कराड
डेंग्यू, चिकन गुणियाचा आजार वाढू नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी. विनाकारण भीती बाळगू नये. याशिवाय जर आपल्या परिसरात डेंग्यू, चिकुन गुणिया सदृश्य आजाराची लक्षणे असलेले रुग्ण आढळल्यास त्याची कल्पना पालिकेच्या आरोग्य विभागास द्यावी असे महत्वपूर्ण आवाहन आरोग्य सभापती गुंड्याभाऊ वाटेगावकर यांनी आज साप्ताहिक वेध माझाशी बोलताना केले.
दरम्यान,पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यू, चिकन गुणियासारखे रोग पसरू नयेत, यासाठी कराड नगरपरिषद फाईट द बाईट अभियान राबवत आहे. या अभियानांतर्गत शहरातील 45 रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचा आढावा रोज घेण्यात येत असून शहरामध्ये ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे पाच व चिकन गुणियाचा एक रुग्ण आढळून आला आहे. शहरात या दोन्ही रोगाची स्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी विनाकारण भीती बाळगू नये, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले
कराड नगरपरिषद स्वच्छतेच्या कामकाजात सातत्य राखून शहरवासियांचे सार्वजनिक आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत असते. स्वच्छ सर्वेक्षणबरोबरच डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फाईट द बाईट अभियान आरोग्य विभाग सातत्याने राबवत आहे. मे महिन्यापासून पालिकेने पुन्हा हे अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. मे, जून, जुलै या कालावधीत डासांचा प्रादुर्भाव वाढतो. पावसाचे पाणी घराच्या परिसरातील कंटेनर, रिकामी भांडी यात वाढून डासांची उत्पत्ती होत असते. परिणामी या आजाराचे रुग्ण वाढतात, असा आजपर्यंतचा अनुभव आहे त्यामुळे पालिकेने फाईट द बाईट अभियानांतर्गत डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रीनी टीम यांच्या सहकार्याने प्रयत्न केले आहेत. याबरोबरच शहरात घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत असून ग्रीनी व पालिकेचे आरोग्य कर्मचारी घरोघरी भेटी देऊन पाणी साचणार्या ठिकाणांचा शोध घेऊन तेथील डासांची उत्पत्ती थांबवत आहेत. नागरिकांना सूचना करत आहेत. सर्वसाधारणपणे घरात फ्रीजच्या पाठीमागील कंटेनरमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडत असल्याची असल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास आले. याबाबत नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे. याशिवाय आशा सेविकांच्या मार्फत शहरात सर्वेक्षण करण्यात येऊन जिथे या आजाराचे रुग्ण सापडतील, तिथे लोकांच्या आरोग्याची माहिती घेतली जात आहे. ती आरोग्य विभागात कळवल्यानंतर त्या परिसरात औषध फवारणी, धूर फवारणी करण्यात येत आहे. यासाठी लिओ कंपनीच्या दोन आधुनिक मशीन पालिकेने घेतल्या आहेत. याशिवाय रुग्णसंख्येवर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील नामांकित अशा 45 रुग्णालयांना ग्रीनी टीमतर्फे रोज फोन करून तेथे या आजारांचे रुग्ण दाखल झाले आहेत का याची माहिती रोज घेण्यात येते. 19 ऑगस्टअखेर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे पाच रुग्ण दाखल असून चिकन गुणियाचा केवळ एक रुग्ण दाखल आहे. तर जुलै महिन्यात पाच रुग्ण दाखल होते. शहर व परिसरात सुमारे 300 रुग्णालये असून या रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी तालुक्यातून व शेजारच्या जिल्ह्यातून तसेच आणि अन्य तालुक्यातून रुग्ण दाखल होत असतात. त्याचा कराड शहराशी संबंध येत नाही. पालिका सातत्याने राबवत असलेल्या डास प्रतिबंधक उपाय योजनांमुळे शहरात या दोन्ही आजाराचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र या दोन्ही आजारांबाबत विनाकारण नागरिकांमध्ये भीती निर्माण झाल्याचे दिसत आहे. पुढील दोन महिने जास्त खबरदारी घेण्यात येणार असल्याचे वाटेगावकर यावेळी बोलताना म्हणाले.
No comments:
Post a Comment