रियांका यादव, ओंकार मुळे, राहुल खराडे, निशांत ढेकळे आदी उपस्थित होते.

 राजेंद्रसिंह यादव म्हणाले, 'आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून' याप्रमाणे भाजपाच्या या गटाचे राजकारण सुरू आहे. जनशक्ती आघाडी ही पक्षविरहित स्थानिक आघाडी आहे. यामध्ये सर्व पक्षाचे समविचारी सदस्य आहेत. जनशक्तीकडे बहुमत आहे का... हे तपासण्यापूर्वी पावसकरानी गेल्या साडेचार वर्षात काय केले हे संपूर्ण कराडकरांना माहित आहे. आमची आघाडी सक्षम आघाडी आहे. पण तुम्हीच तुमच्या लोकनियुक्त नगराध्यक्षावर फिरस्ती, उचापती, नगराध्यक्षा मिटींग काढत नाहीत, टक्केवारी घेतल्याशिवाय बिलावर सह्या करीत नाहीत.असे आरोप  केले होते. परंतु आम्ही नगराध्यक्षांना नेहमीच सहकार्याची भूमिका ठेवली होती. परंतु गेल्या सहा महिन्यात अशी कोणती  जादू झाली की नगराध्यक्षांना या सर्व गोष्टींचा विसर पडला आहे.

 गावाच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे ही आपली पहिल्यापासून भूमिका आहे. परंतु गावाचा बुद्धिभेद करून भाजपाच्या पावस्कर गटाचे राजकारण सुरू आहे. 270 कोटी रुपयांचे बजेट उपसूचनेद्वारे मंजूर झाले. हा आमचा नेतिक विजय आहे. कराडकरांना कोणत्याही प्रकारची करवाढ न करता आम्ही हा अर्थसंकल्प दिला आहे. परंतु भाजपाच्या या गटाने अर्थसंकल्पाबाबत बुद्धिभेद, लबाडी व फसवणूक करण्याचा प्रकार केला आहे. अर्थसंकल्पामधील अनेक कागदपत्रे गहाळ झाली आहेत. ऑडिओ-व्हिडिओ गायब झाले आहेत. नगरपालिका सभागृहात जे बोलले जाते, ते प्रोसिडिंगवर येत नाही. प्रोसिडिंगवर खाडाखोड  केली जात आहेत. हे सर्व या भाजपा गटाचे कारस्थान आहे. या भाजपा गटाने अर्थसंकल्पाचा परिपूर्ण अभ्यास केलेला दिसत नाही. आम्ही जो 270 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यामध्ये नगरपालिकेला कसली झळ बसली आहे का? असा सवाल उपस्थित करून राजेंद्रसिंह यादव म्हणाले, कराड हे स्मार्ट सिटी बनवण्याचे आम्ही स्वप्न पहात आहोत. हे स्वप्न पूर्ण करून दाखवण्याची आमच्यात धमक आहे. परंतु विरोधकांना अशी स्वप्न पडतात की नाही हे माहीत नाही. नगराध्यक्षांनी 134 कोटी रुपयांचे बजेट स्वतःच्या सहीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले. यावर  मुख्यधिकाऱ्यांची सही नाही. तसेच अर्थसंकल्प एकमताने मंजूर आहे. असा खोटा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून देऊन नगराध्यक्षांनी सभागृहाची तसेच जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यानंतर त्यांनी सात दिवसानंतर दिलेल्या अहवालात एकमताने हा शब्द मी नजरचुकीने लिहिला आहे असे म्हंटले आहे. यावरून त्यांची नैतिकता दिसून येते.

 नगराध्यक्षांना विशेषता भाजपाच्या गटाला महामानवाबद्दल आकस दिसत आहे. अर्थसंकल्पामध्ये महामानवांच्या विकासाला विरोध केला आहे.आम्ही निधी आणला असे पावसकर नेहमी बोलतात.परंतु, शासनाने दिलेला हा निधी आहे.तो जनतेचाच  पैसा आहे, तुम्ही निधी काय स्वतःच्या खिशातून दिला का? तुम्ही कुठल्याही कामाचा पाठपुरावा करीत नाही आणि न केलेल्या कामाचे श्रेय मात्र घेता. तुमच्याकडून केवळ खुर्च्या झिजवण्याचे काम केले जाते असा घणाघातही राजेंद्रसिंह यादव यांनी यावेळी केला.

 विजय वाटेगावकर म्हणाले,गेल्या एक वर्षापासून नगराध्यक्षांनी सर्वसाधारण सभा काढली नाही. त्यामुळे अनेक विषय प्रलंबित आहेत. मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे सर्वसाधारण सभेसाठी अनेक वेळा पत्रव्यवहार केले असल्याचेही त्यांनी सांगितले. घंटागाडी चा शहरात गाजलेला विषय असो किंवा नगराध्यक्षाचा सहीचा विषय असो त्यांच्या एकूणच कारभारावर वाटेगावकर यांनी यावेळी जोरदार टीका केली

No comments:

Post a Comment