वेध माझा ऑनलाइन
सातारा दि.30 (जिमाका): कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा गणेशोत्सव जिल्ह्यात साध्या पद्धतीने व पर्यावरण पुरक असा साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गणेशोत्सवाबाबत बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री गणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळाकरिता 4 फुट व घरगुती गणपतीकरिता 2 फुटांच्या मार्यादेत असावी. या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्ती ऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मुर्तींचे पुजन करावे. मुर्ती शाडुची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीत विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे.
जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. आरती, भजन, किर्तन तसेच अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. श्री गणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी. मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शरिरीक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीने विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत केले आहे.
00000
No comments:
Post a Comment