Monday, August 30, 2021

राज्यातील काही जिल्ह्यात पुन्हा दमदार पावसाची शक्यता...

वेध माझा ऑनलाइन
राज्यातील शेतकरी अनेक दिवसांपासून दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहेत. हवामान विभागानं आज राज्यात ठिकठिकाणी पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात आज धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, लातूर, नांदेड , उस्मानाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात देखील पाऊस होईल, अशी माहिती हवामानतज्ज्ञ के.ए.एस होसाळीकर यांनी दिली आहे. तर , राज्यात आज सकाळपासून जळगाव, नंदूरबार आणि औरंगाबाद दिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे.

विविध जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट

हवामान विभागानं सोमवारी परभणी जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. तर,रत्नागिरी, जळगाव, बुलडाणा, जालना, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

31 ऑगस्टला रायगड, ठाणे आणि नाशिकला अ‌ॅलर्ट

मंगळवारी रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, मुंबई, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय. तर, 1 सप्टेंबरला राज्यात पालघरला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

नाशिकला दमदार पावसाची प्रतीक्षा

नाशिक जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये अद्यापही 65 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा 12 टक्के कमी आहे. दमदार पाऊस न झाल्यास आरक्षणाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गंगापूर आणि दारणा समूहात मात्र समाधानकारक पाणीसाठा असल्यानं नाशिककरांच्या पाण्याचा प्रश्न सध्यासाठी सुटला आहे.

शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

महाराष्ट्रात यंदाचा मान्सून असमान राहिला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीच्या दोन आठवड्यात मान्सूनचा पाऊस चांगला झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर पावसानं उघडीप घेतल्यानं शेतकऱ्यांसमोर पीक जगवण्याचं आणि दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं होतं. साधारणपणे जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यात पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसानं जोरदार हजेरी लावली होती. मात्र, त्याचवेळी उत्तर महाराष्ट्रात पावसानं दडी मारलेली होती. आता हवामान विभागानं पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस पडल्यास शेतकऱ्यांसमोरील पाण्याची अडचण दूर होणार आहे.

No comments:

Post a Comment