Wednesday, August 11, 2021

नगरसेवक आपला 100 रुपये भत्ता कोविड फंडात दर महिन्याला देत आहेत...मग, नगराध्यक्षांनी दर महिन्याला मिळणारे 20000 रुपये प्रमाणे आपले मानधन पालिका फंडाकडे वर्ग करावे..

वेध माझा ऑनलाइन
कराड
कोविड संदर्भात उपाययोजना करण्यासाठी दि.15 मे 2020 रोजी झालेल्या विशेष सभेत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती व सर्व नगरसेवकांनी कोरोना काळात आपलेही योगदान असावे यासाठी आपला दर महिन्याचा मिळणारा 100 रुपये भत्ता आणि नगराध्यक्षाना दर महिन्याला मिळणारे 20 हजार रुपये मानधन नगरपालिका फंडाला वर्ग करण्याचा एकमताने निर्णय घेतला होता. परंतु नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे यांनी सभागृहाचा आणि कराडकर जनतेचा विश्वासघात करून त्यांनी आपले मानधन नगरपरिषदेच्या जनरल फंडामध्ये अद्यापही जमा केलेले नाही त्यातून शहराची ,सभागृहाची त्यांनी फसवणूक केली आहे तसेच हा भ्रष्टाचार आहे. त्यांनी हे पैसे सन्मानाने नगरपालिका फंडामध्ये वर्ग करावे व जनतेची आणि सभागृहाची माफी मागावी अशी मागणी लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

 यावेळी लोकशाही आघाडीचे माजी अध्यक्ष सुभाषराव पाटील, नगरसेवक वैभव हिंगमिरे,मोहसीन आंबेकरी, नगरसेविका सौ.अनिता पवार, सौ.पल्लवी पवार यांची उपस्थिती होती

सौरभ पाटील पुढे म्हणाले, कराड नगरपरिषदेची विशेष सभा नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दि.15 मे 2020 रोजी आयोजित केली होती. या सभेमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कराड शहरामध्ये उपाय -योजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. या चर्चेत आर्थिक तरतुदीचाही विचार  झाला होता. सर्वानुमते होणाऱ्या खर्चात पालिकेतील पदाधिकारी, सदस्यानी आपला खारीचा वाटा उचलावा असे ठरले होते. त्यानुसार पदाधिकारी, सदस्यांचे मिटींग भत्ते आणि नगराध्यक्षाचे मानधन एप्रिल २०२० ते पंचवार्षिक कालावधी संपेपर्यंत नगरपरिषदेच्या जनरल फंडामध्ये वर्ग करण्याचा विषय एकमताने मंजूर झाला होता. मानधन, भत्ते नगरपरिषदेच्या जनरल फंडामध्ये जमा करण्याची उपसुचना एकमताने मंजूर झालेली असतानाही नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी उपसुचनेतील इतर सर्व मुद्दे ठरावात घेवून मानधन हा शब्द हेतूपुरस्पर वगळून ठराव बनवला. व त्याप्रमाणे आपल्या अधिकाराचा गैरवापर करून प्रोसिडिंग बनवले. त्यांनी पदाचा गैरवापर करून बनावट कागदपत्रे तयार करून मानधनाची रक्कम 2 लाख 40 हजार स्वतःच्या फायद्यासाठी अदा करून घेतली आहे. हा प्रकार दुर्देवी असून नगरपालिका ,नगरसेवक व जनतेचा हा विश्वासघात आहे. त्यामुळे नगराध्यक्षा सौ. शिंदे यांनी हे मानधन सन्मानाने नगरपालिका फंडामध्ये वर्ग करावे तसेच त्यांनी सभागृहाची व शहराची माफी मागावी अशी मागणी यावेळी सौरभ पाटील यांनी यावेळी केली.

No comments:

Post a Comment